सिने निर्माते, माजी खासदार प्रितीश नंदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. प्रितीश नंदी हे शिवसेनेच्या पाठींब्यावर राज्यसभेचे खासदार झाले होते. त्यांनी पत्रकारितेत मोठे करियर केले होते. तसेच अनेक पुस्तकांचे लेखक तसेच टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक आणि 1980 च्या दशकात इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया , द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअरचे संपादक पदही भूषविले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (गुरुवारी) महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी शिवसेनेचे सर्व मंत्री हजर राहण्याची शक्यता आहे.बैठकीत येणाऱ्या 100 दिवसात काय काय करायचं आहे, विकास काम, जनहिताची कामे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील गँगशी संलग्न आलेले दोन आरोपी पुण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्याच्या बेतात असल्याचा बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या आरोपत्रात खुलासा करण्यात आला आहे.पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्याचं दोघानी प्लॅनिंग केलं होत मात्र त्याआधीच दोघांना बाबा सिद्दिकी यांच्या हात्ये प्रकरणी अटक झाल्याने अनर्थ टळला. पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आरोपींचा सहकारी असलेल्या जयदीप भोंडकरच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून बदल्याच्या भावनेने हत्येचा आखला होता कट, सप्टेंबर 2024 मध्ये पुण्याच्या उत्तम नगरमध्ये झाली होती जयदीप भोंडकरची हत्या. आरोपींच्या खुलास्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने केलं उत्तम नगर पोलिसांना सतर्क केले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री बंगल्यावर भेट घेतली. याबाबत ॲड. आंबेडकर यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. परभणी प्रकरणातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची आई, भाऊ आणि काही नातेवाईकांनी ५ जानेवारी रोजी अकोला येथे माझी भेट घेऊन तपासाच्या संदर्भात काही तक्रारी केल्या होत्या. तसेच या प्रकरणात येणाऱ्या अडचणीविषयी माहिती दिली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीत गेले आहेत. अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली असल्याचे वृत्त आहे. यावेळी दोन नेत्यांमध्ये विविध विषयवर चर्चा झाली असल्याचे समजते. या भेटीमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणूक, रखडलेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरु आहे. तपासाची सूत्रे एसआयटीच्या पथकाने हाती घेतल्यानंतर तपास कामाला वेग आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची कार ताब्यात घेतली आहे. या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती चांगलीच तापली आहे. अशातच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ७४५ शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील अधिकारी मी आणलेले नाहीत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. इतकेच नाहीतर तेव्हाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी ते अधिकारी आणले असल्याचेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. बीड प्रकरणावरून भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमधील परिस्थिती सुधारतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
दिल्लीत सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेसंदर्भात माहिती दिली. केंद्र सरकारने रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी 'कॅशलेस ट्रीटमेंट' योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी दीड लाख रुपये दिले जाणार आहे किंवा जखमींचा सात दिवसांच्या उपचाराचा खर्च आता केंद्र सरकार उचलणार आहे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या खासदारांशी संपर्क साधत असल्याच्या वृत्तावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'आम्ही नेत्यांशी कधीच गद्दारी करू शकत नाही. तटकरे साहेबांनी आमचा पक्ष आणि चिन्ह काढून घेतले, आता आमचे खासदारही घेणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिसांनी (Police) शरद मोहोळ टोळीशी संबंधित एका संशयित गुन्हेगाराकडून दोन गावठी पिस्तूलआणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. विकी दीपक चव्हाण (वय 19) अशा या गुन्हेगाराचे नाव आहे. विकी चव्हाण हा कंबरेला पिस्तूल लावून मेझा नाईन या हॉटेलजवळ थांबला होता. त्याचवेळी पोलिसांना त्याला सापळा लावून बड्या ठोकल्या.
67 व्या वरिष्ठ माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत 2024-25 अहिल्यानगर शहरात होईल. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान नगरच्या वाडियापार्क मैदानात या कुस्त्यांचा थरार रंगेल. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम विजेत्यास रोख परितोषिक, मानाची चांदीची गदा आणि चारचाकी गाडीही देणार असल्याची घोषणा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर (Nagpur) खंडपीठाने मंगळवारी मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली. न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांनी हा निर्णय दिला. गवळीने संचित रजेसाठी सुरुवातीला 18 ऑगस्ट 2024 रोजी कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज सादर केला होता.
एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार रोहित पाटील यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र येण्यावर पंढरपूर इथं मोठं विधान केलं. 'पक्ष आणि शरद पवारसाहेब (Sharad Pawar) जी भूमिका घ्यायला लावतील ती भूमिका आम्ही या पुढच्या काळात घेऊ', असं आमदार रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप (BJP) राज्यात चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाबरोबरच, काँग्रेसला भाजपने लागोपाठ धक्के दिले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाच्या नगरसेवकांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला झटका देण्याची तयारी केली आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीने काँग्रेस पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
"राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी राज्यातील सिंचन व्यवस्था व अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा. याचा राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यास मदत होईल. या अनुषंगाने जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी", अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी दिल्या. मंत्री विखे पाटील यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडील कामांचा आढावा घेतला. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सह सचिव सर्वश्री अभय पाठक, संजीव टाटू, अभियंता प्रसाद नार्वेकर यांच्यासह गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून बुधवारी अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई केली आहे. वाकड आणि डांगे चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसांतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते.
मुंबई पोलिसांनी टोरेस घोटाळा प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक केली असून त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. अटक केलेल्यांपैकी एक जण रशिया तर एक जण उझबेकिस्तानमधील असल्याचे सांगितले जात आहे. या घोटाळ्याचा मास्टरमाईंड युक्रेनला पळून गेल्याचा अंदाज आहे.
चंद्रपूर शहरात एकूण सात ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. हॉटेल, बार, पेट्रोल पंपासह संबंधित मालकाच्या घरी आणि कार्यालयात ईडीने हे छापे टाकले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. आज आणि उद्या शरद पवार पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार असल्याचे समजते.
मुंबई महापालिकेची निवडणूक स्बळावर लढण्याचा सूर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा असल्याचे समोर आले आहे. लवकरच याबाबत ठाकरेंकडून बैठक घेत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जाऊ शकतात.
एक देश एक निवडणूक (one nation one election) हे विधेयकावर आज जेपीसीची (JPC) पहिली बैठक होत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जेसीपीची स्थापना केली होता. लोकसभेचे 27 तर राज्यसभेचे 12 खासदारांचा यात समावेश आहे.
केंद्रीय सांस्कृतीक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडून शासन आदेश मंत्री उदय सामंतांना सुपुर्त करण्यात आला आहे.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा. सुत्रांची माहितीनुसार मुंबई महापालिकेत मैत्रीपूर्ण लढतीच्या विषयाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा.
विधानसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफीचा दिलेले आश्वासन पूर्ण करा,या मागणीचे पत्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.
तिसरे अपत्य जन्माला घातल्याने आपल्या नोकरीपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तांना मुकावं लागलं आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ही कारवाई केली आहे. श्रीनिवास दांगट (Shrinivas Dangat) असं कारवाई केलेल्या सहाय्यक आयुक्तांचं नाव आहे, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
New Delhi: एक देश एक निवडणूक (one nation one election) हे विधेयकावर आज जेपीसीची (JPC)पहिली बैठक होत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यावर जेसीपीची स्थापना केली आहे. लोकसभेचे 27 तर राज्यसभेचे 12 खासदारांचा यात समावेश आहे. 39 सदस्य असलेली ही समिती यावर चर्चा करुन त्यांचा अहवाल सभागृहात मांडणार आहे. महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे हे जेपीसीचे सदस्य आहेत.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील AC बसविण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे रविवारपर्यंतचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मागील वर्षी बालगंधर्व रंगमंदिरात देखभाल दुरुस्तीचे काम झाले होते. यानंतर रंगमंचावरील AC चालत नसल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी कलाकारांकडून करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एसी दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे.
सीईटीच्या परीक्षेच्या सुधारित वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार आता 9 एप्रिल ते 19 एप्रिल या दरम्यान ही परीक्षा होणार आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.
'देशाचं राष्ट्रगीत जन गण मन नाही तर वंदे मातरम पाहिजे' असं वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलं आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रोझोन मॉलमध्ये मिशन अयोध्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी आले होते, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.