
'ज्या महिलांचे अर्ज नियमित नाही. त्यांनी स्वत:हून नावे काढून घ्यावे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली करावी, असं मोठं वक्तव्य भुजबळांनी केलं आहे.
राज्यात आगामी महापालिका निवडणुकांचा बिगुल तीन महिन्यात वाजणार आहे.. पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शक्ती कायदा विधी मंडळाने मंजूर केला होता. सध्या महायुती ज्यांच्या सोबत आहे त्यांचंच सरकार केंद्रात आहे. जर ते तुमचं ऐकत असतील तर शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करायला सांगा, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आता तपास यंत्रणावर संशय व्यक्त करत सरकारला स्वतः ला संपवून घेण्याचा इशारा दिला आहे. तपास यंत्रणा आम्हाला तपासाबाबत कोणतीही माहिती देत नाहीत. ते काही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? तसेच खंडणी ते खून प्रकरणाचं कनेक्शन असून सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात यावा आणि सर्व आरोपींना 302 गुन्ह्यात घ्यावं, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. सर्व आरोपींवर खुनाचा गुन्ह्यात कारवाई केली नाही तर मी सोमवारी टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेईल, असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे.
भाजपच्या अधिवेशनामधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन्ही नेत्यांवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं. तर आता शहांच्या याच टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शहांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "गेल्या काही वर्षातील भाजपच राजकारण पाहिलं तर देशभरामध्ये त्यांनी पक्ष फोडाफोडीचे काम केलं आहे. महाराष्ट्रात देखील त्यांनी दोन पक्ष फोडले असून त्यांचे चिन्ह आणि नाव चोरण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. शहांच्या जीवनावर जेव्हा केव्हा पुस्तक लिहिण्यात येईल तेव्हा देशातील सर्वात मोठा फोडाफोडीचा जनक आणि घाणेरड्या राजकारणाला जन्म घालणारा नेता म्हणून त्यांची ओळख सांगितली जाईल."
शिर्डीती अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या तीन ते चार महिन्यात या निवडणुका होतील, आता कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांच्या तारखांचे संकेत दिले आहेत.
केवळ 100-200 नव्हे तर बीड जिल्ह्यातील सर्व 1200 शस्त्र परवाने रद्द करा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे करणार असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. शिवाय लोकांना धमकावण्यासाठी बंदूला लागतात का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तर बीडमधील दहशतीचं लोण संभाजीनगरपर्यंत पोहोचलं आहे. यांना फक्त मिरवण्यासाठी बंदूका दिल्या आहेत. त्यांना शस्त्र परवाण्याची गरज आहे का? असा प्रश्नही त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बनावट सही करून स्वतःला त्यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याचं सांगत एका व्यक्तीने लोकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर अजितदादांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. महाविजय अधिवेशनानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजप कोअर कमिटीची बैठक घेत आहेत. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि भाजपच्या संघटनात्मक विस्तारावर चर्चा होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
भाजपचे शिर्डीतील एकदिवसीय महाविजय अधिवेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणानंतर संपले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांचेही महाविजयाबद्दल आभार मानले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शिर्डीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. पंचायत ते पार्लमेंट असा नारा त्यांनी यावेळी दिली. विधानसभा निवडणुकीत विजय झाला असला तरी आता जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपला विजय मिळवून द्यायचा आहे, त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन शहांनी यावेळी केले.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. 2024 चा शेवट महाराष्ट्र भाजपने केला आणि आता 2025 मध्ये विजयाची सुरूवात दिल्ली भाजप करेल, असा विश्वास शाह म्हणाले. इंडिया आघाडीत फूट पडल्याचेही त्यांनी सांगितले.
2025 हे वर्ष भाजपसाठी महत्वाचे राहिल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. हरियाणा, सिक्कीम, महाराष्ट्रात सलग तिसऱ्यांदा भाजपला जनादेश मिळाला. ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली, आंध्र प्रदेशात एनडीएला पहिल्यांदाच बहुमत मिळाले, असे शाह यांनी सांगितले.
1978 पासून शरद पवारांनी दगाफटक्याचे राजकारण केले होते, त्याला 20 फुट जमिनीत गाडण्याचे काम तुम्ही केले आहे. उद्धव ठाकरेंना तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र आतापर्यंत अस्थिरतेचे राजकारण सुरू होते. आता स्थिर सरकार आले आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली.
अलीकडच्या काळात अनेकजण मंत्रालयात येतात. पण कामाशिवाय येऊ नका, स्टेट्स सिम्बॉल म्हणून येऊ नका. आपली विकासाची कामे पूर्ण केली जातील, असे आवाहन फडणवीस यांनी केले. इतरांपेक्षा आपली संस्कृती वेगळी आहे. ही संस्कृती सगळ्यांची लक्षात ठेवायची आहे, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याबाबतचा उल्लेख पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाराष्ट्र पाणीदार करायचा आहे. लाडकी बहीण, शेतकरी व इतर घटकांसाठी सुरू केलेल्या योजना पुढेही सुरूच राहणार आहेत. तसेच घोषणापत्रातून आश्वासनेही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांचा पराभव झाला असला तरी त्यांचे अराजक पसरवण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप फडणवीसांनी केला. अराजकतावादी ताकदांचा प्रयत्न हाणून पाडायचा आहे. असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महाविजय अधिवेशनात बोलताना विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कार्यकर्त्यांना दिले आहे. फडणवीसांनी मोदींना माधवाची तर कार्यकर्त्यांना केशवाची उपमा दिली. तसेच जिंकलो म्हणून सुखावलो, या अविर्भावात गेलो तर जनतेशी द्रोह असेल. त्यामुळे विजयानंतर त्याच ताकदीने मैदानात उतरून जनतेची सेवा करायची आहे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
भाजपच्या शिर्डीतील महाविजय अधिवेशनाला भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे आगमन झाले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे प्रभू श्रीरामाची मूर्ती देऊन सत्कार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषद सभापती राम शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजपचे मंत्री, आमदार, खासदार यावेळी उपस्थित होते.
अमरावतीतील नांदगाव एमआयडीसीतील कामगारांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. पाणी आणि अन्नातून विषबाधा झाल्याचे समजते. गोल्डन फायबर कंपनीतील सुमारे 100 हून अधिक कामगारांना उलट्यांचा त्रास होत आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्याची प्राथमिक माहिती आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यांतील भाजपच्या सर्व मंत्र्यांना महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. दर 15 दिवसांनी प्रत्येक मंत्र्यांनी खेड्यात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ज्योतिबा रस्त्यावर अपघातग्रस्तांना मदत केली. ज्योतिबा रस्त्यावरील घाटात चार चाकीला अपघात झाला होता. याच मार्गाने ज्योतिबाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातस्थळी थांबून अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कोल्हापूरला पाठवले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. खासदार सुळे या परभणीत दाखल झाल्या असून त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
कितीदा तेच तेच सांगायाचे. संतोष देशमुख खूनप्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यानंतरही आतापर्यंत ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे गेले. पण तुम्ही त्यांना पाठीशी घालता, असा आरोप होत आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले. तुझी चौकशी कधी होईल. तुझं नाव आल्यावरच ना असा सवाल अजितदादांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज भाजपच्या अधिवेशनाच्या निमित्ताने अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत आहे. शिर्डीला जाण्यापूर्वी अमित शाह हे शनिशिंगणापूरला जाणार आहेत. त्यामुळे अमित शाह यांचा नियोजित दुपारी साडेचारचा दौरा अलीकडे आला आहे. अमित शाह हे आता दुपारी शनि शिंगणापूरमध्ये दाखल होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या दौऱ्यामुळे शनिशिंगणापूरमध्ये कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अमित शाह हे शनि देवाच्या दर्शनासाठी येणार आहेत, काही वेळ भाविकासांठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शिर्डी येथे येणार आहेत. मात्र शाह यांच्या विरोधात आंबेडकरी जनता आक्रमक झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या अमित शाह यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्धार आंबेडकरी कार्यकर्त्यांनी घेतला आहे. श्रीरामपूर येथील कार्यकर्ते शिर्डीकडे जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. श्रीरामपूर पोलिस ठाण्यात त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. रिपब्लिकन पक्षाचे दीपक त्रिभुवन यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या वेळी कार्यकर्ते आणि पेालिसांमध्ये झटापट झाली.
भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शिर्डीतील महाविजय अधिवेशन स्थळी दाखल झाले आहेत. येताच नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात व्यासपीठावर संवाद रंगला होता.
संतोष देशमुख खूनप्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी ठळकपणे पुढे आली होती. एकट्या बीडमध्ये सुमारे साडेबाराशेच्या आसपास शस्त्र परवाना असल्याचे उघड झाले होते. त्यावरून बीडच्या जिल्हा प्रशासनावर टीका झाली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या बीड जिल्हा प्रशासनाने शस्त्र परवाना रद्द प्रकरणी मोठे पाऊल उचले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र परवाना रद्द करण्यासाठी 100 जणांना नोटीस पाठविली आहे. संबंधितांना तत्काळ शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते, परवाना निलंबित झाल्यानंतरही शस्त्र सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. वाल्मिक कराडलही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, तो सीआयडी कोठडीत असल्याने त्याला पोचली नाही. कोठडीबाहेर आल्यानंतर ती वाल्मिक कराडला देण्यात येणार आहे.
शरद पवार यांनी बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यावर आमदार सुरेश धस म्हणाले, "मला व्यक्तिगत पोलिस संरक्षणाची गरज भासत नाही. जनता हेच माझ सर्वस्व. आमचं बरवाईट करायचं असेल, तर कोणी कुठल्या पद्धतीने ही करू शकत. अंजली दमानिया यांनी कुणाच्याही फोनला घाबरण्याचे कारण नाही. ज्यांचा फोन येईल त्यांच्याबाबत तक्रार दाखल करा".
परळीच्या सौंदाना गावातील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्याबरोबर काल रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली. बोगस आणि अवैध राखेची लूट परळी भागात चालू आहे, याचा करिश्मा बघा. रात्री झालेली घटना घातपात की, अपघात याचा शोध अजून लागायचा आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. परळी विभागाची चर्चा महाराष्ट्रात सुरू असून सुद्धा राखेचे टीप्पर बंद नाहीत. या अवैद्य व्यवसायांना परळीचे पोलिस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी याला जबाबदार आहे.
भाजपच्या अधिवेशनाअगोदर आमदार सुरेश धस यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मी नेहमी साईबाबांच्या दर्शनाला येत असतो. माझ्या मतदारसंघातील जनतेला सुखी ठेव अशी प्रार्थना साईबाबांना केली. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आष्टी विभागाला पाणी दिला असून पाटोदा शिरूरला लवकरात लवकर पाणी द्यावं आणि आमचा मतदारसंघ सुजलाम सुफलाम व्हावा, अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केली.
शिर्डी अधिवेशनस्थळी भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ दाखल झाले आहेत. त्यांनी सदस्य नोंदणीसाठी असलेल्या कक्षाला भेट दिली.
भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहेत. त्यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून देखील डावलण्यात आले आहे. ते नाराज असल्याची चर्चा असतानाच, ते शिर्डी अधिवेशनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांनी सेल्फी घेण्यासाठी गराडा घातला.
तुमच्या टाळूची सगळी केसं गेली तरी तुम्हाला अजून अक्कलदाढ आली नाही का? रामदास कदम उद्धव साहेबांवर अरेरावीची भाषा करताय, तुम्हाला दात आलेत का? असे रामदास कदमांच्या टीकेला ठाकरे गटाच्या शरद कोळींने प्रत्युत्तर दिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास नागपुरात आज (ता.१२) सुरूवात झाली. यशवंत स्टेडियम येथे या महोत्सवाचे अभिनेत्री तथा खासदार कंगना राणावत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आजपासून 2 फेब्रुवारी पर्यंत हा क्रीडा महोत्सवास होणार असून यात जवळपास 80 हजार खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री वारंवार म्हणतात मी कोणाला सोडणार नाही. पण त्यांनी मुख्य आरोपीच मोका कायद्यातून बाहेर सोडला. अशीच राज्य करण्याची भाजपची पद्धत आहे. मुख्य आका आपल्या जवळ ठेवायचा आणि त्याच्या खालच्या लोकांवर कारवाई करायची.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात काही लोकांवर मोका लावण्यात आला पण वाल्मिक कराड याच्यावर मोका लावण्यात आला नाही. यावरून आता वाद उफाळला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली असून ते आपल्या वाक्याप्रमाणे वागत नसल्याचे म्हटले आहे. तसेच ते वाल्मिक कराड याला वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे.
इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असे मी म्हणालो नाही. काँग्रेसच्या नेत्यांना ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमुळे पक्ष मजबूत होतो. यामुळे स्वबळाचा नारा देण्याची पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी होती.
भाजपचे नवनियुक्त महाराष्ट्र कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, यांनी आपल्या नियुक्तीवरून प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी, कालच माझी कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. कालच मी साईबाबांचे दर्शनही घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेची सेवा करू. आपण सर्वजण समन्वयाने एकत्र काम करू. वरिष्ठ नेतृत्वाने आणि सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन.
स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकांसाठी तयार राहा म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणशिंग फुंकले. विधानसभेच्या निवडणुकांचे युद्ध जिंकलं असलं, तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. तसेच त्यांनी, भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांना कानमंत्र दिला.
महापालिका निवडणुकानंतर भाजप संघटनात्मक बांधणीसाठी 'भाकरी' फिरवणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. याचवेळी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना पक्षात बढती देण्यात आली आहे. चव्हाण यांची भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच अध्यक्षतेखाली होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंत्री बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचे स्पष्ट केले.
सोलापूरमध्ये मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत ट्रेनच्या काचा फुटल्या असून एक प्रवासी जखमी झाला आहे. ही दगडफेक पारेवाडी - वाशिंबे दरम्यान करण्यात आली आहे. धावत्या रेल्वेववर दगडफेक करण्याची ही १० दिवसांतली दुसरी घटना असल्याने आता आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अद्यापही एका आरोपीची अटक झालेली नाही. या प्रकरणात तपास यंत्रणांना यश आलेले नाही. त्यामुळे मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक झाले असून आज (ता.12) याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान याआधी देखील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
बीडसह राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने संताप व्यक्त केला जात असतानाच सौंदाना गावच्या सरपंचाचा मृत्यू झाला आहे. तर राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाने त्यांना उडवल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव अभिमन्यू क्षीरसागर असे असून मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. आता स्वबळाचे वारे महायुतीत देखील वाहताना दिसत आहेत. महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील स्वबळावर महापालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत पक्षातील जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी तसे वक्तव्य केलं आहे.
भाजपच्या शिर्डीतील महाविजय अधिवेशनाला आज सकाळी नऊ वाजता प्रारंभ होत आहे, या अधिवेशनाची ‘श्रध्दा, सबुरी अन् भाजपची महाभरारी’ अशी टॅग लाईन आहे. फडणवीसांची अजोड कामगिरी आणि ही टॅग लाईन हे या महाविजय अधिवेशनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यानिमित्ताने साईंची शिर्डी गजबजून गेली आहे. शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता अधिवेशनाचे उद्धघाटन होणार आहे.
जम्मू-काश्मीरचे आतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांची दिल्लीच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्तीसगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये विजय कुमार यांनी अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय कुमार यांच्या नियुक्ती महत्वाची मानली जाते.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. यातील सर्व आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबधीत असलेल्या वाल्मिक कराड याला मोक्का लावण्यात आलेला नाही, त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. देशमुख कुटुंबीयांसह भाजप आमदार सुरेश धस यांनी कराडला मोका आणि ३०२ लावण्याची मागणी केली आहे.
भाजपचे महाअधिवेशन आज शिर्डीत होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्यातील दिग्गज नेते तसेच मंत्री व आमदार अधिवेशनानिमित्त शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. भाजपचे हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियोजनाची जबाबदारी स्वीकारली असल्यामुळे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील गेल्या काही दिवसापासून अधिवेशनाची जय्यत तयारी करीत आहेत. अधिवेशनासाठी 15 हजार भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमून या ठिकाणी विचारांचे मंथन करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.