Maharashtra Political Update : अजितदादांचे शेवटच्या प्रवासाचे CCTV फुटेज जाहीर करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मोठी मागणी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव देण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. यासह आज 03 फेब्रुवारी 2026 रोजीच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama
Published on
Updated on

सुनेत्रा पवार यांनी घाई केली, ही गोष्ट खरी : आमदार चिखलीकर

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर त्यांनी घाई केली, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले यावर अनेकजण तर्कवितर्क लावत आहेत. मात्र घाई झाली आहे, नाही असं नाही. परंतु कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता सर्वांना सांभाळायचं असेल, तर कुटुंबाची सूत्रे कुणाच्या तरी हातात घ्यावी लागतात. त्यामुळे सर्वांच्या भावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारली असे आमदार चिखलीकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार यांचे अल्पशा आजाराने निधन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर येथील ॲपेक्स हॉस्पिटल रुग्णालय उपचार सुरू होते. अंत्यविधी उद्या बुधवार दि.४ फेब्रुवारी २०२६ रोजी मूळगावी उत्राने तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे होणार आहे.

लाडकी बहीण योजना २१०० रूपये घोषणा

ज्या घोषणा आम्ही आमच्या वचननाम्यात केलेल्या आहेत त्या योग्य वेळी त्याही देणार. कारण जो आम्ही वचननामा प्रसिद्ध केला आहे तो १०० टक्के पाळणार. त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. विरोधकांनी कितीही अफवा पसरविल्या तरी वाचननाम्यात जे वचन दिले आहे ते पाळणार !

नागपूर महापालिकेत आता स्वीकृत सदस्यांसाठी फिल्डिंग

नागपूर शहराचा नवा महापौर कोण होणार याची घोषणा भाजपने केली आहे. एवढेच नव्हे तर उपमहापौरांचे नावही जाहीर केले आहे. सहा फेब्रवारीला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. सर्वकाही निश्चित झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष स्वीकृत सदस्यांकडे लागले आहे. भाजपने बंडखोरी रोखताना अनेकांना स्वीकृतचे गाजर दाखवले आहे. काँग्रेसने सर्वच बंडखोरांना माघार घ्यायला लावली होती. त्यामुळे आता स्वीकृत सदस्यांसाठी मोठी फिल्डिंग लागली आहे.

काँग्रेसने दावा केल्याने संजय जाधव यांचे टेन्शन वाढले

महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसने एकत्रित लढत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या सत्ताधारी पक्षांना रोखले. खासदार संजय जाधव यांनी परभणी शहरातील जातीय समीकरण लक्षात घेत मुस्लिम उमेदवारांना मैदानात उतरवले. काँग्रेससोबत आघाडी करत बहुमतासह सत्ताही मिळवली. पण महापौर पदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसनेही दावा करत अर्ज दाखल केल्याने परभणीत ट्विस्ट आला आहे. महापौर पदावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये एकमत न झाल्याने आघाडीतील दोन्ही पक्षांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे संजय जाधव यांचे टेन्शन वाढले आहे.

अजितदादांचे शेवटच्या प्रवासाचे CCTV फुटेज जाहीर करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मोठी मागणी

अजित पवार यांचे 28 जानेवारीला अपघाती निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. यादरम्यान विमान अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या जात असून आता सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादांच्या शेवटच्या प्रवासाचे CCTV फुटेज जाहीर कराण्याची मागणी केली आहे.

बारामतीत बाबा अत्राम यांची सुनेत्रा पवार यांना सांत्वन भेट

आमदार बाबा अत्राम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची बारामती येथे सांत्वनपर भेट घेतली. बारामतीतील सहयोग सोसायटी येथे त्यांनी उपस्थिती लावून दुःख व्यक्त केले.

विलिनीकरणाच्या चर्चांना नवे वळण? प्रफुल्ल पटेलांची मोदी-शहांशी गुप्त भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीदरम्यान तिन्ही नेत्यांमध्ये सविस्तर आणि बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्या सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात असून, महाराष्ट्राच्या राजकारणात संभाव्य घडामोडींच्या चर्चांना वेग आला आहे.

परभणी महापौर निवडीत रंगत; 13 उमेदवार रिंगणात, राजकारण तापलं

राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता महापौर निवडीकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. मुंबई वगळता अनेक महापालिकांमध्ये महापौर निश्चित झाले आहेत. मात्र, चंद्रपूर आणि परभणी महापालिकेतील संख्याबळामुळे उत्सुकता वाढली आहे. परभणीत महापौरपदासाठी तब्बल 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक जागा असलेल्या उबाठा सेनेकडून सहा उमेदवार रिंगणात उतरले असून, कमी संख्याबळ असूनही काँग्रेसने महापौर आणि उपमहापौरपदासाठी दावेदारी केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

India-US ट्रेड डीलचा सकारात्मक परिणाम; शेअर बाजारात जोरदार उसळी

डोनाल्ड ट्रंप यांनी भारत-अमेरिका ट्रेड डील पूर्ण झाल्याची घोषणा करताच भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. दिवसभर बाजार ग्रीन झोनमध्ये राहिला. सेन्सेक्स 2072 अंकांनी वाढला, तर निफ्टीत 624 अंकांची भर पडली. या कराराबाबत ट्रंप यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे केवळ भारतच नाही, तर जागतिक बाजारही उत्साहात होते. जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांकही वेगाने वाढले.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी? आमदारांचा वाढता पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पक्षातील ३० हून अधिक आमदारांनी त्यांच्या नावाला स्पष्ट पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. या पाठिंब्यासाठी आमदारांकडून सह्या घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही मोजके आमदार वगळता बहुसंख्य आमदार सुनेत्रा पवार यांच्या बाजूने उभे असल्याचे चित्र आहे.

Lok Sabha session : काँग्रेसचे आठ खासदार निलंबित

संसदेच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मंगळवारी लोकसभेत जोरदार हंगामा झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याने काँग्रेसच्या आठ खासदारांना निलंबित करण्यात आले.

Sunetra Pawar News : पुणे व बीडच्या पालकमंत्रिपदी सुनेत्रा पवार

अजित पवार यांच्या निधनामुळे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. राज्य सरकारने या जिल्ह्यांची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर टाकली आहे. याबाबतचा शासन आदेश आज काढण्यात आला.

Praful Patel NCP : प्रफुल्ल पटेल विरोधकांवर हल्लाबोल; ...तर त्यांना लाज वाटली पाहिजे!

प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील जनतेकडून त्यांनी कधी एक मतही मिळवण्याचा प्रयत्नही केलेला नाही, ते लोक आमच्यासारख्या लोकांबद्दल उलट सुलट बोलतात, प्रचार करतात, चर्चा करतात, वक्तव्ये करतात, ते योग्य आहे का? 1952 पासून माझ्या वडिलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले, मी अनेकदा महाराष्ट्रातील जनतेकडून निवडून गेलो, आमच्याबद्दल आणि आमच्या पार्श्वभूमीबद्दल कमेंट करत असतील, तर त्यांना लाज वाटली पाहिजे, अशी गोष्टी ते करत आहेत, असंही पुढे पटेल म्हणाले आहेत.

Praful Patel Press : अर्थखात्याबाबत प्रफुल्ल पटेल यांचा मोठा; राष्ट्रवादीला खातं पुन्हा मिळणार?

अजितदादांना अर्थखात्याचा पूर्ण अनुभव होता. तुलनेत सुनेत्रावहिनी यांचा अनुभव लक्षात घेता, या वेळचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. हा तात्पुरता निर्णय असणार आहे, अशी आमच्यात चर्चा झाली आहे. पक्षात सर्व स्थिर स्थावर झाल्यानंतर, पुन्हा बसून निर्णय घेणार आहोत, असे प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत राज्याच्या अर्थखात्याविषयी म्हटलं आहे. पण अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे येईल का? यावर स्पष्ट बोलण्यास नकार दिला.

Praful Patel : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या रेसमध्ये मी नाही; प्रफुल्ल पटेल यांचा मोठा खुलासा

अजित पवार यांच्या निधनानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर कोण बसणार, यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच, प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला. "मी पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत, विधिमंडळ नेत्याच्या निवडीत, माझी देखील जबाबदारी आहे. परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये नाही," असा स्पष्ट खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

Mumbai Update : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरूणाला जबर मारहाण

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाचा मुजोरपणा समोर आला आहे. 'तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं' असं म्हणत त्यानं मराठी तरूणाला मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात सुशील रहेजाविरोधात गोंवडी पोलीस ठाण्यात मारहाण आणि एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sanjay Raut : छगन भुजबळांना देखील आहे शंका, संजय राऊतांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आता म्हणत आहेत, अजितदादा बसलेलं विमान घिरट्या घालत होतं आणि अचानक कोसळलं काहीतरी झालं असावं, यावर बोलताना संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, "मी वेगळं काय सांगतो आहे, फक्त माझी चूक एवढीच आहे की मी सगळ्यात आधी सांगितलं, आता हळूहळू लोक मानसिक दृष्ट्या स्थिर स्थावर झाल्यावर त्यावर विचार करत आहेत."

Gold rate Silver rate today : अमेरिकेने टॅरिफ कमी करताच उलथापालथ, सोने-चांदीच्या भावात मोठी उसळी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादण्यात आलेला आयात कर कमी करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. भांडवली बाजार उघडताच सेन्सेक्स 2200 आणि निफ्टी 700 अंकांनी वधारला. दुसरीकडे सोने आणि चांदीचे भावही वाढले. एक किलो चांदीचा दर तब्बल 20 हजारांच्या आसपास वाढले, तर सोन्याचा दर प्रतितोळा तब्बल साडेचार हजार रुपयांनी वधारला. यामुळे सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 48 हजार रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे.

Ajit Pawar son Parth Pawar : पार्थ पवार यांना राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची सहा वर्षांची पूर्ण टर्म असलेल्या जागेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. लवकरच राज्यसभेची ही जागा भरली जाईल. त्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याची माहिती आहे.

Maharashtra Latest News : हृदयद्रावक घटना! चौथीतील विद्यार्थी राहात्या घरी गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला

आरमोरी तालुक्यातील कोजबी इथं हृदयद्रावक घटना घडली असून जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय संस्कार विनोद कन्नाके हा बालक राहत्या घरी गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. संस्कारचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी शेजारील तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याकरिता गेलेले आहेत. घरी कोणीही नसल्याने संस्कार एकटाच राहत होता, अशी माहिती आहे.

Pandharpur ZP Election : शहाजी पाटील यांचा शेकापच्या कार्यकर्त्यांला तुरूंगात टाकण्याची धमकी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगोल्यात आमदार बाबासाहेब देशमुख विरुद्ध माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यामध्ये आता जुगलबंदी रंगली आहे. आमदार शहाजी पाटील‌ यांनी जाहीर सभेत शेकापच्या कार्यकर्त्यांला तुरूंगात टाकण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी ही पाटील यांना प्रति आव्हान दिलं आहे.

Wardha Update : वर्धा जिल्ह्यात 9 महिन्यांत 77 लाखांच्या 612 वीज चोऱ्या उघड

वर्धा जिल्ह्यात 9 महिन्यांत 77 लाखांच्या 612 वीज चोऱ्या उघड झाल्या आहेत. महावितरणच्या वर्धा मंडळाची वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबवली होती. अनधिकृत वीज वापर करणाऱ्या 16 ग्राहकांवर कार्यवाही करीत 591 ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महावितरणने नियमानुसार देयके आणि तडजोडीपोटी 16.48 लाखांचा दंड असे 93.85 लाखाचे देयक संबंधित ग्राहकांना आकारले आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज बेग यांची पक्षातून हकालपट्टी

राष्ट्रीय स्तरावर भाजपशी थेट संघर्ष करणाऱ्या काँग्रेस पक्षाने मालेगाव शहरात उफराटी भूमिका घेतली. याची माहिती मिळताच संतप्त काँग्रेस नेत्यांनी तातडीने हालचाल केली. त्यानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी याची गंभीर दखल घेत शहराध्यक्ष एजाज बेग यांची थेट हकालपट्टी केली आहे.

अमेरिकेकडून भारतावरील आयातशुल्कामध्ये कपात

अमेरिका भारतावरील आयातशुल्कामध्ये कपात करत असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केली. आता हे शुल्क २५ टक्क्यांऐवजी १८ टक्के असेल आणि त्याची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने लागू होईल, असेही ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण झाल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे.

IAS सत्यजित बडे यांची पुणे येथे दिव्यांग आयुक्तपदी नियुक्ती

रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे (IAS) यांची पुणे येथील दिव्यांग व्यक्तींसाठी आयुक्त या महत्त्वाच्या पदावर सोमवारी (ता २) नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजातील त्यांचा दीर्घ अनुभव आणि विकासाभिमुख कार्यपद्धती लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी बडे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही प्रभावीपणे काम पाहिले आहे.

कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा ठराव

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाला "अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज"असे नामकरण करण्याचा ठराव नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्या, अमोल मिटकरींची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने'ला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव देण्याची मागणी केली आहे. अजितदादांच्या दुरदृष्टीतून आलेल्या या योजनेला 'अजितदादांची लाडकी बहिण योजना' असं नाव देत त्यांच्या स्मृती सरकारने वेगळ्या पद्धतीने जपाव्यात अशी मागणी मिटकरींनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com