नांदेड : देगलूर-बिलोलीच्या पोटनिवडणूकीत (Deglur Biloli Bypoll Election Result) काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी ४२ हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विषेश म्हणजे गतवेळीच्या रावसाहेब अंतापूरकर यांच्यापेक्षाही जास्त मताधिक्य जितेश यांनी घेतले आहे. या निवडणूकीत भाजपने सुभाष साबणेंच्या रुपाने तगडे आव्हान उभे केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्वतःसह राज्यातील भाजप नेत्यांची फौज देगलूरमध्ये उतरवली होती. त्यामुळे काँग्रेस नेते आणि पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण त्यांनी जवळपास महिनाभर नांदेडमध्ये तळ ठोकून काँग्रेसची जागा कायम राखण्यात यश मिळवले आहे.
काँग्रेसने भाजपला दिलेल्या याच दणक्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) खूश झाल्या आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी अशोक चव्हाण यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच सोनिया गांधी यांनी विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर यांचेही फोनवरुन अभिनंदन करत त्यांच्या राजकीय आयुष्याला शुभेच्छा दिल्या आणि चांगले काम कराल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. सोनिया गांधींप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अशोक चव्हाण यांना फोन करून देगलूरच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दुपारी ३.३० वाजता पोटनिवडणुकीच्या मतमोजणीचा कल स्पष्ट होताच फोन करून अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले होते.
देगलूरचा विजय रावसाहेब अंतापूरकर यांना खरी श्रद्धांजली :
पोटनिवडणूकीतील विजयानंतर अशोक चव्हाण यांनी ट्विट करत जितेश अंतापूरकर यांचा दणदणीत विजय म्हणजे रावसाहेब अंतापूरकर यांना खरी श्रद्धांजली असल्याचे म्हंटले आहे. ४१ हजारांहून अधिक मताधिक्याचा हा विजय काँग्रेस व महाविकास आघाडीवरील महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतिक असून, मतदारांनी भाजपच्या द्वेषमूलक राजकारणाला चपराक लगावली आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.