Nashik News : महायुतीला लोकसभा निवडणुकीत 'मिशन 45' फेल झालं. भाजपच्या सोबतीला एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असतानाही महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. मराठवाड्यासह लोकसभा निवडणुकीत भाजपला आदिवासी पट्ट्यात सर्वाधिक फटका बसला आहे. बहुतांश आदिवासी राखीव मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. त्यामुळे आता भाजप सावध झाला आहे.
लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आदिवासी लोकप्रतिनिधी आणि नेत्यांची नुकतीच मुंबईत बैठक घेतली. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विशेष लक्ष घातले. आदिवासी समाजाच्या नाराजीचा फटका आगामी विधानसभेत बसू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे.
या बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध तक्रारी केल्या. आदिवासींचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे अशी मागणी केली. विशेषत: बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेतून काढण्यात यावे, यावर सदस्य आक्रमक होते. रिक्त होणाऱ्या जागांवर तातडीने आदिवासी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीनंतर विविध विभागांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्या दिल्या. आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरावर प्रकल्प कार्यालय निर्माण करणे, 'पेसा' अंतर्गत रिक्त जागा भरण्यात याव्यात, आदिवासी तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा यांसह विविध सूचना आणि मागण्यांवर यावेळी चर्चा झाली.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP) खासदारांची संख्या 23 वरून थेट 9 झाली आहे. महाराष्ट्र हे मोठे राज्य असल्याने त्याचा फटका भाजपला राष्ट्रीय स्तरावर बसला. याची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये, म्हणून पक्षाचे नेते खडबडून जागे झाले आहेत. संबंधित खात्याच्या प्रशासकीय यंत्रणांना सक्रिय केले जाणार आहे.
पक्षाने राष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेतली आहे. या संदर्भात राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, महामंत्री ॲड. माधुरी नाईक, रवींद्र अनासपुरे, प्रदेशाध्यक्ष उत्तमराव इंगळे, संयोजक ॲड. किशोर काळकर आदींसह विविध नेते या बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत शासकीय यंत्रणेला सक्रिय करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहे.
लोकसभा निवडणुकीत आदिवासी मतदारसंघांमध्ये भाजपची यंत्रणा नेहमीसारखी सक्रिय होती. मात्र तिचा आदिवासी समाजावर प्रभाव राहिलेला नाही, असे दिसले. आदिवासी विकास मंत्री डॉ गावित यांची कन्या डॉ. हिना गावित या मोठ्या फरकाने पराभूत झाल्या. याची या बैठकीत विशेष चर्चा झाल्याचे कळते. त्यामुळेच यापुढे आदिवासींना गोंजारण्याचे प्रयत्न पक्ष आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केले आहेत. तसे संकेत या बैठकीतून मिळाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.