

Ahilyanagar political controversy over press note : अहिल्यानगरमधील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहिल्यानगर जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला.
मात्र, या करारानंतर जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये झालेल्या बदलामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः पहिल्या प्रेस नोटमध्ये नसलेले आमदार संग्राम जगताप यांचे नाव सुधारित प्रेस नोटमध्ये समाविष्ट झाल्याने विखे पाटील-जगताप यांच्या राजकीय मैत्रीसंबंधात चर्चांना उधाण आले आहे.
अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) लष्करी स्टेशन हेडक्वार्टरचे ब्रिगेडियर सुनील कुमार आणि जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यावेळी उपस्थित होते.
करारानंतर जिल्हा प्रशासनाने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या सुरुवातीच्या प्रेस नोटमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हा करार झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर सुमारे दीड तासाने प्रशासनाकडून सुधारित प्रेस नोट पुन्हा प्रसारित करण्यात आली. या सुधारित मजकुरात आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. यामुळे प्रशासनाच्या प्रसिद्धीपत्रकातील बदल नेमका कशामुळे झाला, याची चर्चा स्थानिक माध्यमांमध्ये सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, प्रशासनाकडून सुधारित प्रेस नोट स्थानिक माध्यमांना आणि समाजमाध्यमांवर शेअर केली जात असतानाच विखे पाटील यांच्या माध्यम संपर्क यंत्रणेकडूनही ही माहिती प्रसारित करण्यात आली. मात्र, या माध्यमातून शेअर करण्यात आलेल्या मजकुरात प्रशासनाच्या सुधारित प्रेस नोटपेक्षा काही बदल असल्याचे दिसून आले. त्यात आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे प्रेस नोटमधील बदल आणि त्यामागील राजकीय संदर्भ यावरून स्थानिक राजकीय चर्चेला वेग आला.
प्रेस नोटमध्ये झालेल्या या बदलामुळे राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांच्यातील राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक राजकारणातील पूर्वीचे संदर्भ जोडून या घडामोडीकडे वेगवेगळ्या राजकीय अँगलने पाहिले जात आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या प्रसिद्धीपत्रकात अल्पावधीत झालेल्या बदलामुळे, प्रशासनावर असलेल्या राजकीय सर्वसमावेशकतेची बाजू देखील यानिमित्ताने समोर आली आहे. याबाबतही स्थानिक माध्यमांमध्ये याबाबत वेगवेगळ्या अँगलने चर्चा होत आहेत.
दरम्यान, राजकीय चर्चेपलीकडे पाहता भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी झालेला हा करार अहिल्यानगरच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जतन करून त्याचा योग्य पद्धतीने पर्यटन विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकतात. ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, किल्ल्याचा नियोजनबद्ध विकास आणि भावी पिढ्यांसाठी हा वारसा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.