

Sangamner political meeting : "विधानसभा निवडणुकीपूर्वी मी अमोल खताळ यांना ओळखत देखील नव्हतो. पण त्यांचे काम पाहिल्यावर मला विश्वास बसला. म्हणूनच मी स्वतः मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे साहेबांकडून त्यांच्यासाठी 'एबी' फॉर्म आणला.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला समोरे जाताना महायुती म्हणून जायचे आहे. उमेदवारीचा निकष जनाधारावर आणि कार्यावर आधारित असेल, केवळ नेत्याशी जवळीक किंवा रोज भेटीगाठीवर नसेल," असे भाजपचे माजी खासदार डाॅ. सुजय विखेंनी सांगताच, नेत्यांभोवती पिंगा घालणाऱ्या अनेक इच्छुकांच्या पोटात गोळाच आला.
संगमनेर (Sangamner) इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुजय विखे आणि शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली झाला. भाजपचे भीमराज चतर, मंडलाध्यक्ष श्रीकांत गोमासे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कपिल पवार, आरपीआयचे आशिष शेळके उपस्थित होते.
सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी “काही जण विविध कारणांनी दूर गेले असतील, पण आपण सर्वजण संगमनेरच्या अस्मितेसाठी एकत्र आहोत आणि राहू. संघटनात्मक निवडणुकीत कोणतीही व्यक्ती एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. पुढील दोन दिवसांत आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती स्थापन केली जाणार असून सर्व उमेदवारांच्या निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील घेतील."
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भोजापूर चारीला निधी मंजूर झाला आहे. साकूर भागासाठी उपसा सिंचन योजनेची अंमलबजावणी जलसंपदा विभाग करत आहे. विधानसभा निवडणुकीत पाण्याचे गांभीर्य लोकांनी अनेक सभांमधून समोर आणले. निवडणूक झाल्यानंतर सर्व परिस्थिती बदलल्याचे चित्र तुम्ही पाहिले आहे, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले.
उमेदवारीचा निकष नेत्याच्या जनाधारावर आणि कार्यावर आधारित असेल, केवळ नेत्याशी जवळीक किंवा रोज भेटीगाठीवर नसेल, असे सांगताना, आमदार अमोल खताळ यांचे उदाहरण देताना, “मी त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी ओळखतही नव्हतो. पण त्यांच्या कामावर मला विश्वास होता. म्हणूनच मी स्वतः मुंबईत जाऊन एकनाथ शिंदेसाहेबांकडून त्यांच्यासाठी एबीफॉर्म आणला. चिन्ह काहीही असो, पण आपल्याला महायुती म्हणून एकजुटीने लढायचे आहे,” असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
संघटनात्मक निवडणुकीत जो त्याग करेल त्याचा सन्मान होईल. ज्यांना यावेळी तिकीट मिळणार नाही, त्यांनीही निस्वार्थ भावनेने संघटनेसाठी काम करावे. पुढील काळात त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, अशी ग्वाही डाॅ. सुजय विखे पाटीलांनी कार्यकर्त्यांना दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे महायुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही विखे पाटील यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.