

Ahilyanagar farmers protest : आकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यासमोर ऐतिहासिक 'जेलभरो' आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे.
यावेळी केवळ घोषणाबाजी न करता, शेतकऱ्यांनी चक्क पोलिस ठाण्याच्या दारासमोरच चुली पेटवून प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरवात केली. या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असून शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.
शेतकरी (Farmer) संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. महिलांनी भर उन्हात पोलिस ठाण्याच्या आवारातच पीठ मळून भाकरी थापल्या अन् चुलीवर स्वयंपाक रांधला. पोलिस ठाण्याच्या दारातील या चूल मांडून केलेल्या आंदोलनाने श्रीरामपूरसह राज्याचे लक्ष वेधून घेतले.
आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असून, यापूर्वीच्या 'आत्मक्लेश' आंदोलनानंतरही सरकारला (Government) जाग न आल्याने शेतकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. हजारो शेतकऱ्यांनी यावेळी "आकारी पडीत जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या" अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनामुळे पोलिस ठाणे परिसरात तणावपूर्ण शांतता असून, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, आपला स्वयंपाक आणि ठिय्या मांडून बसलेले शेतकरी मागण्या मान्य झाल्याशिवाय हटणार नाहीत, असे अजित काळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान या आंदोलनात खासदार नीलेश लंके यांनी जमिनीच्या व्यवहारावर घेतलेली प्रेस चर्चेत आली आहे.
याच श्रीरामपूर तालुक्यातील जमीन व्यवहार आणि ZR 2 बायो एनर्जी कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवरून खासदार नीलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच, व्यवहाराची ED आणि CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नीलेश लंके यांनी दावा केला होती की, श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 4 हजार एकर शेती महामंडळाची जमीन ZR 2 बायो एनर्जी कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू होती. ही जमीन खासगी कंपनीला देण्यामागे राजकीय हस्तक्षेपाचा संशय आहे. यासाठी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यासोबतच ZR 2 कंपनीच्या खात्यात अवघ्या एका महिन्यात 100 कोटी रुपये जमा झाल्याचा दावा खासदार लंके यांनी केला. हा पैसा हवाला मार्गानं आला असण्याची शक्यता व्यक्त करताना, व्यवहारांची सखोल चौकशीची मागणी केलेली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित ही कंपनी आहे. याच कंपनीसाठी ही 4 हजार एकर जमीन मागण्यात आली आहे. अजित ढोकणे हे विखे पाटील यांचे जावई असून, कंपनीचे संचालक होते. शीतल पुरव या कंपनीच्या सेक्रेटरी होत्या, त्यांनी अनियमिततेमुळे राजीनामा दिला. तुम्ही जमीन दिली नाही, पण मागणी तर केली होती ना? असा सवालही त्यावेळी खासदार लंकेंनी केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन देत खासदार लंकेंनी या व्यवहाराच्या चौकशी मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.