Sangram Jagtap : कोणालाच न बधणारे पानसरेंना संग्रामभैय्या घेऊन जाताच, मंत्री विखेंची तनपुरेंना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात एन्ट्री; बिनविरोधची 'इनसाइड स्टोरी'

Sangram Jagtap's Key Role in Ahmednagar Unopposed Poll Story: अजित पवार राष्ट्रवादीचे दत्तात्रय पानसरे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेताच, महायुतीचे भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाल्याने नेत्यांभोवती सुरू असलेला 'हायव्होल्टेज ड्रामा' थांबला.
Sangram Jagtap and Vikhe Patil meeting
Sangram Jagtap and Vikhe Patil meetingSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Legislative Council Election: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम क्षणापर्यंत प्रचंड राजकीय नाट्य रंगले. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्याचे नेते दत्तात्रय पानसरे हे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम होते.

माघार नाही, निवडणूक लढणारच, असा त्यांचा स्पष्ट पवित्रा होता. मात्र, अखेर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला आणि भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

दुपारी तीननंतर जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय घडामोडींना वेग आला. दत्तात्रय पानसरेंची समजूत काढण्यासाठी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी पानसरे यांच्याशी बंद दालनात सविस्तर चर्चा केली.

काही वेळानंतर दोघेही एकत्र बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींचे संकेत मिळू लागले. दरम्यान, भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. याच टप्प्यावर निवडणुकीचे संपूर्ण चित्र बदलले आणि बिनविरोध निवडीचा मार्ग जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले.

याआधी माध्यमांसमोर बोलताना दत्तात्रय पानसरे यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मी स्वतः उपस्थित राहिल्याशिवाय माझा माघारीचा अर्ज वैध धरू नये, असे पत्र आधीच दिले होते. माझ्या नावाने सादर करण्यात आलेल्या अर्जावरील सही माझी नाही, असा दावा त्यांनी केला.

आई-वडिलांची आणि सर्व नगरसेवकांची (Corporators) शपथ घेऊन सांगतो, ती सही माझी नाही. जर जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केले असेल तर मी आत्मदहन करीन, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. या विधानामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

Sangram Jagtap and Vikhe Patil meeting
Sangram Jagtap NCP : महायुतीतच धुसफूस; राष्ट्रवादीच्या हातातली जागा गेली, दिग्गज भाजपसमोर जगताप समर्थकांची नाराजी कितपत टिकणार?

पानसरे यांनी याचवेळी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही जाहीर केला. त्यांना माझा राजीनामा हवा होता ना, तर घ्या हा राजीनामा, असे सांगत त्यांनी पदाचा त्याग केला. मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांचा कार्यकर्ता आहे.

पक्षाने मला उमेदवारी भरण्याचे आदेश दिले नव्हते. मात्र 461 मतदारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. माझा उमेदवारी अर्ज वैध मानल्याशिवाय मी येथून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती.

Sangram Jagtap and Vikhe Patil meeting
Dattatray Pansare On Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरेंना वाड्या बाहेर पडावंच लागेल! दत्तात्रय पानसरेंना मंत्री विखेंकडून पुढच्या आमदरकीचा शब्द!

पानसरेंच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीच्या गोटातही अस्वस्थता वाढली होती. प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित असल्याचा दावा करणाऱ्यांची धावपळ सुरू झाली. विशेषतः बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करणारे आमदार संग्राम जगताप यांच्यासमोरही मोठे आव्हान उभे राहिले होते. पानसरे आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील बंद दालनात चर्चा झाली. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघत नसल्याचे दिसताच तनपुरे तेथून निघून गेले.

त्यानंतर पुन्हा एकदा संग्राम जगताप यांनी पुढाकार घेत पानसरे यांच्याशी चर्चा सुरू केली. या चर्चेत पानसरेंचे निकटवर्तीय बाळासाहेब नाहाटा आणि विकी जगताप यांचाही सहभाग होता. बराच वेळ खलबते सुरू राहिल्यानंतर अखेर सर्वांना मान्य होईल असा तोडगा निघाला.

संग्राम जगताप पानसरे यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडताच निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत मिळाले. काही वेळानंतर पानसरे यांनी स्वतः उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा करून त्यावर शिक्कामोर्तब केले.

फडणवीस-पार्थ पवार चर्चेचाही उल्लेख

माघारीची घोषणा करताना दत्तात्रय पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. त्यामुळे या संपूर्ण घडामोडींमध्ये राज्यस्तरीय नेतृत्वाचीही भूमिका असल्याची चर्चा रंगली.

संग्राम जगताप यांचे वाढले वजन

या संपूर्ण राजकीय नाट्यात दत्तात्रय पानसरे यांची समजूत काढून निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी निर्णायक भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महायुतीमध्ये त्यांचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात असून, आगामी काळातील जिल्ह्यातील सत्तासमीकरणांमध्ये त्यांचा प्रभाव अधिक मजबूत होण्याचे संकेत या घडामोडींनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com