

Ahilyanagar MLC Election : अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाची जागा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असताना पक्षाने यशस्वीपणे लढवली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही जागा सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला जाईल, अशी अपेक्षा स्थानिक नेत्यांना होती.
मात्र, महायुतीतील जागावाटपात भाजपने या मतदारसंघावर दावा करत उमेदवारीही जाहीर केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःच्या पारंपरिक प्रभावक्षेत्रातील जागेवर पाणी सोडावे लागल्याची भावना पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादीची (Ajit Pawar NCP) अस्वस्थता आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. ही नाराजी पेल्यातील वादळ ठरणार की, पुढे राजकीय डोकेदुखी निर्माण करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आमदार संग्राम जगताप समर्थक पुढे येऊन नाराजी व्यक्त करत असले, तरी स्वतः जगताप अद्याप समोर आलेले नाहीत, हे विशेष! समर्थकांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर कोणतेही भाष्य केलेलं नाही. यामुळे जगताप समर्थकांच्या नाराजीला अजून म्हणावी तेवढी धार चढलेली नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासांत त्यांना अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली. तनपुरेंच्या या झपाट्याने झालेल्या राजकीय पुनर्स्थापनेमुळेच अजित पवार राष्ट्रवादीतील काही नेत्यांमध्ये आणि विशेषतः आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांनी प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिपदाची संधी दिली होती. तुलनेने नवखे असतानाही तनपुरेंना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यावेळी जिल्ह्यातील अनुभवी नेते आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना डावलल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये होती. त्याबाबतची नाराजी अजित पवार यांच्यापर्यंतही पोहोचल्याचे सांगितले जाते.
संग्राम जगताप हे तिसऱ्या टर्मचे आमदार आहेत. जिल्ह्यातील मजबूत जनाधार आणि संघटनात्मक ताकद असूनही त्यांना अद्याप मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आधीपासूनच नाराजी होती. त्यातच भाजपमध्ये प्रवेश करताच प्राजक्त तनपुरेंना विधान परिषद उमेदवारी मिळाल्याने ही अस्वस्थता आणखी वाढल्याचे चित्र आहे. पुढे तनपुरेंना मोठी राजकीय जबाबदारी मिळू शकते, अशा चर्चांमुळेही जगताप समर्थकांमध्ये नाराजी वाढली आहे.
ही नाराजी आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे. जगताप यांचे कट्टर समर्थक गणेश भोसले यांनी राजकीय वर्तुळात भूमिका मांडत पक्ष नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील असंतोषाची चर्चा अधिक रंगू लागली आहे.
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याच्या राजकारणात संग्राम जगताप यांनी गेल्या काही वर्षांत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अजित पवार राष्ट्रवादी राहूनही त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेत जिल्ह्यासह महाराष्ट्रात राजकीय संपर्क वाढवला. महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू असतानाच राजकीय समीकरणे बदलली आणि ती शक्यता मागे पडली.
विशेष म्हणजे, हीच विधान परिषद जागा राष्ट्रवादी एकत्रित असताना दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांनी दोन वेळा जिंकली होती. त्यामुळे या मतदारसंघाशी जगताप कुटुंबाचा जुना संबंध आहे. अशा परिस्थितीत ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. ते प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का? दाखल केल्यास शेवटपर्यंत मैदानात राहणार का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र त्यांच्या हालचालींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
याचवेळी काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर अप्रत्यक्ष टीका करत पक्ष नेतृत्वाने स्थानिक निष्ठावंतांपेक्षा इतरांना प्राधान्य दिले, असा सूर लावला आहे. त्यामुळे असंतोष केवळ कार्यकर्त्यांपुरता मर्यादित नसून संघटनात्मक पातळीवरही असल्याचे संकेत मिळत आहेत.
आता सर्वांचे लक्ष आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या समर्थकांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. महापालिकेत भाजपसोबत सत्तेत असलेला अजित पवार राष्ट्रवादी विधान परिषद निवडणुकीतही महायुतीतील भाजपसोबत ठामपणे उभा राहणार की, स्वतंत्र राजकीय संदेश देणार, हा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीने अहिल्यानगरच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. मात्र जगताप यांच्या समर्थकांची नाराजी प्रत्यक्ष राजकीय बंडात रूपांतरित होते की, पेल्यातील वादळ राहते, याचे उत्तर उमेदवारी अर्जांच्या अंतिम टप्प्यात आणि पुढील काही तासांतील घडामोडींमध्ये मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.