
Ahilyanagar municipal controversy : अहिल्यानगर महापालिका आयुक्त यशवंत डांगे आणि माजी नगरसेवक आसिफ सुलतान यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. आसिफ सुलतान थेट आयुक्त डांगेंच्या दिशेने धावून गेले. डांगेंनी देखील जशास-तसं प्रत्युत्तर दिलं. सुलतान-डांगे यांच्यातील वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिलेदारांनी उडी घेतली.
सुलतान यांनी डांगेंबरोबर घातलेल्या वादाला 'जिहादी' प्रवृत्ती म्हणत, निषेध केला. तसंच, डांगेंचा भगवी शाल घालून सत्कार करत, डांगेंच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी म्हटले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी आमदार जगताप यांनी काही दिवसापूर्वी यशवंत डांगे यांच्या प्रशासनाला 'हाजी' म्हणत टिका केली होती.
अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागातील मंजूर कामे वर्षभरापासून रखडल्याच्या मुद्यावरून निवेदन देण्यासाठी माजी नगरसेवक आसिफ सुलतान व महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या खडाजंगी झाली. प्रशासन राजकारण व जातीयवाद करत असल्याचा आरोप सुलतान यांनी करत आयुक्तांच्या दिशेने धावून गेले. यातून डांगे अन् सुलतान यांच्या चांगलीच शाब्दिक चकमक झाली.
आसिफ सुलतान यांच्या मोठ्या आवाजावर आयुक्त (Commissioner) यशवंत डांगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'तुम्हाला वस्तुस्थिती सांगूनही आवाज चढवून बोलता ही स्टंटबाजी आहे,' अशा शब्दात आयुक्तांनी आसिफ सुलतान यांना सुनावले. सरकारकून दुसऱ्या टप्प्याचा निधी आलेला नाही. त्यामुळे कामं थांबली आहेत. ही वस्तुस्थिती सांगून लक्षात येत नाही, अशा शब्दात डांगेंनी सुलताना यांना सुनावल्याने काहीसा तणाव निर्माण झाला.
आसिफ सुलतान यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "कामांसाठी आलेला निधी हा कोणाच्या बापाचा नाही. इतरत्र कामे होतात. राजकारण करून तुम्ही आमच्या भागातील कामे थांबवता. तत्काळ कामे सुरू न केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासू नाही तर बांगड्या भरू," असा इशारा दिला.
यशवंत डांगे अन् आसिफ सुलतान यांच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांच्या शिलेदारांनी उडी घेतली. आसिफ सुलतान यांनी घातलेल्या वादाला जिहादी प्रवृत्ती म्हणत, त्याचा निषेध केला. यशवंत डांगेंनी दिलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक करत, भगवी शाल अन् पुष्पगुच्छ देत सत्कार केला. हिंदुत्ववादी संघटना, अशा जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्याचे काम करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयुक्त यशवंत डांगे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचे पक्षा शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी सांगितले.
माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र अशा पद्धतीने हातवारे करणे धिंगाणा घालणे हे चुकीचे आहे. तरी सर्वांनी तारतम्य बाळगणे गरजेचे आहे, असे म्हटले. माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी रस्ता काँक्रिटीकरणाचे कामे सुरू आहे. यात थडगे अथवा धार्मिक स्थळे येत असून त्याची अतिक्रमणे तातडीने काढावीत, अशी मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयुक्त यशवंत डांगे यांना पाठिंबा देताना सत्कार केला. परंतु काही दिवसापूर्वी शहरातील कोठला बसस्थानक परिसरातील रस्त्यांवर गोमांस फेकण्यावरून आमदार संग्राम जगताप भाजप आमदार विक्रम पाचपुतेंसह चांगलेच आक्रमक झाले होते. हिंदुत्वादी संघटनांबरोबर रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाली होते. आमदार जगताप यांनी या आंदोलना दरम्यान, अहिल्यानगर शहरातील अनधिकृत्त कत्तलखान्यांवर कारवाईची मागणी करताना, आयुक्त यशवंत डांगे यांच्या प्रशासनावर आगपाखड केली होती. डांगे यांच्या प्रशासनाला 'हाजी प्रशासन' म्हणत टिका केली होती. यावेळी हिंदुत्वावादी संघटनांनी आंदोलनस्थळी आलेल्या आयुक्त डांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. 'अब्दुल' डांगे मुर्दाबाद, अशी घोषणाबाजी केली होती.
आता माजी नगरसेवक आसिफ सुलतान यांच्याबरोबर आयुक्त यशवंत डांगेंच्या झालेल्या वादावर, आमदार संग्राम जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शिलेदारांनी डांगेंना पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दुहेरी भूमिकेची शहरात चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.