

Ahilyanagar news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील भ्रष्टाचाराविरोधात गाजलेली एक घोषणा, 'ना खाऊंगा, ना खाने दूंगा'! याच विचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचा प्रशासकीय कारभार चालवतात. पण पाथर्डी इथल्या पंचायत समितीच्या आढावा बैठकीत, ग्रामस्थांनी भाजप आमदार मोनिका राजळे यांच्यासमोर, अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कामे करत नाहीत, असा गंभीर आरोप केला.
या मुळे देवाभाऊंच्या सरकारमध्ये ‘ना खाऊंगा’चा फुसका फुगा निघाल्याची चर्चांनी अहिल्यानगरमध्ये जोर धरला आहे. पाथर्डीमधील या प्रशासकीय आढाव्याच्या बैठकीची आणि त्यात ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांची खमंग चर्चा रंगली आहे.
भाजप (BJP) आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थित पंचायत समितीची आढावा बैठक झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांसह तालुक्यातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कामे मार्गी लावत नाही, असा दावा केला. त्यामुळे बैठकीच्या सुरवातीलाच खळबळ उडाली.
विहीर असो, गायगोठा असो किंवा घरकुल मंजूर करण्याचा प्रस्ताव असो, पैसे घेतल्याशिवाय कामे मार्गी लागत नाही, पैसे देऊनही काम होईलच याचीही शाश्वती नाही. अधिकाऱ्यांनीच आता कोणत्या कामाला किती पैसे द्यावे, याचे रेटकार्ड जाहीर करावे, अशा शब्दांत विविध गावच्या ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या कारभाराचे आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्यासमोर वाभाडे काढले.
अंकुश कासुळे यांनी पंचायत समितीमधील अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कामेच करत नाही. कोणत्या कामाला किती पैसे लागतील याचे रेटकार्ड त्यांनी जाहीर करावे, अशी मागणी केली, तर श्रीकांत खेडकर यांनी गावातील विधवेला घरकुल मंजूर झाले आहे. मात्र, घरकुलाचा हप्ता मिळावा म्हणून अधिकाऱ्यांनी तिच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केला.
पाथर्डीतील भगवानगड पाणी योजनेचे काम संथ गतीने सुरू असून, पिण्याचे पाणी कधी मिळणार असा सवाल लाभार्थी गावातील ग्रामस्थांनी केला, तर जलजीवन मिशनअंतर्गत अनेक गावांमध्ये कामे अर्धवट झाली आहेत, पाइपलाइन टाकली . मात्र , पाण्याच्या टाक्या उभारलेल्या नाहीत. टाक्या असूनही वीजजोडणी नसल्याने पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यावर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामकाजात सुधारणा करावी; अन्यथा मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, मी आढावा बैठक घेऊनही गटविकास अधिकारी आल्या नाहीत, ही बाब गंभीर असल्याचे आमदार मोनिका राजळे म्हणाल्या.
पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव ते धामणगाव या रस्त्याचे काम पूर्ण न करताच बिल अदा केले असल्याचे लक्षात येताच आमदार राजळे यांनी या विषयवार मी स्वतः जिल्हा परिषदेमध्ये तक्रार करणार असल्याचे जाहीर केले. या बैठकीत जालिंदर दहिफळे यांनी, गावातील खडीक्रशरला ग्रामपंचायतीने दंड भरण्याची नोटीस बजावली होती. मात्र, खडीक्रशरच्या मालकाने विस्तार अधिकारी दत्तात्रय रानमळ यांच्याकडे अपील दाखल केले. तीन वर्षे झाले तरी, सुनावणीही घेण्यात आली. यावर पंधरा दिवसांत निकाल द्या, असा आदेश राजळे यांनी केला.
आमदार राजळे यांनी पंचायत समितीमधील प्रत्येक तक्रारीवर अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली याचा लेखी अहवाल सादर करावा; अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला. प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, नगराध्यक्ष अभय आव्हाड, मंगल कोकाटे, विष्णुपंत अकोलकर, अंकुश कासुळे, रवींद्र वायकर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.