
Rahuri Sugar Factory Results : राहुरीमधील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाने एकतर्फी दणदणीत विजय मिळविला. जनसेवा मंडळाचे सर्व 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
विरोधी शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समितीच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. या विजयाबरोबरच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे देणाऱ्या गोड बातमीची उत्सुकता शिगेली पोचली आहे.
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने ही निवडणूक लढवली.
शेवटच्या टप्प्यात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी कारखाना निवडणुकीत सूचक विधान करताना, विजयी करा अन् आठवड्यात आताच गोड बातमी देतो, अस म्हटलं होतं. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालानंतर प्राजक्त तनपुरेंच्या भूमिकेची उत्सुकता वाढली आहे.
तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी (Farmers) विकास मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अमृत धुमाळ, प्रदेश सदस्य अजित कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्या नेतृत्वाखाली कारखाना बचाव कृती समितीचे पॅनल उभे ठाकले होते. एकूण 21 हजार 283 पैकी 12 हजार 662(59.49 टक्के) मतदान झाले होते.
राहुरी महाविद्यालयात मतमोजणी झाली. पहिल्या फेरीत सर्वसाधारण मतदारसंघाच्या कोल्हार, देवळाली प्रवरा व टाकळीमिया गटापासून मतमोजणीस प्रारंभ झाला. तेव्हापासून जनसेवा मंडळाच्या उमेदवारांनी 2500 पेक्षा जास्त मताधिक्याने आघाडी घेतली. त्याचवेळी मतदारांचा कल समोर आला. जनसेवा मंडळाच्या दणदणीत विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू झाली.
'जनसेवा मंडळावर सभासदांनी विश्वास टाकला आहे. हा विश्वास सार्थ ठरवू. बंद पडलेला कारखाना चालविणे अवघड आहे. हे मोठे आव्हान आहे. परंतु हे शिवधनुष्य उचलण्याची जबाबदारी जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे यांनी स्वीकारली आहे. हंगाम सुरू करण्याला प्राधान्यक्रम राहील', अशी प्रतिक्रिया माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी दिली.
'जनसेवा मंडळावर सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत. मतदान करणाऱ्या सभासदांचा उत्साह वाखणण्यासारखा होता. काही मान्यवरांनी बऱ्याच प्रकारे मदत केली, त्यांचेही आभार मानतो. हे ऋण राहुरी तालुका विसरणार नाही', असे जनसेवा मंडळाचे प्रमुख अरुण तनपुरे यांनी म्हटले.
'मतदारांनी विरोधात दिलेला कौल स्वीकारला आहे. जनसेवा मंडळाने येत्या वर्षभरात कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करावा. त्यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील. शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीच्या समस्या सोडवाव्यात. शेतकरी, कामगारांना न्याय द्यावा', अशी भूमिका शेतकरी विकास मंडळाचे राजूभाऊ शेटे यांनी मांडली.
सभासदांच्या मालकीचा कारखाना
'मतदारांनी दिलेला कौल नम्रपणे स्वीकारला आहे. उच्च न्यायालयात संघर्ष करून कारखाना जिवंत ठेवला. सभासदांच्या मालकीचा राहिला. सभासदांना मतदान करता आले, याचे समाधान आहे', असे कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ यांनी म्हटले.
सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती मतदार संघातील कोल्हार गटात अशोक उऱ्हे 7 हजार 329 आणि ज्ञानेश्वर कोळसे 6 हजार 909. देवळाली प्रवरा गटात अरुण ढूस 6 हजार 874, कृष्णा मुसमाडे 6 हजार 747 आणि भारत वारुळे 6 हजार 554. टाकळीमिया गटात मीना करपे 7 हजार 237, ज्ञानेश्वर खुळे 7 हजार 81, ज्ञानेश्वर पवार 6 हजार 215. आरडगाव गटात प्रमोद तारडे 6 हजार 983, वैशाली तारडे 6 हजार 711 आणि सुनील मोरे 6 हजार 786.
वांबोरी गटात किसन जवरे ७ हजार ४२४ आणि भास्कर ढोकणे 7 हजार 333. राहुरी गटात जनार्दन गाडे 6 हजार 674. "ब" वर्ग सहकारी संस्था मतदार संघात हर्ष तनपुरे 128, अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघात अरुण ठोकळे 7 हजार 236, महिला प्रतिनिधी मतदार संघात सपना भुजाडी 6 हजार 786 आणि जनाबाई सोनवणे 6 हजार 565, इतर मागासवर्ग मतदार संघात रावसाहेब तनपुरे 7 हजार 137, भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग मतदार संघात अशोक तमनर 7 हजार 587.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.