
Manikrao Kokate Vs Rohit Pawar : भाजप महायुती सरकारमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या कृतीमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या अडचणीतून दूर होण्यासाठी दोघेही मंत्री धार्मिक अन् अध्यात्मिकतेकडे वळाले आहेत.
मंत्री शिरसाट यांनी अहिल्यानगरमधील शनि देवाला सहकुटुंब तेल अभिषेक केल्यानंतर आज मंत्री कोकाटे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ इथल्या शनि मंदिरात जात दर्शन अन् पूजा केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बोचरी टीका केली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत, '‘तुम्ही चुका करा मी तुमच्या पाठीशी आहे’, असं शनिमहाराज कधीही सांगत नाहीत, तरीही चुका करून अडचणीत सापडल्यानंतरच भल्याभल्यांना शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते', असा टोला लगावला आहे.
'स्वार्थासाठी कोणत्याही मंत्र्याने शनिदेवाला कितीही तेलाचा अभिषेक केला, तरी राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या कृषि विभागाला आणि मागासवर्गीय समाजाच्या समाजकल्याण विभागाला लागलेली पिडा आणि ती लावणारे या दोघांनाही दूर कर, अशी मी शनिमहाराजांना प्रार्थना करतो'!, असे म्हणून आमदार पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि मंत्री संजय शिरसाट या दोघा मंत्र्यांना डिवचलं आहे.
नंदुरबारमधील शनिमांडळ शनि मंदिर देशातील एकमेव साडेसाती मुक्तपीठ म्हणून ओळखले जाते. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरवात याच मंदिराच्या दर्शनापासून केले आहे. शनि देव हा राजकीय क्षेत्राचा गुरू मानला जात असल्याने त्यामुळे अनेक राजकीय नेते, या ठिकाणी येतात. एनसीपी मंत्री माणिकराव कोकाटे देखील चांगलेच अडचणीत आले आहेत.
शनिमांडळ इथल्या शनि मंदिरात, संकटात सापडलेल्या राजकीय नेत्यांना या ठिकाणाहून ऊर्जा मिळते, अशी धारणा आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील आपल्या राजकीय जीवनाची सुरवात या शनैश्वराच्या दर्शनाने केली होती, असे सांगितले जाते. मंत्री विजयकुमार गावित, खासदार हिना गावित अशा अनेक राजकीय नेत्यांनी देखील इथल्या शनि मंदिराचे दर्शन घेत मागे लागलेली पिडा टळावी, अशी प्रार्थना केली आहे.
शिवसेना मंत्री संजय शिरसाट अधिवेशन काळात अडचणीत आलेले आहेत. खासदार संजय राऊत यांनी त्यांचा व्हिडिओ ट्विट केला होता. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आल्याने त्यांनी देखील शनिदेवाचा धाव केला आहे. अहिल्यानगरमधील शनिशिंगणापूर इथल्या शनैश्वर देवस्थानला मंत्री शिरसाट यांनी तेल अभिषेक केला. मंत्री शिरसाट यांच्यानंतर आता मंत्री कोकाटे यांनी नंदुरबार इथं शनिमांडळ मंदिरात शनिदेवाला तेल अभिषेक केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.