
Karjat Nagar Panchayat : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना कर्जतमध्ये भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या राजकीय खेळीने 'जबरा' धक्का बसला आहे.
कर्जत नगरपंचायतीच्या सत्ताधारी नगरसेवकांमधील आमदार रोहित पवार यांच्या गटाचे 12 पैकी आठ नगरसेवक फोडत, सत्तापरिवर्तनाचे नाट्य रंगले आहे. या मागे प्रा. राम शिंदे असल्याचे मुंबईत बंडखोरांनी घेतलेल्या प्रेसनंतर अधिकच उघड झालं. यावरून आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट करत, प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रा. शिंदे यांच्याकडे असलेल्या महत्त्वपूर्ण पदाची आठवण त्यांनी करून देत, त्याची गरिमा संभाळण्याचा सल्ला दिला. विधान परिषदेचे सभापती पद हे घटनात्मक पद प्रा. शिंदे संभाळत असतानाच, त्या पदाचं अवमूल्यन करण्याचा विडा उचलला आहे का? असा सवाल केला आहे.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती ही घटनात्मक पदं असून महाराष्ट्रात या पदांवरील व्यक्तींना विशेष मानसन्मान आहे. कारण या पदांवरील आजवरच्या सर्वांनीच स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवत या पदांचा मान सन्मान वाढवला आहे. पण अलीकडच्या काळात या पदावरील व्यक्तींनी राजकीय भूमिका घेऊन पदाचं अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय? अशी शंका येते, असा टोला लगावला.
विधान परिषदेच्या सभापती महोदयांनी, तर विधिमंडळातील दालनात कर्जत नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन एका क्षणात विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा आणि संकेतांना धुळीस मिळवलं. वास्तविक प्रथा परंपरा, निष्ठा, विचार यांची बरोबरी पैशात कधीही होऊ शकत नाही, त्यामुळं कर्जत-जामखेडने पैशांपेक्षा प्रथा, परंपरा, निष्ठा आणि विचार कायमच जपला. पण आज?, असा प्रश्न आमदार पवारांनी केला आहे.
एक मात्र बरं झालं, यानिमित्ताने फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे उघड झालं. आता अपेक्षा एकच आहे, त्यांनी राजकारण जरूर करावं. पण घटनात्मक पदावर राहून या पदाची प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची आणि कर्जत-जामखेडच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील रोहित पवार यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.