Ahmednagar Lok Sabha Constituency: सुजय विखेंशिवाय भाजपकडे दुसरा चेहराच नाही!

Ahmednagar political news : सुजय विखे-पाटील यांच्या रूपाने विखे घराण्याची चौथी पिढी राजकारणात आहे.
 Dr. Sujay Vikhe
Dr. Sujay Vikhe
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांनी आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना उभारला. विठ्ठलराव विखे-पाटील यांचे पुत्र बाळासाहेब विखे-पाटील यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद असे टप्पे पार करीत कोपरगाव मतदासंघातून लोकसभेवर निवडून गेले. यानंतर 1977, 1980, 1984 आणि 1989 अशा सलग चार निवडणुका बाळासाहेब विखेंनी याच मतदारसंघातून लढल्या आणि जिंकल्या. बाळासाहेब विखे-पाटलांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात त्यांचे वडील बाळासाहेब विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमधून झाली. डॉ. सुजय विखे-पाटील यांनी 2019 मध्ये वडील राधाकृष्ण यांच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला.

सुजय यांच्यानंतर राधाकृष्ण भाजपमध्ये आले. ते सध्या राज्याचे महसूलमंत्री आहेत. डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपकडून 2019 मधील लोकसभेची पहिली निवडणूक नगरमधून लढवली आणि ते विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा त्यांनी पराभव केला. आता ते 2024 साठी इच्छुक आहेत. विरोधी पक्ष विखुरलेला असल्याने सध्या तरी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार विखे-पाटील यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार दिसत नाही. तरीदेखील पक्षांतर्गत नेत्यांकडून आणि भाजप संघटनेकडून त्यांना तीव्र विरोध आहे. यातच विरोधकांकडे चेहरा नसणे हे सर्वाधिक धोकादायक मानले जाते. त्यामुळे खासदार विखे-पाटील यावर मात करण्यासाठी कोणती राजकीय खेळी खेळतात, याकडे लक्ष लागलेले आहे.

 Dr. Sujay Vikhe
Nagar Politics: राजकीय अस्तित्वासाठी 'साऱ्यां' विरुद्ध विखे पिता-पुत्र!

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शेवगाव-पाथर्डी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदे, राहुरी आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ येतात. राजकीय समीकरणे मांडताना या मतदारसंघावर सुरुवातीला काँग्रेसचे वर्चस्व दिसत होते. मात्र 1999, 2009 आणि 2014 मध्ये भाजपचे दिलीपकुमार गांधी यांनी विजय मिळवला. या मतदारसंघात निवडून आलेले चार खासदार आतापर्यंत केंद्रात मंत्री झाले आहेत. 2004 मध्ये तुकाराम गडाख यांचा अपवाद वगळता दिलीप गांधी 2009 पासून सलग दोन वेळा खासदार झाले. 2014 मध्ये राष्ट्रवादीने राजीव राजाळे यांना दिलीप गांधी यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली होती. आता राजीव राजाळे आणि दिलीप गांधी दोघेही हयात नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदारसंघ आहे.

तुकाराम गडाख यांची खासदारकी वगळता शरद पवार यांना हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेता आलेला नाही. आमदार नीलेश लंके यांच्याकडे शरद पवार त्याच नजरेतून पाहत असतानाच राष्ट्रवादीत फूट पडली आणि आमदार लंके राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील झाले. लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी इंडियाच्या माध्यमातून सामोरे जात आहे. खासदार विखे-पाटील यांच्यासमोर विरोधकांकडून सध्या कोणताच चेहरा नसल्याने नेमकी लढत कोणाबरोबर? अशी स्थिती आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा नेमकी कोणाला? आणि येथे कोणता उमेदवार येईल, हे पुढे स्पष्ट होईल. तोपर्यंत खासदार विखे-पाटील यांची लढाई पक्षांतर्गत विरोधकांबरोबर राहणार आहे. विखे-पाटील यांनी खासदारकी मिळवल्यानंतर पहिले काम केले, ते अहमदनगर शहरातील रखडलेला उड्डाणपूल! यानंतर त्यांनी मतदारसंघात केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाचा खुबीने वापर केला.

 Dr. Sujay Vikhe
Ajit Pawar in Ahmednagar : अजित पवारांची खेळी, जुना पत्ता काढला बाहेर; थोरातांच्या भाच्याला नियुक्तीपत्र..

खासदार विखे-पाटील यांनी यासाठी भाजप संघटनेऐवजी स्वतःच्याच यंत्रणेवर अधिक विश्वास आहे. तसा ते आपल्या यंणत्रेचा वापरदेखील प्रभावीपणे करतात. विखे पिता-पुत्रांनी भाजप आणि संघटनेला मोठे होऊ दिले नाही, असा आरोप होत असतो. नगर शहर विधानसभा मतदारसंघावर भाजप संघटनेचा डोळा आहे. यासाठी भाजप संघटना बांधणी करीत आहे. परंतु खासदार विखे-पाटील विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (अजित पवार गट) यांना खासदार झाल्यापासून आणि राष्ट्रवादी फुटीच्या अगोदरपासून आणि नंतरदेखील जवळ केलेले आहे. तसे ते त्यांना घेऊन फिरत आहेत. त्यांना सांभाळून घेत राजकीय गणिते आखत आहेत. खासदार विखे-पाटील यांनीदेखील आमदार जगताप हे माझे राजकीय मित्र असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपची नगर शहर संघटना खासदार विखे-पाटील यांच्या या भूमिकेवर नाराज आहे.

विखे पाटील पिता-पुत्रांचा भाजपमध्ये 2019 मध्ये प्रवेश झाल्यानंतर नगर जिल्ह्यात भाजपची विधानसभेतील सदस्यसंख्या पाचने घटली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या कर्जत-जामखेड आणि राहुरी विधानसभेत भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यात भाजपनेते तथा माजी मंत्री राम शिंदे आणि शिवाजी कर्डिले यांचा प्रामुख्याने समावेश आहे. भाजप-शिवसेना त्यावेळी युतीत लढली होती. शिवसेनेचे उपनेते तथा नगर शहर विधानसभेत माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड आणि पारनेर विधानसभेत शिवसेनेचे विजय औटी यांचादेखील यावेळी पराभव झाला होता.

या पराभवाचे खापर राम शिंदे यांच्यासह इतर पराभूत उमेदवारांनी भाजपच्या पक्ष बैठकीत विखेंवर फोडले होते. आता माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकला आहे. पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागून त्यांनी खासदार विखे-पाटील यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. महाविकास आघाडी इंडिया नगर दक्षिण मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आणि कोणता उमेदवार उतरवते, यावरून खासदार विखेंचे २०२४ लोकसभेचे भवितव्य अवलंबून आहे.

नाव (Name)

डॉ. सुजय राधाकृष्ण विखे-पाटील

जन्मतारीख (Birth date)

२४ नोव्हेंबर १९८२

शिक्षण (Education)

एम. सीएच. न्यूरोसर्जरी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला. विठ्ठलरावांचे पुत्र बाळासाहेब विखे-पाटील यांनी, म्हणजे खासदार डॉ. सुजय यांचे आजोबा यांनी सहकारातून ग्रामीण भागात शिक्षण चळवळ उभारली. डॉ. सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील राज्याचे विद्यमान महसूलमंत्री आहेत. त्यांच्या मातोश्री शालिनीताई विखे-पाटील या नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री या रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा आहेत. त्यांना दोन अपत्ये असून, मुलाचे नाव अभिमन्यू आणि मुलीचे नाव अनिशा आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

शेती आणि साखर कारखानाचालक

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

अहमदनगर दक्षिण

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

भारतीय जनता पक्ष

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

डॉ. सुजय विखे-पाटील यांनी थेट लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचे वय 37 होते. मैदानात उतरून थेट निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांना नव्हता. ते न्यूरोसर्जन असले तरी ते 2013 पासून राजकारणात सक्रिय आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे युवक कॉंग्रेस अध्यक्षपद त्यांनी भूषवले. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या जनसेवा फाउंडेशनमार्फत त्यांनी मतदारसंघात 'लेक वाचवा' अभियान, तसेच जलक्रांती अभियान राबवले. त्याचबरोबर अपघात विमा योजना सुरू केली. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. पुढे 2017 मध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी नगर दक्षिणमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा प्रचार केला. या प्रचारात त्यांनी दौऱ्यासाठी हेलिकॉप्टर वापरले होते. त्यामुळे त्यांचे प्रचारदौरे चर्चेत आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इतर उमेदवारांसाठी मते मागताना त्यांनी नगरमध्ये चाचपणी सुरू केली. यात त्यांना यश आले. यानंतर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत नगरमधून लोकसभा निवडणूक 2019 मध्ये लढायचीच, असा चंग बांधला. संस्थानिक आणि राजकीय घराण्याची पार्श्वभूमी असल्याने डॉ. विखे-पाटील यांच्यासाठी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील धावून आले. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे होता. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी मतदारसंघ सोडणार नसल्याचा निरोप शरद पवारांकडून मिळताच आणि काँग्रेसच्या सर्व प्रयत्नांनंतर डॉ. विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशानंतर लगेचच राधाकृष्ण विखे-पाटीलदेखील भाजपमध्ये आले. त्यानंतर 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपकडून डॉ. सुजय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांचा दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

 Dr. Sujay Vikhe
Ram Shinde Vs Rohit Pawar : नीरव मोदीशी काही बोलणं झालं होतं का? शिंदेंनी रोहित पवारांना डिवचलं

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

खासदार डॉ. सुजय विखे-पाटील हे पेशाने न्यूरोसर्जन आहेत. वैद्यकीय सेवेत त्यांना अधिक रुची आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग व अपंग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा केंद्राची उभारणी व विशेष उपचाराची सुविधा त्यांनी केली आहे. जिल्ह्यातील 208 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेऊन शैक्षणिक, आरोग्याच्या मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिरे व रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून 50 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना लाभ मिळवून दिला आहे. शिर्डी मतदारसंघातील सर्व नागरिकांना आरोग्य विमा कवच स्वखर्चाने उपलब्ध करून दिले आहे. आतापर्यंत दोन कोटी रुपयांचा विमा लाभ परत मिळवून दिला. मोफत अँजिओग्राफी , अँजिओप्लास्टी, हृदयशस्त्रक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, सांधे आणि खुब्यावरील शस्त्रक्रिया, कॅन्सर उपचारावर मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया केंद्र सुरू केले आहेत. लेक वाचवा अभियानातून युवक, युवतींचे मोठे संघटन उभारले आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

डॉ. सुजय विखे-पाटील यांनी पहिली आणि थेट निवडणूक लढवली ती लोकसभा 2019 ची! 2017 च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून सुजय विखे-पाटील यांनी नगर लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवला होता. हमखास विजय, हे गणित हेरूनच सुजय विखे-पाटील यांना भाजपने प्रवेश दिला. उमेदवारी निश्चित होण्यापूर्वी आणि नंतरही त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघातील बहुतांश गावांत संपर्क करण्यात यश मिळवले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुजय यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते स्वतः मैदानात होते. जिल्हा परिषद निवडणुकीचा अनुभव त्यांना लोकसभा निवडणुकीत फायदेशीर ठरला. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप होते.

नगर शहर विधानसभा निवडणुकीचा त्यांना अनुभव होता. आमदार जगताप यांनी नगर विधानसभा मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उपनेते (कै.) अनिल राठोड यांना पराभूत केले होते. त्यामुळे विखे-जगताप यांच्यात लोकसभा निवडणूक रंगतदार झाली. आमदार जगताप यांचे वडील अरुण जगताप राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर सदस्य होते. यातच सुजय विखे-पाटील यांची या निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सामना होता. त्यामुळे निवडणूक चुरशीची झाली. यात सुजय विखे-पाटील तब्बल 7 लाख 4 हजार 660 मते मिळवत खासदार झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी जगताप यांना 4 लाख 23 हजार 186 मते मिळाली.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

नगर मतदारसंघात भाजपचे पहिल्यापासून वर्चस्व होते. भाजपचे खासदार (कै.) दिलीप गांधी यांच्याविरोधात पक्षांतर्गत मोठी नाराजी होती. गांधी आणि वाद हे जणू समीकरणच झाले होते. लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात गांधी यांच्याविरोधात पक्षांतर्गत मोठी नाराजी होती. 2019 मध्ये पक्ष संघटनेनेदेखील गांधींच्याविरोधात भूमिका घेतली. यातच सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीवर पक्षाकडून शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे गांधी अधिकच नाराज झाले. सार्वजनिक कार्यक्रमांमधून त्यांनी ही नाराजी जाहीर करण्यास सुरुवात केली.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गांधी यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली. दरम्यान, दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी लोकसभा मतदारसंघात दौरे वाढवले. याच वेळी उमेदवारीत डावलल्याने गांधी यांनी नगरमध्ये शक्तिप्रदर्शन करीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यात मी पक्षाचा कार्यकर्ता असून, पक्षाबरोबरच राहणार असल्याचे जाहीर केले. यानंतर गांधीसमर्थक शांत झाले. पुढे गांधी प्रचारात सक्रिय झाले. नगर मतदारसंघ हा अत्यंत संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला ही निवडणूक सुजय यांच्यासाठी एकतर्फी वाटत होती. मात्र आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक सोपी न राहता ती पुढे अवघड बनली.

आमदार जगताप यांचा प्रचार उशिरा सुरू झाला. मात्र त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत विखेंसमोर मोठे आव्हान उभे केले. शरद पवारांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घातले. राधाकृष्ण विखे-पाटील त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनीही राज्याकडे लक्ष न देता, सुरुवातीला मुलासाठी गुप्त प्रचार केला. नंतर थेट भाजपच्या बैठकांमध्ये सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांच्या तीन सभा झाल्या. येथे सुजय विखे-पाटील विरुद्ध संग्राम जगताप, अशी लढत असली तरी प्रतिष्ठा पवार-विखे यांची पणाला लागली होती.

शरद पवारांनी या मतदारसंघात तब्बल पाच सभा घेतल्या. तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीदेखील मुलाच्या प्रचारासाठी अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. नगर दक्षिण मतदारसंघ हा खरा तर आघाडीचा बालेकिल्ला. सहकारी साखर कारखानदारी, दूध व्यवसाय, शिक्षण संस्था आणि सहकाराचे घट्ट जाळे या मतदारसंघात आहे. मात्र दिलीप गांधी यांनी गटबाजीचा फायदा घेत भाजपचे खाते उघडले होते. गांधी यांनी भाजपसाठी मैदान तयार केले असल्याने आणि २०१७ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून नगर दक्षिण पिंजून काढला असल्याने सुजय विखे-पाटील यांना निवडणुकीचे गणित काहीसे सोपे झाले.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या रूपाने विखे घराण्याची चौथी पिढी राजकारणात आहे. सुजय यांची पत्नी धनश्री विखे-पाटील यादेखील रणरागिणी महिला मंडळाच्या माध्यमातून सक्रिय आहेत. खासदार सुजय यांचा नगर लोकसभा मतदारसंघात दांडगा संपर्क ठेवून आहेत. विखे घराणे कोणत्याही पक्षात राहिल्यास, त्यांची वेगळी यंत्रणा नगर जिल्ह्यात कार्यरत दिसते. म्हणजेच विखे हाच पक्ष, असे चित्र उभे राहते. खासदार सुजय विखे-पाटील यांचे नगर लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघात यंत्रणा कार्यरत आहे. वडील राज्यात मंत्री असल्याचा फायदा खासदार सुजय यांना मतदारसंघात जनसंपर्कासाठी होतो. संपूर्ण जिल्ह्यात शिधापत्रिकाधारकांना साखर वाटप करून जनसंपर्कावर भर दिला आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

खासदार सुजय विखे-पाटील हे समाजमाध्यमांवर सक्रिय असतात. ते एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांची समाजमाध्यमे हाताळणारी टीम सोबत असते. वेगवेगळे सकारात्मक प्रसंग ते टिपतात. तेवढ्याच वेगाने ते समाजमाध्यमांवर व्हायरल करतात. सकारात्मक छायाचित्रांवर या टीमचा फोकस असतो. त्यांचे अधिकृत फेसबुक पेज आहे. त्यांनी त्यांच्या पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे छायाचित्र ठेवलेले असून, त्या खाली त्यांचे छायाचित्र आहे. जवळपास त्यांचे 1 लाख 67 हजार फॉलोअर्स आहेत. ते 2014 पासून ट्विटरवर आहेत. तेथे त्यांचे 26 हजार फॉलोअर्स आहेत. त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंटही आहे. त्यांनी आतापर्यंत 2 हजार 225 पोस्ट केल्या आहेत, तर 1 लाख 28 हजार लोक त्यांना फॉलो करतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

विरोधकांवर तोंडसुख घेताना ते मागचा-पुढचा विचार करत नाही. परंतु विरोधकांच्या चिमटीत सापडणार नाही, याची काळजी घेतात. अलीकडे खासदार विखे-पाटील यांनी, 'एकदा निवडणूक लागू द्या, माझ्यावर आरोप-टीका करणाऱ्यांच्या अंगावर मी कपडेसुद्धा ठेवणार नाही. साडेचार वर्षे माझ्या विरोधकांनी काय-काय लफडे केले, याचे व्हिडीओ शूटिंगदेखील माझ्याकडे आहेत,' असे विधान केले.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

राधाकृष्ण विखे-पाटील

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

खासदार होताच त्यांनी नगर शहरातील प्रलंबित उड्डाणपुलाचे काम मार्गी लावत पूल 18 महिन्यांत उभा केला. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे कँटोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या अखत्यारित असलेले भिंगार शहरातील नागरी वसाहतीचा भाग नगर महापालिकेत आणण्याचा अजेंडा खासदार सुजय विखे-पाटील यांनी ठेवला आहे. संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या विविध शासकीय योजना नगर शहरात प्रभावीपणे महापालिकेच्या माध्यमातून राबवल्या आहेत. नगर लोकसभा मतदारसंघात नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामांची त्यांनी मांडणी केली आहे. विकासकामांसाठी त्यांनी काही ठिकाणी विरोधकांशी चांगले जुळवून घेतले आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

नगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या संघटनेत जुने कार्यकर्ते आहेत. ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत. काही ठिकाणी ते विखुरलेले आहेत. कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहित पवार (राष्ट्रवादी, शरद पवार गट) हा आक्रमक चेहरा आहे. यातच तेथून भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार प्रा. राम शिंदे यांनीदेखील विखे-पाटील यांच्याविरोधात सूर आळवलेला आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघात आमदार नीलेश लंके (राष्ट्रवादी, अजित पवार गट) यांच्याशी विखे पिता-पुत्रांचे अजिबात जमत नाही. पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार मोनिका राजाळे यांनी स्वतःची यंत्रणा उभी करून निवडणुकीत यश मिळवले, राहुरी विधानसभा मतदारसंघात आमदार प्राजक्ता तनपुरे (राष्ट्रवादी, शरद पवार गट) आहेत. नगर शहर विधानसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे-पाटील यांचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी असलेले मैत्रीपर्व वेगळा अध्याय रचेल, असे सांगितले जात असले तरी नगर शहरातील भाजप संघटना मात्र सुजय-संग्राम मैत्रीपर्वावर नाराज दिसते. या मैत्रीपर्वाच्या तक्रारी भाजप संघटनेकडून केंद्रीय आणि भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत केल्या गेल्या आहेत.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

पक्षांतर्गत विरोध असला, तरी खासदार विखे-पाटील यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे केंद्रात वाढते वजन तिकीट खेचून आणू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यातील भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर केंद्रीयमंत्री आणि राज्यातील भाजपनेत्यांबरोबर विखे पिता-पुत्रांचा दांडगा संपर्क आहे. नगर जिल्ह्यात विखे हाच पक्ष आहे. त्यामुळे भाजपकडून हमखास निवडून येणारा उमेदवार म्हणून खासदार डॉ. सुजय यांच्याकडे पाहिले जात आहे. खासदार विखे-पाटील यांना पक्षांतर्गत विरोध जरी होत असला, तरी ते पेल्यातील वादळ ठरू शकते.

 Dr. Sujay Vikhe
NCP Politics: अजित पवारांनी दिला भुजबळांच्या भात्यात आणखी एक बाण !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com