धुळे : मोकाट जनावरे, खड्डे, अतिक्रमण निर्मुलन, पाणीपुरवठाप्रश्नी (Dhule city) सत्ताधारी भाजपचे (BJP) पदाधिकारी व नगरसेवक, विरोधक महापालिका प्रशासनाच्या (Municiple Corporation) उदासीन कार्यशैलीविरूद्ध बरसत असताना एमआयएमचे (AIMIM) आमदार फारूक शाह (Faruk Shah) यांनी पुन्हा शुक्रवारी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. (MLA Faruk Shah angry on municiple corporation officer fir civic issues)
आमदार पारूक शाह महापालिकेत असतानाच दुसरीकडे दुपारी दोनपासून मोठ्या पुलाजवळ चार मोकाट जनावरांनी वर्दळीचा रस्ता अडवून धरल्याने एसटी बसचालकांना कसरत करावी लागली. नकाणे रोड परिसरातील जयहिंद इंग्लिश स्कूलजवळ एसटी खड्ड्यात रूतली, तर भंगार बाजारातील मनपा शाळेत तळे साचल्याने विद्यार्थी, पालकांनी थेट आयुक्तांच्या दालनाजवळ ठिय्या आंदोलन केले.
शहरासह परिसरात गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेक समस्यांनी तोंड वर काढले. देवपूरसह नादुरूस्त रस्ते असलेल्या विविध भागात तळे साचले. काही शाळांमध्ये हीच स्थिती होती. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने काही वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. या स्थितीमुळे धुळेकर त्रस्त झाले आहेत.
आमदारांतर्फे अधिकारी फैलावर
धुळे शहराला तीन दिवसांआड नियमित पाणीपुरवठा करा, स्वच्छतेवर भर द्या, मोकाट जनावरे, अतिक्रमणे, खड्ड्यांप्रश्नी तत्काळ योग्य ती कार्यवाही करा, अशी सूचना आमदार फारुक शाह बैठकीच महापालिका आयुक्त देविदास टेकाळे यांना केली. आमदारांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. शहरासाठी मुबलक जलसाठा असतानाही किमान आठ ते दहा दिवसानंतर पिण्याचे पाणी दिले जाते. या स्थितीत तत्काळ बदल करून चार दिवसांआड पाणीपुरवठा करावा. महापालिका कचरा संकलनात दिरंगाई करीत आहे.
घंटागाड्यांची संख्या न वाढवल्यामुळे अनेकांना कचरा रस्त्यावर किवा गटारीत फेकावा लागतो. याबाबत तातडीने पावले उचलावी. वर्षभरापासून मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे- डुकरे याबाबत उचीत कार्यवाहीची मागणी करूनही स्थिती जैसे- थे आहे. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. परंतु, मनपा स्तरावरून याप्रश्नी कुठलीच ठोस कारवाई झाल्याचे निदर्शनास येत नाही.
अतिक्रमणांबाबत तक्रारी असूनही कार्यवाही होत नाही. पावसाळ्यात अनेक प्रभागातील पथदीप बंद आहेत. ही समस्या सोडविली जात नाही. मनपाचे अधिकारी व कर्मचारी उदासीन दिसतात. आयुक्तांचा यंत्रणेवर कुठलाच वचक दिसून येत नाही. त्यामुळे आयुक्त टेकाळे व अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी जनहितासाठी प्रश्न मार्गी लावावे, अशी सूचना आमदार शाह यांनी केली. नगरसेवक डॉ. सर्फराज अन्सारी, साबीर सय्यद, रफीक पठाण, निजाम सय्यद, फातमा अन्सारी, सउद सरदार, आसिफ शाह, माजीद पठाण, सउद आलम आदी उपस्थित होते.
विद्यार्थी, शिक्षकांचा ठिय्या
पावसामुळे कॉलनी परिसरांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती दिसत होती. अनेक प्लॉटधारकांच्या जागेत गुडघाभर पाणी साचले होते. शासकीय कार्यालयामध्ये अशीच स्थिती होती. अनेकांना रात्रीपासून पाणी उपसण्यासाठी जागावे लागले. नकाणे रोडला रूपामाई शाळेचे आवार पाण्याने तुडुंब भरले होते. भंगार बाजार परिसरातील शाळा क्रमांक वीसला पाण्याचा वेढा पडला होता. या ठिकाणी थोड्याफार पावसामुळे अशी स्थिती उद्भवते. शुक्रवारी मुसळधारेने या स्थितीत भर घातल्याने शाळा क्रमांक वीसचे विद्यार्थी आणि पालक थेट महापालिकेत पोहोचले. त्यांनी महापालिका प्रशासन, प्रभागातील नगरसेवकांचा धिक्कार करत ठिय्या मांडला. स्कूल कमिटीचे अध्यक्ष जमिल शाह, उपाध्यक्ष अताऊ रहेमान, सदस्य मजरू लहक, अ. हाफिज, रेहान बी व विद्यार्थी उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.