Ajit Pawar : अजितदादांचा नवा वादा; पिंक ई-रिक्षा, अन् 'लाडकी बहीण'मध्ये जावेच्या समावेशाचे संकेत

Ajit Pawar announcement of Pink Rickshaw Yojana : लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पारनेरमध्ये आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना पिंक रंगाची ई-रिक्षा देण्याची घोषणा केली.
Ajit Pawar 3
Ajit Pawar 3Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पारनेरमध्ये आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना पिंक रंगाची ई-रिक्षा देण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रमुख 17 शहरात ही योजना असेल आणि टप्प्या-टप्प्याने जिल्हा नियोजन विकास मंडळाद्वारे राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेत एकत्रित कुटुंबातील जावेचा समावेश करण्याबाबत भविष्यात विचार करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. निळवंडे धरणाचे काम मीच त्या खात्याचा मंत्री असताना पूर्णत्वास नेले, मुळा धरणासंदर्भातील प्रश्न सोडवले, असा दावाही पवारांनी केला.

उपमुख्यमंत्री पवारांनी यंदाच्या राज्याच्या अंदाजपत्रकात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. तिच्या प्रचार व प्रसाराची सुरुवात त्यांनी सोमवारी पारनेरपासून केली. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे व महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) उपस्थित होते. यावेळी पवारांनी मीनाश्री कौठकर, ऐश्वर्या बेलोडे, संगीता विश्वासराव, हिराबाई करंजुले या महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. योजनेत महिला व तिची नणंद वा घरातील मुलगी, अशा दोन महिलांचा समावेश आहे. मात्र, एकत्रित कुटुंबात जाऊबाई असल्याने दोन महिलांना लाभ मिळण्यास अडचण होते, अशी तक्रार एका महिलेने केल्यावर, योजना अशी वाढवत राहिलो तर तिला अंत राहणार नाही. पण भविष्यात जावेच्या समावेशाचा विचार करू, अशी ग्वाही पवारांनी दिली. विशेष म्हणजे घरात 2 जावा असतील तर त्यांची दोन रेशनकार्ड करा व दोघी लाभ घ्या, असा सल्लाही दिला.

Ajit Pawar 3
Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe : वाकडं ते वाकडंच, आता राहाता इथं जाऊनच बसतो; खासदार लंकेंचे विखे पिता-पुत्रांना आव्हान

बंद होऊ देणार नाही

अजित पवार दादाचा वादा आहे व महिलांसाठीच्या योजना बंद होऊ देणार नाही, असे स्पष्ट करून अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, महिलांसाठी पिंक (गुलाबी) रंगाची ई-रिक्षा दिली जाणार आहे. तिला पेट्रोल-डिझेल खर्च नाही. घरातील थ्री प्लगवर ती चार्ज होईल. साडेतीन लाखाच्या या रिक्षासाठी 1 लाख 5 हजाराचे डाऊन पेमेंट असेल व यातील 10 टक्के म्हणजे 35 हजार संबंधित महिलेला भरावे लागतील. राहिलेले 70 हजार सरकार भरेल. उर्वरित अडीच लाखाच्या कर्जाला सरकार हमी देईल. 6 हजार 250 रुपयांचा मासिक हप्ता संबंधित महिलेला प्रवासी सेवेतील उत्पन्नातून भरावा लागेल. सुरुवातीला मुंबई-पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव अशा मोठ्या 17 शहरांतून ही योजना असेल. पण जिल्हा नियोजन मंडळाने पुढाकार घेऊन तालुकानिहाय लोकसंख्या व प्रवासी संख्या पाहून ही योजना राबवण्यास मुभा देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar 3
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : खासदार लंकेंचा विखेंना दणका; महापालिकेतील तो ठराव विखेंच्या अंगलट येणार

...तरच योजना सुरू राहील

अजित पवारांनी महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांनी विधानसभेत महायुतीचे बटण दाबले, तरच या योजना सुरू राहतील, असेही आवर्जून स्पष्ट करून, त्याचा विचार आवर्जून करण्याचेही आवाहन केले. लेक लाडकी योजनेत मुलीला 18 वर्षांनंतर 1 लाख 1 हजार, उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींना शिष्यवृत्ती, मुला-मुलींना एक वर्षाच्या नोकरीनंतर अनुभव प्रमाणपत्र, 15 लाख महिलांना लखपती दिदी केले, गॅस सिलिंडरची अन्नपूर्णा योजना, लाडकी बहीण योजनेत दरमहा दीड हजार, महिला बचत गटांना 30 हजाराचे अनुदान, अशा विविध योजनांची माहिती देताना सोयाबीन व कापसासाठी शेतकर्‍यांना दोन एकरला दहा हजाराप्रमाणे साडेचार हजार कोटी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेत झालेली चूक दुरुस्तीची एकदा संधी मिळेल. त्यातूनही दुरुस्ती झाली नाही तर स्क्रुटीनीत तो अर्ज बाद होईल व त्या महिलाला पुन्हा दुसरा अर्ज करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रोज 5 ते 7 लाख अर्ज भरले जात असल्याने ऑनलाईन गती मंद होऊन अडचणी येतात. पण त्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

निळवंडे धरणाचे मीच केले

मागील 30-35 वर्षात आम्ही विकासाचा विचार केला. आताही करीत आहोत व भविष्यातही करणार आहोत, अशी ग्वाही देऊन पवार म्हणाले, नवीन इमारती, तलाव, केटी वेअर, उपसा सिंचन योजना करून नगर जिल्ह्याचा दुष्काळ हटवला. निळवंडे धरणाचे काम मीच त्या खात्याचा मंत्री असताना पूर्णत्वास नेले, मुळा धरणासंदर्भातील प्रश्न सोडवले, असा दावाही अजित पवार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com