राजेंद्र त्रिमुखे
Ahmednagar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थखात्याची सूत्रे हाती घेताच आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला असून, त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे. याचवेळी अहमदनगर शहर विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनाही अजितदादांनी निधी मंजूर केला आहे. शहरातील माळीवाडा बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे.
राज्य सरकारकडून साथ देत विविध विकासकामांसाठी निधी प्राप्त करून दिल्याचे दिसून येत आहे. नुकताच आमदार संग्राम जगतापांनी(Sangram Jagtap) सीना नदी महामार्गावरील पूल आणि निंबळक बायपास रस्त्यासाठी 13 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. आता माळीवाडा बसस्थानकाच्या नवीन इमारतीसाठी 16 कोटी रुपयांचा निधी आमदार संग्राम जगताप यांनी मंजूर करून आणला आहे.
विरोधातील आमदार निधीसाठी झगडत असताना नगर शहरावर आमदार जगतापांच्या माध्यमातून निधीची बरसात होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, महाराष्ट्राच्या भौगोलिक मध्य स्थानावर आणि मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला स्पर्श करणाऱ्या नगर जिल्हा मुख्यालयात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या मोठ्या वर्दळीच्या अनुषंगाने आ.संग्राम जगताप यांनी मध्यवर्ती बसस्थानकासाठी मोठा निधी आणल्याने समाधान व्यक्त होत आहे.
माळीवाडा बसस्थानक हे जिल्ह्याचे मुख्य स्थानक आहे. विविध ठिकाणांहून या स्थानकावर प्रवासी ये - जा करत असतात. या बसस्थानकाची इमारत अत्यंत जुनी असून तिची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
या माळीवाडा बसस्थानकाची समस्या लक्षात घेवून गेल्या 1 वर्षापासून या बसस्थानकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर त्याला यश मिळाले असून महाराष्ट्र सरकारच्या २०२२ - २३ करिता लेखाशीर्ष ६ फ योजने अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाला ५२३ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी माळीवाडा बसस्थानक इमारतीसाठी 16 कोटी मंजूर झाले आहेत.(State Government)
माळीवाडा बसस्थानकाची इमारत भव्यदिव्य अशी उभी राहणार आहे, यात तळमजला, पहिला मजला व दुसरा मजला याचबरोबर पाणी पुरवठा सुविधा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत कामे, फायर फायटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वाहनतळ कॉंक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक पार्किंग, कुंपण भिंत आदी सुविधा प्रवाश्यांना उपलब्ध होणार असून नगर शहर(Ahmednagar) महानगराकडे वाटचाल करत आहे आ. जगतात यांनी सांगितले आहे.
नगर शहर हे राज्याच्या मध्यवर्ती असून प्रवाशी आणि महामंडळाच्या प्रशासकीय सोई नुसार तारकपूर, मध्यवर्ती माळीवाडा आणि पुणे असे तीन मुख्य बसस्थानक शहरात असून महामंडळांच्या शेकडो बसेसचे नियंत्रण येथून होते. माळीवाडा बसस्थानका पेक्षा अधिक आंतरजिल्हा जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ तारकपूर आणि पुणे स्थानकात असल्याने तेथील प्रवाशी सोयी-सुविधांसाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.