

Nashik News : काळ्या आईची सेवा करून अन्नधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला शब्दांपलीकडे जाऊन सन्मान मिळावा, ही भावना जेव्हा सत्तेतील नेतृत्वाकडून व्यक्त होते, तेव्हा तो केवळ सरकारी निर्णय राहत नाही; तर ती एक कृतज्ञतेची पावती ठरते. कृषीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये 2 मे 2022 रोजी असाच एक ऐतिहासिक क्षण शेतकऱ्यांनी अनुभवला. जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या कृषी पुरस्कारांच्या रकमा थेट 'पाचपट' करण्याची घोषणा केली होती.
“तुम्ही ऊन-वारा-पाऊस झेलता, रात्रंदिवस राबता... मग तुमच्या पाठीशी ताकद म्हणून उभे राहणे हे आमचे कर्तव्य नाही का?” अजितदादांनी नाशिकच्या कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात विचारलेला हा प्रश्न आजही अनेक शेतकऱ्यांच्या कानात घुमतो. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरस्काराच्या अल्प रकमेबद्दल व्यक्त केलेली खंत लक्षात घेऊन, अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी क्षणाचाही विलंब न लावता मंचावरूनच रकमा पाचपट करण्याची घोषणा केली होती. 2017 ते 2019 या काळात जिथे वार्षिक केवळ 17 लाख रुपये पुरस्कारांसाठी खर्च होत होते, तिथे आज ही रक्कम वाढून शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे.
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये सरकारकडून लवकरच पाचपट वाढ करू,” अशी घोषणा अजितदादांनी केली. त्यानंतर कृषी आयुक्तालयाकडून पाचपट रक्कमवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. मात्र, त्यात किंचित कपात करीत शासनाने पुरस्कारांच्या रकमा चौपटीने वाढविल्या, 2024 मध्ये पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता सुद्धा वाढविण्यात आला. डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार पूर्वीची रक्कम 75 हजार होती ती वाढवून 3 लाख रुपये, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार आणि कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्का, उद्यान पंडित या चारही पुरस्कारांची रक्कम प्रत्येकी 50 हजार वरून 2 लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.
तर शेतीमित्र पुरस्काराची 30 हजार रक्कम आता 1 लाख 20 हजार मिळते. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्यभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांना दिले जातात. त्यासाठी केवळ 11 हजार रुपये दिले जात होते. आता ही रक्कम 44 हजार रुपये मिळते. ज्यावेळी संपूर्ण जग ठप्प झाले होते, कारखान्यांची चक्रे थांबली होती, तेव्हा केवळ शेतीच अशी होती जिने देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा हाकला. या वस्तुस्थितीचा उल्लेख करताना अजित पवार भावूक झाले होते. "शेती हेच शाश्वत विकासाचे क्षेत्र आहे," हा त्यांनी काढलेला उद्गार म्हणजे मातीत राबणाऱ्या प्रत्येक हाताचा गौरव होता.
हे पुरस्कार म्हणजे केवळ कौतुक नव्हे, तर प्रगत शेतीचा हा वसा इतरांनीही घ्यावा यासाठी दिलेले प्रोत्साहन आहे. पुरस्कार स्वीकारताना शेतकऱ्याच्या डोळ्यांत दिसणारी चमक आणि स्वाभिमान हेच या निर्णयाचे खरे यश असल्याचे त्यांनी मानले. नाशिकच्या त्या भरगच्च सोहळ्यात झालेली ती घोषणा आज प्रत्यक्षात उतरली आहे. आज जेव्हा कृषी पुरस्काराची रक्कम सन्मानाने शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते, तेव्हा नाशिकच्या त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात 'शेतकऱ्याच्या घामाचा सन्मान' करणाऱ्या या खंबीर नेतृत्वाच्या शब्दांची आणि कृतीची!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.