Amrita Pawar News; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडके आमदार असलेले दिलीप बनकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. पिंपळगाव बाजार समितीच्या ६२ कोटींच्या निविदा त्याला कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत. पणन विभागाने त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पिंपळगाव बसवंत बाजार समिती टोमॅटो आणि डाळिंबासाठी देशभर प्रसिद्ध आहे. तिची प्रचंड मोठी उलाढाल असल्याने राजकीय सत्तेसाठी ती एक महत्त्वाचे केंद्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार दिलीप बनकर या समितीचे अध्यक्ष आहेत.
या समितीने पणन विभागाकडे ६२ कोटींच्या कामाची परवानगी मागितली होती. मात्र ही कामे कोणती? कशाची? याबाबत समितीच्या बांधकाम समितीला देखील अंधारात ठेवण्यात आले होते. त्यामुळे संशय वाढल्याने भाजपच्या नेत्या आणि बांधकाम समितीच्या सदस्य आर्किटेक्ट अमृता पवार यांनी थेट पणन संचालकांकडे तक्रार केली. ही तक्रार आमदार बनकर यांची अडचण करणारी ठरली आहे.
तब्बल ६२ कोटींची कामे म्हणजे अनेक बाजार समित्यांची तेवढी उलाढाल देखील नसते. फक्त एवढ्यावरच प्रकरण थांबलेले नसून ६२ कोटींच्या बांधकामांची निविदा थेट इंग्रजी वर्तमानपत्रात देण्यात आली. त्याबाबत स्थानिक शेतकरीच काय बांधकाम समितीच्या सदस्यांनाही काहीच माहिती नव्हते. त्यामुळे त्या कामांची फेरनिविदा काढावी, अशी मागणी देखील करण्यात आली.
बांधकाम समितीच्या सदस्यांनाच अंधारात ठेवून होणारी ही कामे कोणती याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. सदस्यांच्या तक्रारीनंतर पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आमदार दिलीप बनकर अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
भाजपने त्या आर्किटेक्ट अमृता पवार यांनी आम्ही बाजार समितीत विरोधक म्हणून काम करीत आहोत. आम्हाला देखील शेतकऱ्यांच्या हिताची काळजी आहे. मात्र बांधकाम समितीलाच अंधारात ठेवून परस्पर होणारी कामे शेतकऱ्यांची कोणत्या हिताची आहेत असा प्रश्न आम्हाला पडला आहे? त्याचीच पणन संचालकांनी दखल घेतली आहे. हा प्रश्न तडीस लावून यातील गैरप्रकार रोखण्यासाठी आम्ही काम सुरू केले आहे, असे सांगितले आहे. याबाबत त्यांनी फेसबुक लाईव्ह करून या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे.
यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडके आमदार अशी दिलीप बनकर यांची चर्चा असते. उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार बनकर यांना विशेष तरतूद करून सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून रानवड कारखाना चालविण्यासाठी परवानगी दिली होती. निफाड तालुक्यातील सहकारी संस्थांवर सध्या त्यांचाच वरचष्मा आहे. मात्र यातील काही संस्था लहरी कारभारामुळे अडचणीत आल्याचे चित्र आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.