
Ahilyanagar NCP MLA controversy : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांच्या आक्रमक हिंदुत्वाला लगाम लावण्याचा प्रयत्न असतानाच, भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मैदानात उतरले आहेत. आमदार जगताप यांची भूमिकेचं स्वागत करतो, असे म्हणून मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे समर्थन केले आहे.
दरम्यान, अकोला इथं संग्राम जगताप यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्याने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बीड इअथं मंगळवारी (ता. 14) हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे. तिथं होणाऱ्या मोर्चात आमदार संग्राम जगताप सहभागी होणार आहेत.
करमाळा इथं झालेल्या सभेत, आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळी साजरी करताना, हिंदू व्यापाऱ्यांकडून खरेदी करा. हिंदू व्यापाऱ्यांनाच नफा झाला पाहिजे, असे विधान केलं. या विधानाचे चांगलेच पडसाद उमटले. त्याची दखल थेट पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतली. संग्राम यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत पक्षाकडून नोटीस पाठवून, कारणांची विचारणा केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी या नोटिशीची माहिती देताना, संग्राम जगताप यांना चांगलच फटकारलं. या नोटिशीनंतर पक्ष संग्राम जगताप यांच्याविरोधात काय कारवाई करणार, याची चर्चा राज्यात सुरू झाली. असे असतानाच, भाजपचे (BJP) अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मैदानात येत संग्राम जगताप यांच्या भूमिकेचं स्वागत केलं.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "संग्राम जगताप तिसऱ्यांदा निवडून आले असून त्यांना त्यांची जबाबदारी समजते. त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याचे ठरवले, त्याच स्वागतच आहे. मात्र त्यांच्या मनात काय आहे, हे माहित नाही." संग्राम जगताप यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेची पाठराखण करत असताना, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अकोला जिल्ह्यातील प्रदेश संघटक सचिव जावेद जकारीया यांनी तक्रार दिली.
'दिवाळीची खरेदी फक्त हिंदूकडून करा' असं वादग्रस्त विधानावर अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने ही तक्रार दिली. आमदार जगताप यांचं विधान धार्मिक द्वेष पसरवणार आहे. त्यामुळं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीमधून केली आहे. जावेद जकारीया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
संग्राम जगताप यांच्याविरोधात सर्वच बाजूने वातावरण तापत असताना, आज अहिल्यानगर शहरात महापुरूषांच्या विटंबना केली म्हणून जनआक्रोश मोर्चा त्यांच्या नेतृत्वाखाली काढला जात आहे. तसंच बीडमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा मंगळवारी (ता.14) काढला जाणार आहे. बीडमधील मोर्चात, आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, संग्रामबापू भंडारे आणि मिलिंद एकबोटे सहभागी होणार आहे. या दोन्ही मोर्चांद्वारे आमदार जगताप वरील सर्व मुद्यांवर काय भूमिका मांडतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.