जळगाव : येथे नितीन गडकरी यांच्या उप्सथितीत झालेल्या कार्यक्रमात भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) व शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात ‘ड्राय पोर्ट’ उभारावे, अशी मागणी केली. यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी गडकरींचे ‘पूल’ करी असा उल्लेख करत जोपर्यंत आकाशात सूर्य- चंद्र तारे राहतील तोवर गडकरी, (Nitin Gadkari) त्यांचे नाव कामे लक्षात राहतील, असे गौरवोद्गार काढले.
केळी, कापूस, मका उत्पादन करणारा जिल्हा म्हणून जळगावची (Jalgaon) ओळख आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाची गरज म्हणून जिल्ह्यात चांगली जागा दिल्यास ‘ड्राय पोर्ट’ (Dry Port) उभारू, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली.
जळगावात शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गाच्या विविध २४०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण व ७० कोटीच्या कामांचे भूमिपूजन गडकरींच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
सभेत सुरवातीला लोकप्रतिनिधींनी जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने विविध अपेक्षा व्यक्त केल्या. त्या प्रत्येक मुद्याचा आधार घेत गडकरींनी विविध कामांची घोषणा केली. ते म्हणाले, गेल्या सात वर्षांत १५ हजार कोटींची कामे या भागात आपण पूर्ण केली, २०२४ पर्यंत आणखी १५ हजार कोटींची कामे पूर्ण करून देऊ.
लोकप्रतिनिधींनीकडून अपेक्षा
तत्पूर्वी लोकप्रतिनिधींनी गडकरींकडून विविध अपेक्षा व्यक्त केल्या. राजूमामा भोळे यांनी जळगाव शहरात नशिराबाद- तरसोदपर्यंत उड्डाणपूल, आकाशवाणी ते रायसोनी नगर व आकाशवाणी ते असोदा या रस्त्यांसाठी केंद्राच्या निधीची मागणी केली. खासदार उन्मेश पाटील यांनी नगरदेवळा येथे १३५ एकर सरकारी जमीन असून त्याठिकाणी लॉजिस्टिक पार्क, जळगाव- अजिंठा रोड समृद्धी मार्गापर्यंत जोडावा, महामार्गावर कालिंका माता ते तरसोद व खोटेनगर ते पाळधीपर्यंतचे चौपदरीकरण कन्नड घाट रुंदीकरण अथवा चौपदरीकरण या मागण्या मांडल्या. रक्षा खडसेंनी अंकलेश्वर- बऱ्हाणपूर रस्त्यासह अन्य मागण्या सादर केल्या.
गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात ‘ड्राय पोर्ट’ उभारावे, अशी मागणी करत गुलाबरावांनी गडकरींचे ‘पूल’ करी असा उल्लेख करत सूर्य- चंद्र तारे राहतील तोवर गडकरी, त्यांचे नाव कामे लक्षात राहतील, असे गौरवोद्गार काढले. प्रास्ताविक महामार्ग प्राधिकरणाचे रिजनल मॅनेजर राजीव अग्रवाल, सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.
यांची होती उपस्थिती
शिवतीर्थावर आयोजित या भव्य सोहळ्यात व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, लता सोनवणे, अनिल भाईदास पाटील, चंदू पटेल, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, महापौर जयश्री महाजन, माजी आमदार स्मिता वाघ, शिरीष चौधरी, दीपक सूर्यवंशी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रिजनल अधिकारी राजीव अग्रवाल, एमएसआरडीसीचे अधिकारी श्री. सुरवसे, बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपा गिरासे, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा आदी उपस्थित होते.
---
या केल्या घोषणा
यावेळी गडकरी यांनी बऱ्हाणपूर- अंकलेश्वर २३३ कि.मी. मार्गाचे चौपदरीकरण, जळगाव शहरातून जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल, जागा दिल्यास ‘ड्राय पोर्ट’, धुळे- सोलापूर महामार्ग चोपड्यापर्यंत आणणार, बडोदा- चोपडा- भुसावळ महामार्ग चौपदरीकरण, समृद्धी मार्गाला कनेक्टसाठी सावंगी- अजिंठा- जळगाव महामार्ग या घो।णा केल्या.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.