नाशिक : राज्यात कोविडमुळे विविध कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आलेली होती. मात्र ही शेवटची मुदतवाढ असेल. यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. निवृत्तीचे वय ६० वर्षे असुन (Retitrement age is 60 yeras) यापुढे प्रशासनात युवकांना संधी द्यायची आहे, असे प्रतापिदन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले.
श्री. टोपे एका कार्यक्रमासाठी शहरात आले होते. यावेळी पक्षाच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अद्याप कोरोनाची दुसरी लाट शंभर टक्के संपलेली नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आहे. यामध्ये लसीकरण सगळ्यात महत्वाचं आहे. मुंबईत ८५ टक्क्यांपर्यंत लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्याचे अर्थकारण सुरू राहणं आवश्यक आहे, म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यवसाय सुरू करायला परवानगी देण्यात आलेली आहे.
ते पुढे म्हणाले, कोरोना संदर्भात टास्क फोर्स बैठकीत विविध शक्यता तसेच उपाययोजनांविषयी चर्चा झाली आहे. लहान मुलाच्या लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कॅडीला आणि कोव्हॅक्सीन लसीचा वापर करणार आहोत. दोन ते अठरा वयोगटासाठी हा निर्णय असेल. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा प्रयत्न असेल.
ते म्हणाले, महाविद्यालयीन तरुणांचं लसीकरण हे मोठं आव्हान आहे. राज्यात पहिला डोस ७० टक्के तर दुसरा डोस ३५ टक्के नागरिकांना देण्यात आला आहे. राज्यात जवळपास ९ कोटी लसीकरण झाले आहे. यासंदर्भात मिशन कवचकुंडलला दिवाळी पर्यंत मुदतवाढ देण्याचा विचार आहे. देशातील लसीकरण नियोजनात महाराष्ट्राचा मोठा हातभार आहे.
लसीकरणासाठी लोकांनी पुढे यावं असे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केले. ते म्हणाले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही त्यात सहभाग घ्यावा. नाशिक जिल्ह्यात येवला, निफाड, सिन्नर या तीन तालुक्यांत कोरोनाचा थोडा जास्त प्रादुर्भाव आढळला आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आहे. नवा व्हेरीयंट नाही हा दिलासा आहे. तिसऱी लाट येईल अशी परिस्थिती आज राज्यात कुठेही नाही.
आरोग्य विभागाच्या परिक्षा...
वैद्यकीय विभागातील गट क व ड गटातील कर्मचारी भऱतीच्या परिक्षांचे नियोजन सुरु आहे. त्याबाबत तक्रारी असल्याचे निदर्शनास आनून दिले असता, ते म्हणाले, आरोग्य विभागाच्या परीक्षा एकाच विभागात देता येईल. जरी अनेक जागांना एक उमेदवार पात्र असले तरी त्या उमेदवाराने निर्णय घ्यावा की कोणत्या पदाची परीक्षा द्यायची आहे. यात कोणताही बदल होणार नाही.
...