भुसावळ : जिल्ह्यात नव्हे तर राज्यात भुसावळचे नाव नेहमीच चर्चेत असते. १७ डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत खडसे (Eknath Khadse) समर्थक भाजपचे विद्यमान नगरसेवकांनी पालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. याबाबत भाजप (BJP) नगरसेविका पुष्पाबाई बत्रा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या भाजपच्या नगरसेवकांना अपात्र करण्याची याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. त्यामुळे या नगरसेवकांमागे आता कायद्याचा ससेमीरा लागला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी १० नगरसेवकांना नोटीस बजावली असून, १४ जानेवारीला याविषयी सुनावणी होणार आहे. यामुळे भुसावळच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
भुसावळ पालिकेत माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात भाजपने सत्ता काबीज केली होती. मात्र, श्री. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत, राष्ट्रवादीत गेल्याने भुसावळातील खडसे समर्थक नगरसेवकांनी देखील राष्ट्रवादीत नुकताच जाहीर प्रवेश घेतला होता. त्यामुळे खवळलेल्या भाजपने आता या नगरसेवकांविरुद्ध याचिका दाखल केली आहे.
भाजपच्या नगरसेवकांनी बुधवारी जामनेरला जाऊन आमदार गिरीष महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली. एकंदरीत भुसावळच्या राजकारणात ट्विस्ट आला असून, भुसावळच्या राजकारणात आता महाजन यांची एन्ट्री झाली असून, नजीकच्या काळात खडसे व महाजन यांची कलगीतुरा पाहावयास मिळेल हे नक्की.
दहा नगरसेवकांना नोटीस
नगराध्यक्ष रमण भोळे यांसह नगरसेवक अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, ॲड. बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते, शैलजा नारखेडे यांना नोटीस मिळाली आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यावर माजी मंत्री एकनाथ खडसे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.