नाशिक : महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करीत ५६ महिलांचे लुटलेले स्त्रीधन महिलांना परत मिळवून देत पोलिसांनी महिलांना भाऊबीज भेट दिली. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या लुटीची माहिती दिली. पकडलेला संशयित हा एक सिव्हिल इंजिनिअर असून, मैत्रिणीसोबत शोक पूर्ण करण्यासाठी तो हे गुन्हे करत होता. यात सोने खरेदी करणाऱ्या काही सराफांची चौकशी होणार आहे.
दंगल ऊर्फ उमेश अशोक पाटील, असे संशयित सिव्हील इंजिनिअरचे नाव आहे. जय भवानी रोडवरील रत्नदीप रो हाउस येथे तो राहण्यास आहे. तो एकटाच हे गुन्हे करीत असे. दीड महिन्यांपासून पाळत ठेवून गंगापूर पोलिस ठाण्याच्या मिलिंद परदेशी आणि घनश्याम भोये यांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
त्याच्याकडून ५६ गुन्ह्यातील २७ गुन्ह्यात मुद्देमाल जसाच्या तसा मिळाला. २५० ग्रॅमच्या २० सोन्याच्या वितळविलेल्या स्वरूपात लगड मिळाल्या. उघडकीस आलेल्या ५६ पैकी ३६ गुन्हे एकट्या दंगल पाटील याने केल्याचे उघडकीस आले आहे. संशयिताच्या गुन्ह्याच्या स्वरूपाचा पोलिसांनी बारकाईने अभ्यास केला. गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाझ शेख यांनी तांत्रिक अंगाने त्याचा बारकाईने तपास केला. रोज सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत साध्या वेशातील पोलिसांची पाळत ठेवली. त्यानंतर हा संशयीत हाती लागला. त्यात आडगाव २, म्हसरुळ ३, पंचवटी ४, सरकारवाडा ४, मुंबई नाका ९, गंगापूर ६, अंबड ७, इंदिरानगर १० आणि उपनगर ७ याप्रमाणे ५६ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी उपायुक्त अमोल तांबे, संजय बारकुंड, विजय खरात आदींसह सहाय्यक आयुक्त, सगळ्या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते.
यु टर्न, वेग, प्रेयसी, प्लॅट अन बॅक बॅलन्स
संशयित उच्च विद्याविभूषित असून, स्थापत्य अभियांत्रिकीतील तरंगत्या पुलाचा बांधकामाचा त्याचा अभ्यास आहे. तो रॅश ड्रायव्हिंगमध्ये पारंगत आहे. सोनसाखळी ओरबडण्यापूर्वी तो महिलेच्या दागिन्यांची रेकी करीत यू टर्न घेत असे. त्यानंतर काही क्षणात भरधाव वाहन पळवीत चेन स्नॅचिंग करीत असे. पकडले जाऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेत होता. ज्या भागात सीसीटीव्ही असतील त्या भागात तो गुन्हे करत नसे. त्याच्या मोडस ऑपरेंडीचा अभ्यास करीत पोलिसांनी मोहीम राबवली. तो सोनसाखळी ओरबाडत असताना त्याला कॅच केले. तेथून हमखास निसटणार अशी स्थिती असताना पोलिसांनी आपली दुचाकी थेट त्याच्या दुचाकीवर आपली दुचाकी धडकविली. अशाही स्थितीत संशयिताने आरडाओरड करीत आपल्यावर हल्ला झाल्याचा बनाव करून लोकांची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. साध्या वेशातील पोलिसांविरुद्ध गर्दी जमवून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खबरदारी घेतली.
इतर दोघे जेरबंद
दंगल पाटील शिवाय तुषार ढिकले (३०, आडगाव) याच्यासह वीरेंद्र ऊर्फ सॅम शशिकांत निकम (३४, नाशिक रोड), गोपाळ विष्णू गुंजाळ (३४, द्वारका) यांना अटक केली आहे. ते अतिशय नियोजनबद्ध सोनसाखळ्या खेचून पळ काढत असत. या चोऱीचा पैसा तो प्रेयसीवर उडवत होती. त्याच्याकडे ४८ लाखांचा फ्लॅट, हुंदाई क्रेटा गाडी, दोन बँकांत २० लाख रुपयांच्या ठेवी आहेत.
वीरेंद्र हा चोरलेल्या दागिणे गुंजाळ या सराफामार्फत विल्हेवाट लावत असे. अभियांत्रीकीचे शिक्षण गेत असतानाच त्याची युवतीशी परिचय व पुढे ती त्याची गर्लफ्रेड झाली. ते दोघे नियमितपणे गंगापूर परिसरातील वायनरीज तसेच रिसाॅर्टला जात असत. महागडी वाईन, पैशाची उधळपट्टी हे सर्व ते करीत असे. तपासात ते उघडकीस आले. पोलिस आयुक्तांच्या हस्ते या वेळी वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख, सहाय्यक निरीक्षक नितीन पवार, सत्यवान पवार, हेमंत तोडकर, प्रवीण सूर्यवंशी, संजय भिसे, हवालदार भारत बोळे, पोलिस नाईक रवींद्र मोहीते, मिलिंद परदेशी, गिरीश महाले, योगेश चव्हाण, घनश्याम भोये, सुनील पाडवी, दीपक जगताप, तुळशीदास चौधरी, समाधान शिंदे, सतीश जाधव, नारायण गवळी आदीचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
...
विक्रमी ५६ गुन्हे उघडकीस आल्याने या तपासाला महत्त्व आहेच. परंतु, त्यापेक्षाही दोघा पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन प्रसंगी स्वतःला झोकून देऊन जी कामगिरी केली ती जास्त कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. महिला भगिनींचे स्त्रीधन परत करून ही भाऊबीज भेट ठरावी.
- दीपक पांडे, पोलिस आयुक्त.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.