इगतपुरी : मुंबईसह (Mumbai) महापालिकांच्या आगामी निवडणुकांत आमचा पक्ष चांगले प्रदर्शन करेल. भाजप (BJP) व शिवसेनेची (Shivsena) गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता राहिली आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजप हाच आमचा मुख्य शत्रू असेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी येथे केले.
ते म्हणाले, महागाईचा भडका उडत असताना सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर आणून हिंदुत्ववादाची शेखी मिरविली जात आहे. यापुढे काँग्रेस पक्षाकडून जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यासाठी जुन्या-नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोट बांधून परिवर्तनासाठी सज्ज व्हावे. येथील रेनफॉरेस्ट येथे सोमवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तीनदिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप श्री. पटोले यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, भाजपकडून देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जात असून, केंद्रीय संस्थांना हाताशी धरून विरोधकांना नेस्तनाबूद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसच्या शिलेदारांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रात सत्तापरिवर्तनासाठी सज्ज व्हावे.
यावेळी श्री पटोले यांनी केंद्र सरकारवर गंभीर टिका केली. ते म्हणाले, देशातील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये उद्योगपतींच्या घशात घालून देशाची अर्थव्यवस्था डळमळीत केली जात आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार करतानाच लोकसभेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झंझावात निर्माण करण्याच्या दृष्टीने व विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याबरोबरच भविष्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांना गावपातळीपासून शहरापर्यंत नागरिकांच्या समस्येवर लढण्याचे आदेश देतानाच या तीनदिवसीय चिंतन शिबिरात अनेक देशव्यापी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पटोले यांना भेटण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील युवकांनी एकच गर्दी केली होती. पटोले यांच्या प्रभावी वक्तृत्वाबद्दल शिबिरात त्यांचा जयजयकार करण्यात आला. या वेळी इगतपुरी तालुक्यातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी श्री. पटोले, आमदार खोसकर यांच्या उपस्थितीत व ॲड. संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नेते देवरामशेठ मराडे, पारदेवीचे सरपंच सुरेश कोकणे, तळोशीचे उपसरपंच त्र्यंबक गुंजाळ, इगतपुरीचे माजी नगरसेवक मसूद खलिपा आदींचा समावेश आहे.
टीकांचा घेतला समाचार
बावनकुळे यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना श्री. पाटोले म्हणाले, की गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहेत. आज आमची प्रशिक्षण शिबिराची रणनीती होती. ते म्हणाले, ऊर्जामंत्री राऊत यांनी शेतकऱ्यांची वीज कापल्याशिवाय पर्याय नाही असे वक्तव्य केले असता भाजपने केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, की २०१७ पासून भाजपने केलेले पाप असून, ते आता शेतकऱ्याच्या उरावर पडत आहे. भाजपच्या काळात जे नुकसान झाले, त्याचे परिणाम आमचा शेतकरी भोगतोय. मात्र, दोन दिवसांपूर्वीच विधानसभेत याविषयी चर्चा झाली असून, फक्त चालू बिले भरली, तरी आपले कनेक्शन कायम ठेवण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आमदार हिरामण खोसकर, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, काँग्रेसचे नेते ॲड. संदीप गुळवे, माजी सभापती गोपाळा लहांगे, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सभापती संपत काळे, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव, सोनल पटेल आदी व्यासपीठावर होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.