Maratha Reservation issue: एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सर्व राजकीय पक्ष घेतात. त्यात भाजप व अजित पवार गट देखील आहे. मग सभागृहाबाहेर त्यांचे काही नेते विरोधाची भूमिका कशी घेतात. मंत्री छगन भुजबळ आणि आमदार नितेश राणे हे कोणाचा छुपा अजेंडा राबवत आहेत?, ते त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. (NCP Minister Chhagan Bhujbal & BJP MLA Nitesh Rane opposed Maratha Reservation)
मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या येवला (Nashik) मतदारसंघात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी (Maratha) भुजबळ तसेच भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे यांचा निषेध केला. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत निषेध आंदोलन केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर आंदोलन सुरू असून, या प्रश्नी सरकार व आंदोलक सकारात्मक असताना, अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ व आमदार नितेश राणे यांनी विरोध केल्याने सुरेगाव रस्ता येथे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत दहन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निषेधाच्या घोषणा दिल्या.
मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील राज्यभर मेळावे घेत आहेत. त्यास सकल मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शासनाने 24 पर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. असे असताना, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाला विरोध करून शासनाने निर्णय घेऊ नये, यासाठी मंत्री भुजबळ व आमदार राणे यांनी भूमिका घेतली. यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखवल्या असून, त्याचे पडसाद सुरेगाव रस्ता येथे शनिवारी उमटले.
सुरेगाव रस्ता येथे आरक्षणासाठी साखळी उपोषणाचा शनिवारी 53 वा दिवस होता. संतप्त ग्रामस्थांनी मंत्री छगन भुजबळ व नितेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले व पुतळे जाळून निषेध केला. जोरदार घोषणाबाजीही केली. मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत या ठिकाणी साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या आंदोलनामध्ये विजय पठाडे, वाल्मीक मगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून निषेध व्यक्त केला. नंदू ढमाले, नारायण चव्हाण, एकनाथ पवार, गणपत भोसले, शंकर चव्हाण, भाऊसाहेब पवार, भाऊसाहेब धुमाळ, नारायण मगर यांसह मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्ते सहभागी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.