Maharashtra Vidhan Sabha Election: एरंडोल- पारोळा मतदार संघ यंदा बंडखोरांमुळे चर्चेत आहे. येथे राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार अवघे तीन आहेत. मात्र अपक्ष आणि बंडखोरांची संख्या चौपट आहे. या बंडखोरांची समजूत घालण्यास नेतेही अपुरे पडू लागले आहेत.
एरंडोल- पारोळा मतदार संघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांनी यावेळी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने त्यांचे चिरंजीव अमोल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉक्टर सतीश पाटील हे उमेदवार आहेत.
मुख्य लढत या दोन उमेदवारांमध्येच आहे. याशिवाय प्रशांत पाटील हे स्वाभिमानी पक्षाचे तिसरे उमेदवार देखील मैदानात आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत राहील अशी आहे.
मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांचे समर्थक आणि कार्यकर्ते बंडखोरांमुळे विखुरले गेले आहेत. बंडखोरांमुळे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी निवडणुकीच्या प्रचारापासून लांब राहण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
या मतदारसंघात मंगळवारी माघारीच्या दिवशी पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बंडखोरांनी माघार घ्यावी, यासाठी प्रचंड प्रयत्न केले. मात्र त्यात यश येऊ शकले नाही. दिवसभरात अवघ्या सात उमेदवारांनी माघार घेतली.
त्यानंतर आता येथे तेरा उमेदवार मतदारांचा कौल घेत आहेत. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने अमोल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या बाबतची नाराजी म्हणून बंडखोरी झाली आहे. अशीच स्थिती महाविकास आघाडीत देखील आहे.
ए. टी. पाटील हे भाजपचे माजी खासदारच बंडखोर म्हणून उमेदवारी करीत असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीतही अनेकांना उमेदवारीची अपेक्षा होती. ती फलद्रूप न झाली नाही.
डॉ हर्षल माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित पाटील, डॉ संभाजी राजे पाटील हे बंडखोर उमेदवार आहेत. महाविकास आघाडीत अनेक बंडखोर उभे राहिल्याने उमेदवारांना त्यांची समजूत घालण्याचे आव्हान आहे. सुरुवातीचे काही दिवस त्यातच खर्ची पडण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघात अन्य सहा अपक्ष उमेदवार आहेत. यामध्ये भगवान महाजन, अरुण जगताप, अण्णासाहेब सतीश पवार, दत्तू पाटील, सुनील मोरे, स्वप्नील पाटील यांचा समावेश आहे.
अमोल पाटील हे शिवसेना शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार असल्याने त्यांच्या व प्रचाराचा भर प्रामुख्याने महायुतीने राज्यात केलेल्या विकास कामांचा आणि विविध योजनांचा प्रचार करण्यावर आहे. आमदार चिमणराव पाटील गेली अनेक वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर सतीश पाटील हे त्यांचे परंपरागत विरोधक आहेत. या पारंपरिक राजकीय लढतीला यंदा बंडखोरीच्या आणि नाराज उमेदवारांच्या बंडाने एक वेगळेच वळण लागले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिकृत उमेदवारांपेक्षा बंडखोरांच्या आरोप प्रत्यारोपानी अधिक गाजण्याची चिन्हे आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.