
Shani temple trust scam : अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर इथल्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या भ्रष्टाचाराप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. फौजदारी कारवाईचे संकेत दिले आहेत.
अनियमित कर्मचारी भरती व ॲप घोटाळ्यात फौजदारी दाखल करूनच पंढरपूर आणि शिर्डीप्रमाणे इथल्या देवस्थानवर सन 2018मध्ये मंजूर केलेल्या कायद्याअंतर्गत समिती स्थापन केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
आमदार विठ्ठल लंघे अन् आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अधिवेशनात शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या भ्रष्टाचारावर लक्षवेधी उपस्थित केली होती. लंघे यांनी बनावट ॲप, बनावट पावती पुस्तक व क्यूआर कोडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये देवस्थानच्या तिजोरीत न जाता खासगी व्यक्ती व काही पुजाऱ्यांच्या खात्यावर जात असल्याचा आरोप करून बोगस नोकर भरतीवर ताशेरे ओढले.
आमदार धस यांनी सन 2018साली करण्यात आलेला कायदा अंमलात आणून इथल्या विश्वस्त मंडळाची नेमणूक करताना विद्यमान विश्वस्तांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यापूर्वी आमदार लंघे व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. भाजपचे (BJP) ऋषिकेश शेटे यांनी शनिशिंगणापुरात उपोषण केल्यानंतर कर्मचारी भरती प्रश्नाला वाचा फुटली होती.
ॲप घोटाळ्यावर शनिसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल सुरपुरिया, देवस्थानचे माजी विश्वस्त डाॅ. वैभव शेटे, काँग्रेसचे संभाजी माळवदे व ऋषिकेश शेटे यांनी आवाज उठवल्यानंतर देवस्थान प्रशासनाने सायबर शाखेत तक्रार दाखल केली होती. एक महिना उलटूनही कुठलीच कारवाई झालेली नसताना आज विधिमंडळात लक्षवेधी होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी धडाकेबाज कारवाई करण्याचे संकेत दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्मचारी भरतीची खानेसुमारी वाचून दाखविताना विश्वस्त मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले. 258 कर्मचाऱ्यांवर व्यवस्था होत असताना इथं 2 हजार 447 बोगस कर्मचारी भरल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय, बगीचा, वाहनतळ, सुरक्षा विभाग, शेती, भक्तनिवास, पाणीपुरवठा, स्वच्छता व विद्युत विभागात किती कर्मचाऱ्यांची गरज असताना किती भरले व चौकशीत तिथं किती आढळले, याविषयी सविस्तर माहिती मांडली. याचवेळी त्यांनी फौजदारी कारवाईचे संकेत दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांचे कारनामे सांगताना आता देवाचे नव्हे, तर विश्वस्तांचेच मंदिर बांधावे लागेल, असे उपरोधिक टोला मारून नवीन कायद्याअंतर्गत समिती करण्याच्या अगोदर आताच्या विश्वस्तांना त्यांची जागा दाखवून त्यांचा सत्कार म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.
देशात आणि जगात शनिशिंगणापूर हे गाव मुलखावेगळे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या घरांना दरवाजे नसून इथं कडीकुलूपाचा वापर होत नाही. अशा ख्याती असलेल्या देवस्थान ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार व घोटाळा करणे चुकीचे आहे. पडद्यावरील व पडद्यामागील सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची गरज असल्याची मागणी आमदार विठ्ठल लंघे यांनी केली.
आमदार सुरेश धस यांनी शनिसाई प्रतिष्ठानच्या तक्रारीचा उल्लेख केल्याने आम्ही दिलेला लढा यशस्वी होत असल्याचे समाधान आहे. विश्वस्तांचा भ्रष्टाचार व ॲप घोटाळ्यातील व्यक्तींच्या हातात बेड्या पडेपर्यंत लढा सुरू राहील, असा इशारा शनिसाई प्रतिष्ठानचे विशाल सुरपुरिया यांनी दिला.
गर्दी आणि कामाचे स्वरूप पाहून देवस्थानच्या त्या-त्या विभागात गरजेनुसार कर्मचारी भरती केली होती. ॲपविषयी सायबर शाखेत तक्रार दिली आहे. त्यात कुणी देवस्थानचा कर्मचारी आढळला, तर देवस्थानच्या वतीने फौजदार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे शनैश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.