Nashik news: विधान परिषद निवडणुकीत शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले आणि क्रॉस वोटिंगचा आरोप असलेले आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.
अनेक पक्षांच्या नेत्यांशी निकटवर्तीय असलेले खोसकर यांनी अजित पवार यांचा शब्द खरा ठरवला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी काही दिवसांपूर्वी हिरामण खोसकर हे काँग्रेस पक्षात असले तरी ते आमचेच आहेत. ते आमच्या बैठकांना उपस्थित राहतात, असे विधान केले होते. आमदार खोसकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केल्याने, ते म्हणणे खरे ठरले.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांवर क्रॉस वोटिंगचा आरोप आहे. त्यामध्ये आमदार खोसकर यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेसने पक्षविरोधी कारवाया केल्याने निलंबित केले होते. खोडके यांच्यावर देखील क्रॉस वोटिंगचा आरोप आहे.
खोडके यांच्या प्रमाणे आपल्यावरही कारवाई होणार या भीतीने आमदार खोसकर सावध झाले होते. सोमवारी सायंकाळी त्यांनी मजूर फेडरेशनच्या कार्यालयात आपल्या विश्वासातील मजूर सोसायटीचे संचालक आणि कंत्राटदारांची चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या विश्वासातील कंत्राटदारांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची शक्यता नाही. त्यामुळे राजकीय कारकीर्द सुरू ठेवण्यासाठी अजित पवार गटात प्रवेश करावा, अशी सूचना केली होती.
त्यानंतर आमदार खोसकर सध्या काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या संपत सकाळे, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले संदीप गुळवे यांसह काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे १५ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. यामध्ये आमदार खोसकर यांचाही समावेश होता
हा मतदारसंघ काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात कोणत्या पक्षाला सुटणार याची उत्सुकता आहे. सध्या शिवसेनेच्या उपनेते आणि या मतदार संघातील माजी आमदार निर्मला गावित यादेखील उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर इगतपुरी मतदारसंघातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विधानसभेच्या निवडणूक आज जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर गेले तीन महिने आमदार खोसकर यांच्यावर कारवाईची लटकती तलवार होते, त्यामुळे ते अस्वस्थ होते. या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून तर विविध नेत्यांच्या भेटी घेऊन चाचपणी केली होती.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करून आपल्यावर कारवाई करू नये. आपण एकनिष्ठ आहोत. असे वारंवार सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र काँग्रेसने खोसकर यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय आधीच घेतला होता.या पार्श्वभूमीवर खोसकर यांनी सोमवारी रात्री अजित पवार गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.