Congress Politics: राजकीय पक्षांनी नाकारलेले वेटींगवरील इच्छुक मुलाखतीसाठी काँग्रेसच्या दारी?

Congress Politics; Rejected and waiting by other parties, candidates on the Congress door-नाशिकमध्ये काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी पार पडल्या
Kunal Patil, Congress
Kunal Patil, CongressSarkarnama
Published on
Updated on

Nashik Congress News: सध्याचे राजकारण आयाराम गयाराम यांचा प्रभाव असलेले आहे. याची प्रचिती नाशिकच्या राजकारणात वारंवार येऊ लागली आहे. काँग्रेसलाही शनिवारी त्याचा अनुभव मिळाला.

शनिवारी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यावेळी १५ मतदार संघासाठी ६३ जणांनी मुलाखती दिल्या. याव्यतिरिक्त चार ते पाच अन्य पक्षातील इच्छुकांनी निरीक्षकांची संपर्क केला. मात्र ते मुलाखतीला आले नाही.

पक्षाच्या निरीक्षकांकडे ६३ जणांनी मुलाखती दिल्याने काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि निरीक्षक अक्षरशा हूरळून गेले होते. यातील गंभीर आणि खरोखर लढत देण्याजोगे उमेदवार किती? याचे उत्तर मात्र न विचारलेलेच बरे. त्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा हवेत बाण मारणार का? असा प्रश्न कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये चर्चेत आहे.

काँग्रेस पक्षाचा जिल्ह्यातील मालेगाव शहर, मालेगाव बाह्य (दाभाडी), नांदगाव, येवला, देवळाली, नाशिक पूर्व, बागलाण, सिन्नर, इगतपुरी आणि चांदवड या मतदारसंघांवर प्रभाव होता. यातील विविध मतदार संघ या पक्षाच्या नेत्यांनी सहज सहकारी पक्षांना सोडले. यामध्ये प्रामुख्याने येवला, नांदगाव, बागलाण, नाशिक पूर्व आणि देवळाली या मतदारसंघांचा समावेश आहे.

Kunal Patil, Congress
Sanjay Raut Politics: संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसेंना दाखवला कात्रजचा घाट?

येवला आणि नांदगाव हे मतदार संघ मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांसाठी या पक्षाने सहज सोडले. परिणामी या सर्व मतदारसंघांमध्ये आज काँग्रेस पक्ष आपला राजकीय प्रभाव गमावून बसला आहे. तरीही ग्रामपंचायत स्तरावरच्या काही लोकांनी मतदार संघासाठी विधानसभेचे इच्छुक म्हणून मुलाखती दिल्याचे आढळले.

पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी खरोखर किती गंभीर आहे. याचा संदेश या मुलाखतीतून गेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा प्रभाव मालेगाव शहर, मालेगाव बाह्य, चांदवड, इगतपुरी आणि नाशिक मध्य या मोजक्या मतदारसंघांमध्ये आहे.

यातील नाशिक मध्य मतदार संघामध्ये अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या यातील गांभीर्याने निवडणूक लढवतील आणि प्रस्थापित भाजपला आव्हान देण्याची क्षमता असलेले उमेदवार कोण? याचे उत्तर शोधावे लागेल.

Kunal Patil, Congress
Radhakrishna Vikhe : 'काय बोलतात याचं भानच नाही'; राहुल गांधींवर मंत्री विखेंचा निशाणा

मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या मुलाखती सुरू असतानाच उपनेते अद्वय हिरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मालेगाव शहरातील प्रभावी उमेदवार आणि माजी आमदार असिफ शेख यांनी पक्ष सोडला आहे. इगतपुरी मतदार संघात विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांच्यावर क्रॉस वोटिंग चा आरोप आहे.

आमदार खोसकर विविध नेत्यांकडे जाऊन रिकाम्या हाती परतलेले आहेत. अशा स्थितीत काँग्रेसकडे बहुतांशी इच्छुक मुंबईला जाणाऱ्या विधानसभेच्या सुपरफास्ट गाड्यांचे 'वेटिंग'चे तिकीट घेतलेले नेते आहेत. या नेत्यांना अन्य राजकीय पक्षांनी जवळपास नो एन्ट्री केली आहे. असे उमेदवार आपल्याकडे येतील, अशी भाबडी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसून आली.

नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेसकडे सर्वाधिक १३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यातील बहुतांशी नेत्यांनी यापूर्वी उमेदवारी केली आहे. गेली दहा वर्ष हा मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे आमदार आहेत.

या दहा वर्षात भाजपची कार्यपद्धती आणि विद्यमान आमदार यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या कोणत्या इच्छुकाने तोंड उघडले किंवा त्यांच्या कामातील त्रुटी जनतेपुढे मांडल्या, अशा उमेदवार या इच्छुकांमध्ये भिंग घेऊनही सापडणार नाही.

काँग्रेस पक्षाच्या मुलाखती खरोखर गंभीर प्रक्रिया होती की सोपस्कार हा देखील पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्येच चर्चेचा विषय आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गंभीर होऊन आपल्या पुढील राजकीय आव्हानाला सामोरे जाण्यासाठी परिश्रम घेतील का? की, त्यासाठीही महाविकास आघाडीच्या अन्य पक्षांच्या भरवशावर अवलंबून राहतील हे लवकरच स्पष्ट होईल.

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, खासदार डॉ शोभा बच्छाव, जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल, शहर अध्यक्ष आकाश छाजेड यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्याचा अहवाल ते प्रदेश कार्यालयाला पाठविणार आहेत. मात्र यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील इच्छुकांनी यापूर्वीच प्रदेश नेत्यांकडे लॉबींग केलेले आहे. त्यामुळे या अहवालाला पक्ष किती गांभीर्याने घेतो, हाही चर्चेचा विषय आहे.

---------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com