Congress News : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मतदानात महाविकास आघाडीवर मात केली. मात्र जागांच्या तुलनेत भाजपची पीछेहाट झाली. त्यामुळे उत्साह वाढलेली काँग्रेस मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा जोरात आहे. पक्षाचे इच्छुक जोमात आहेत. कार्यकर्ते काय होते, याकडे डोळे लावून बसले आहेत.
या स्थितीत उत्तर महाराष्ट्रातील 35 पैकी पंधरा विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. या पक्षाकडे सध्या फक्त पाच आमदार आहेत. ही संख्या किती वाढेल? याबाबत काँग्रेसच्या अभ्यासकांनाही शंका आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेचे सहा खासदार आहेत. या सर्व सहा जागांवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे गोवाल पाडवी आणि डॉ शोभा बच्छाव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे (Bhskar Bhagare) आणि शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) विजयी झाले. भाजपच्या चार खासदारांना पराभूत व्हावे लागले.
विशेष म्हणजे या सहा मतदारसंघात भाजपला 34.15 लाख तर महाविकास आघाडीला 32.06 लाख मते मिळाली आहेत. मात्र जळगावच्या दोन्ही जागांवर भाजपला 5.87 लाख मते मिळाली. उर्वरित चार जागांवर महाविकास आघाडीला 3.77 लाख मतांची आघाडी आहे. यामध्ये 18 पैकी 13 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुढे आहे. लोकसभेला मते कमी, मात्र भाजप पेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला. त्याची विविध कारणे आहेत.
धुळे (Dhule) शहरात या पक्षाला कोणतीही यंत्रणे नसताना 96 हजार मते मिळाली. मालेगाव मध्य या मतदारसंघात 2.08 लाख पैकी 1.98 लाख मते काँग्रेसला मिळाली आहेत. आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने नाशिक जिल्ह्यात 15 पैकी सात जागांवर आणि नंदुरबार जिल्ह्यात चार पैकी चारही जागांवर दावा केला आहे. धुळे जिल्ह्यात पाच पैकी दोन जागांवर या पक्षाकडे प्रभावी उमेदवार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सध्या दोन आमदार आहेत. भाजपचे आमदार राजेश पाडवी काँग्रेसच्या वाटेवर आहेत, असे बोलले जाते. नंदुरबार मतदारसंघात मंत्री विजयकुमार गावित यांना गावित विरोधकांच्या मदतीने पराभूत करण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहेत.
जळगाव जिल्ह्यात काँग्रेसची (Congress) स्थिती नाजूक आहे. धुळे आणि नाशिक जिल्ह्यात या पक्षाला सहकारी पक्षांच्या बळावर चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांना वाटतो. त्यांचा हा वाढलेला आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या सहकारी पक्षांसाठी मात्र डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेले वातावरण विधानसभेत एनकॅश करण्याचा या पक्षाचा विचार आहे. त्यामुळेच पक्षाच्या इच्छुकांची संख्या आणि उत्साह दोन्हीही वाढला आहे.
काँग्रेसच्या पाच पैकी इगतपुरीच्या हिरामण खोसकर वगळता चारही उमेदवारांना पुन्हा निवडणुकीची संधी मिळेल. नाशिक जिल्ह्यात काँग्रेसचा 15 पैकी 1 (हिरामण खोसकर), धुळ्यात 5 पैकी 1 (कुणाल पाटील), नंदुरबारला चार पैकी 2 (के. सी. पाडवी आणि शिरीष नाईक) जळगावला 11 पैकी एक (शिरीष चौधरी) आहेत. तळोदा (नंदुरबार) भाजपचे आमदार राजेश पाडवी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा कल विधानसभेलाही कायम राहणार, असा दावा केला जातो. महायुतीच्या सरकारनेही त्याचा धसका घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष राज्यभर जोरात तयारी करीत आहे. पक्षाचे नंदुरबार आणि नाशिक येथे आढावा बैठका झाल्या त्यात कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांतील हा उत्साह दिसून आला. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा भरारी घेईल का? याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.