धुळे : धुळे शहर (Dhule city) सतत विविध नव्या प्रकरणामुळे चर्चेत असते. आता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्याच्या कंत्राटदारांकडून खुले आम `टोल` मागितल्याने चर्चेत आले आहे. अर्थात हे अधिकारी पैश्याच्या मागनीला टोल म्हणतात. (Bribe) त्यामुळे वैतागलेले कंत्राटदार निवेदन देण्यास गेले असता,या कार्यकारी अधिकारी खुर्ची सोडून गायब झाल्याने त्याची चर्चा झाली ती वेगळीच.
जो जास्त रक्कम देईल त्याचेच बिल काढायचे, अशी प्रथा सध्या येथील सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू आहे. शासनाकडून निधी आला, तर अधिकारी म्हणतात, ‘निधी आम्ही आणला. त्याला टोल तर लागेलच,’ अशा पद्धतीचा टोल वसूल केला जात आहे, असा गंभीर आरोप धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने गुरुवारी केला. विभागाच्या या कारभाराचा निषेध नोंदवीत न्याय द्यावा, अशी मागणीही केली. (Dhule Latest Marathi News Updates)
येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची एकूणच कार्यपद्धती व कामांच्या बिल अदायगीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात निदर्शने केली. अधिकाऱ्यांवर गंभीर आरोपही केले. अधीक्षक अभियंताही मनमानी करतात. टेंडर ताबडतोब उघडले जात नाही. काही ठेकेदारांना झुकते माप दिले जाते. जो जास्त रक्कम देईल, त्याचेच बिल काढायचे, अशी प्रथाच सध्या सुरू आहे. त्यामुळे ठेकेदार हवालदिल झाले आहेत, असे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने म्हटले आहे.
घुगरी यांची मनमानी
पीडब्ल्यूडी व पीडब्ल्यूडी ईजीएस या दोन विभागांमध्ये अधिकाऱ्यांची अक्षरशः मनमानी सुरू आहे. कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी तर बांधकाम विभाग आपली खासगी मालमत्ता असल्यासारखे वावरतात. कार्यालयाच्या आवारातील सर्व गेट बंद केले आहेत. संपूर्ण विभागाला फेरी मारून मागील दाराने विभागात जावे लागते. याबाबत पक्षांनीही आंदोलन केले. कार्यालयात गेल्यावर कार्यकारी अभियंता श्रीमती घुगरी ‘ठेकेदारांना येऊ देऊ नका, तुमचा प्रतिनिधी पाठवा,’ असे सांगतात. प्रतिनिधी पाठविला, तर ठेकेदार का येत नाहीत, असे म्हणतात. शिवाय वयाचा विचार न करता अरेरावी करतात. त्यांच्या या कार्यपद्धतीची तक्रार वरिष्ठ म्हणून अधीक्षक अभियंत्यांकडे केली, तर तेही उडवाउडवीची उत्तरे देतात. चर्चेने मार्ग काढू, असे केवळ आश्वासन दिले जाते, असे असोसिएशनने म्हटले आहे.
खुर्चीला चिकटविले निवेदन
असोसिएशनचे पदाधिकारी निवेदन घेऊन अधिकाऱ्यांकडे गेले. मात्र, दालनात अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता विवेक नवले व कार्यकारी अभियंता श्रीमती घुगरी यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवत निषेध नोंदविला. असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले, सचिव प्रकाश पांडव, कार्याध्यक्ष दीपक भामरे, दीपक अहिरे, ए. बी. वाघ, अभिनव गिते, अरविंद राजपूत, एस. एम. कोठावदे, एन. एम. सोनवणे, आशिष अग्रवाल, राकेश कापडे, पंकज देसले, विकास चौधरी, विक्की महाले, छत्रपाल भदाणे, बापू भावसार, अमोल सूर्यवंशी, तुषार पाटील, पवन पाटील, सागर खैरनार, अनिल पगारे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.