Dindori News, 23 May: दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची (Dindori Lok Sabha 2024) जबाबदारी भाजपने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर सोपविली होती. या मतदारसंघात अतिशय नकारात्मक वातावरण तयार झाले होते. हे वातावरण निवळण्यासाठी गिरीश महाजन यांनी आठ दिवस तळ मतदारसंघात तळ ठोकला होता.
दिंडोरी मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान सभा झाली होती. कांदा निर्यात बंदी या विषयावर शरद पवार यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन झाले होते. शेतकऱ्यांना निर्यात बंदीचा मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर यंदाची लोकसभा निवडणूक झाली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना प्रचारात अनेक अडचणी आल्या.
या मतदारसंघाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यामुळे जळगाव आणि रावेरचे मतदान संपल्यावर महाजन यांनी येथे तळ ठोकला. त्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर भाजपला ही जागा जिंकण्यासाठी थेट कार्यकर्त्यांची संवाद सुरू करण्यावर भर दिला. यासंदर्भात महाजन यांनी दिंडोरी मतदारसंघातील १९२० बुथनिहाय यंत्रणा सक्रिय केली. त्यांच्याकडून पक्षाविष्यी मतदारांचा कल समजून घेतला. परिस्थिती कठीण असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मतदारसंघातील महायुतीच्या सर्व आमदारांना सक्रिय करण्यासाठी सढळ हाताने रसद पुरवली.
गिरीश महाजन यांनी दिंडोरी मतदार संघातील सर्व पक्षाच्या सरपंचांशी संपर्क केल्याचे कळते. मतदारसंघनिहाय सरपंचांशी त्यांनी संवाद केला. बैठका घेतल्या. यामध्ये त्यांना काय हवे? याची विचारणा केली. भाजपचा उमेदवार विजयी झाल्यास प्रत्येक गावात विकास कामांना निधी उपलब्ध करण्यात येईल. हा पारंपारिक राजकारणात राजकीय कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचा हमखास यशस्वी होणारा डाव त्यांनी टाकला.
यामध्ये अनेक सरपंचांनी त्यांच्याकडून मदत घेण्यास नकार दिल्याचे समजते. यातील काही सरपंचांनी निवडणूक झाल्यावर गावामध्ये विकास कामांना मंजुरी मिळावी, ही अपेक्षा व्यक्त करून भाजपला मदत करण्याचे मान्य केल्याचे समजते. त्यामुळे ग्रामविकास मंत्री महाजन यांचा हा प्रयोग भाजपाला खूपच लाभदायी ठरला. त्यातून शेवटच्या दोन-तीन दिवसात वातावरण बदलले, असा दावा भाजपचे नेते करीत आहेत.
नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला देश पातळीवर "अब की बार, चारसो पार" ही घोषणा साध्य करण्यासाठी विजय अपेक्षित आहे. भूतनिहाय झालेले मतदान व त्याचा तपशील आता प्रशासनाने उपलब्ध केला आहे. त्यामुळे सध्या सर्व कार्यकर्ते आणि नेते आकडेमोड करण्यात व्यग्र आहेत. या आकडेवारीचा अभ्यास करून महाजन यांच्याशी संवाद केलेल्या सरपंचांकडून खरोखर किती मदत झाली, त्यावर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांचा हा प्रयोग चर्चेत आहे.
Edited by: Mangesh Mahale
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.