नाशिक : मनमाड ते मुंबई (Mumbai) दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने (Railway) दिलासादायक निर्णय घेतला आहे. पंचवटी एक्सप्रेसला समांतर गोदावरी एक्सप्रेस सुरु करण्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी काल मंजुरी मिळवली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईला जाणारे व्यावसायिक, चाकरमाने व अन्य प्रवाशांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. गेली दोन वर्षे ही गाडी सुरु करावी यासाठी प्रवासी संघटना, मुंबईला रोज ये जा करणारे चाकरमाने व नागरिक पाठपुरावा करीत होते. त्याबाबत राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले होते. ही गाडी सुरु झाल्यास अनेक प्रवाशांची सोय होणार आहे.
यासंदर्भात काल राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांनी रेल्वे भवन येथे मंत्र्यांची भेट घेतली. कोरोना लाटेत धोरण म्हणून अनेक रेल्वे प्रवासी गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यातील काही लांब पल्ल्याच्या गाड्या अटींसह सुरु करण्यात आल्या. मात्र त्यात गोदावरी एक्सप्रेस सुरु झाली नव्हती. ही गाडी सुरु करणे आवश्यक असल्याची मागणी केल्यानंतर गोदावरी एक्सप्रेस सुरु करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात त्याची कार्यवाही अपेक्षित आहे.
ही गाडी सकाळी पंचवटी एक्सप्रेस नंतर नऊला मनमाड येथून सुटेल. सायंकाळी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून मनमाडकडे रवाना होईल. प्रायोगिक तत्वावर तीन महिने तीचा अभ्यास केला जाईल. पुरेसे प्रवासी व महसूल मिळाल्यास ती पुढे सुरु राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक, मनमाडच्या प्रवाश्यांनी याबाबत या गाडीचा लाभ घ्यावा असे डॅा. पवार यांनी सांगितले.
गोदावरी एक्सप्रेस ही इंटरसिटी प्रवासी गाडी आहे. तीला मोठा प्रतिसाद असतो. मात्र रेल्वे प्रशासनाने धोरणात्मक निर्णय म्हणून तोट्यातील गाड्या बंद केल्या होत्या. त्यात केवळ आरक्षणाचे निकष लावल्याने ही गाडी बंद झाली होती. याबाबत प्रवासी संघटना सातत्याने पाठपुरावा करून या गाडीला रिझर्व्हेशन एैवजी सर्वसाधारण तिकीट विक्रीचा विचार करावा असा आग्रह धरला होता. आता ही गाडी सुरु होत असल्याने ती नियमितपणे सुरु राहील याची दक्षता आम्ही सर्व घेऊ, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश फोकणे यांनी सांगितले.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.