प्रदीप पेंढारे
Negar Politics : गणेश कारखान्यावरून पुन्हा एकदा बाळासाहेब थारोत-राधाकृष्ण विखे यांचा संघर्ष पेटला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गणेश सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरचे अग्नी प्रदीपन झाले. आमदार थोरात यांनी यानिमित्ताने पुन्हा एका मंत्री राधाकृष्ण विखेंवर निशाणा साधला.
''गणेश कारखाना परिसरात ऊस उत्पादकांवर मोठी दहशत असून, बॉयलरचे अग्नी प्रदीपन होऊच नये, यासाठी पराकोटीचे प्रयत्न झाले. गणेश कारखाना बंद व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.'', असा आरोप आमदार थोरातांनी केला आहे. यामुळे थोरात-विखे यांच्यात पुन्हा तीव्र संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
श्री गणेश सहकारी सारख कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. युवा नेते विवेकभय्या कोल्हे, कारखान्याचे चेअरमन सुधील लहारे, व्हाइस चेअरमन विजय दंडवते, एकनाथ गोंदकर, प्रभा घोगरे, सुधीर म्हस्के, शिवाजी लहारे, गंगाधर चौधरी उपस्थित होते. आमदार थोरात यांनी या वेळी केलेल्या भाषणाचा संपूर्ण रोख हा मंत्री विखेंकडे होता. यातून पुन्हा थोरात-विखे संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
आमदार थोरात म्हणाले, "दुष्काळाचे सावट गडद आहे. गणेश कारखाना बंद व्हावा यासाठी टोकाचे प्रयत्न झाले. तरी देखील कारखान्याचा धुराडा पेटला आहे. ऊसाला योग्य भाव देण्याच प्रयत्न असून, सभासदांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आहे. परंतु काहींनी बॉयलर होऊ नये म्हणून पराकोटीचे प्रयत्न केले आहेत. मोठ अडथळ्यांची शर्यत आहे. आचारसंहिता असताना बेकायदेशीररित्या करार केले गेले. आता या कराराची भोकाडी दाखवून गणेश कारखान्याला कुठूनही आर्थिक मदत मिळू नये यासाठी नाकाबंदी केली जात आहे.''
याशिवाय ''जिल्हा बँकेने मंजूर केलेले कर्ज नाकारले आहे. गाळप परवान्यासाठी अर्ज केला, त्यामध्ये देखील आडकाठी आणली गेली. प्रवरा कारखान्याने गणेश कारखान्याकडून ८१ कोटी रुपयांची मागणी केली आहे. हा आकडा रोज वाढतोय म्हणून अंतर्गत लेखापरीक्षण केले. त्यांनीच नियुक्ती केलेल्या शासकीय लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण केले आहे. हा आकडा कोठेही जुळत नाही. मग हे ८१ कोटी आले कोठून?", असा प्रश्न आमदार थोरात यांनी उपस्थित केला आहे.
याचबरोबर ''गणेश कारखाना परिसरात ऊस उत्पादकांवर दशहत आहे. ऊसाची नोंद करा, अन्यथा कर्ज मिळणार नाही. गणेश कारखान्याला ऊस घातला, तर रस्त्याचे आणि बांधाचे प्रश्न तयार होतील, असे सभासदांना सांगितले जात आहे. परंतु सभासद कोणत्याची धमकीला भीक घालत नाही, याचे कौतुक वाटते.'' असंही थोरातांनी यावेळी म्हटलं.
याशिवाय, ''गेल्या सात-आठ वर्षात पाण्याच उपलब्धता होती. अशा काळात चांगले गाळप व्हायला हवे होते. पण तसे झाले नाही. आता आम्ही अडचणीच्या काळात आलो आहोत. परंतु सभासदांच्या पाठबळामुळे आणि परमेश्वराच्या कृपेने चांगले यश मिळत आहे. यामुळे समोरच्यांचा हेतून स्पष्ट होतो. यांना संस्था चालवायची नव्हती. हडप करायची होती', असा आरोपही आमदार थोरात यांनी केला.
तर विवेक कोल्हे यांनी पाणी संकटावर लक्ष वेधत नगर-नाशिक असा संघर्ष पाण्यासाठी होणार आहे. यासाठी सर्वपक्षीय लढा उभारावा लागेल, असे सांगितले.
निळवंडे धरण आणि कालव्यांचे उद्घाटन कोण करते हा प्रश्न दुय्यम आहे. निळवंडे धरणामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण होणार आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. दुष्काळी भागाला पाणी मिळाले. माझे आजवरचे प्रयत्न फळाला आले आणि माझे जीवन सार्थकी लागले, असे मी समजतो, अशीही प्रतिक्रिया आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
(Edited By - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.