Nashik Election: शिवसेना शिंदे गटाने नाशिकच्या दोन उमेदवारांना निवडणुकीतील माघार घेण्याच्या सूचना केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध ऐनवेळी हे उमेदवार देण्यात आले होते. शिंदे पक्षाने घेतलेल्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात याची आता उत्सुकता आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार धनराज महाले (दिंडोरी) आणि राजश्री अहिरराव (देवळाली) यांना शिवसेना शिंदे पक्षाने एबी फॉर्म दिले होते. आता ते मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे हे उमेदवार नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या देवळालीतील विद्यमान आमदार सरोज अहिरे आणि दिंडोरी मतदार संघातील आमदार नरहरी हे अधिकृत उमेदवार होते. मात्र महायुतीतील समन्वयाअभावी हे उमेदवार अडचणीत आले होते. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे पक्षाने दोघांना एबी फॉर्म दिले होते.
यामध्ये देवळालीतून राजश्री अहिरराव आणि दिंडोरी मतदार संघातून माजी आमदार धनराज महाले यांचा समावेश होता. यासंदर्भात स्थानिक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.
याबाबत शनिवारी सायंकाळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही उमेदवारांना माघार घेण्याच्या निर्णयाला संमती दिली होती. रविवारी दुपारी संबंधित निर्णय पक्षाचे जिल्हाप्रमुख व अन्य पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आला होता. मात्र रात्री हे दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल झाले.
या उमेदवारांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते त्यांचा शोध घेत आहेत. शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी या दोन्ही उमेदवारांची संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यात आज सकाळी माजी आमदार धनराज महाले यांचा ट्रेस लागला. मात्र त्यांचा फोन अद्यापही नॉट रिचेबल आहे.
सौ. जयश्री अहिरराव यांचा शोध सुरू आहे. यासंदर्भात पक्षाचे नेते विजय करंजकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने जो आदेश दिला आहे, त्याचे पालन संबंधित उमेदवारांना करावेच लागेल. पक्षाने एबी फॉर्म दिल्यावर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
आता पक्षाने माघार घेण्याची सूचना केली आहे त्याचे पालन करून आज या उमेदवारांना माघार घ्यावी लागेल, असे संकेत आहेत. या निमित्ताने आमदार नरहरी झिरवाळ आणि सरोज अहिरे यांच्या निवडणुकीतील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. या उमेदवारांनी आता निवडणुकीतून माघार घेतली नाही, तरीही त्यांचा पुढचा मार्ग सोपा नसेल. पक्षाची कोणतीही यंत्रणा या उमेदवारांचा प्रचार करणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.