Nashik News: भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश्य स्थिती आहे. देशभर अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मात्र सरकारी अधिकाऱ्यांचा थाट आणि मौजमजा यावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, असा विरोधाभास पहायला मिळाला.
सोळाव्या वित्त आयोगाच्या शिष्टमंडळाने नुकतीच नाशिकला भेट दिली. हा थेट आर्थिक अनुदानाशी निगडित विषय होता. त्यामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने या दौऱ्याच्या व्यवस्थेत कुठेही कमतरता राहू नये यासाठी खबरदारी घेतली होती.
आयोगाच्या अध्यक्षांसह पदाधिकारी आणि १३ अधिकारी विशेष विमानाने नाशिकला दाखल झाले. तत्पूर्वी सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन देवदर्शन आणि पूजेचा कार्यक्रम मनोभावे पार पाडला. त्यानंतर प्रमुख अधिकाऱ्यांसह बैठक पार पडली.
या बैठकीत प्रामुख्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा विषय घेण्यात आला होता. विविध २६ यंत्रणांनी कुंभमेळ्यासाठी २४ हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला होता. त्यात विविध सुधारणा केल्या जात आहे. सविस्तर माहिती आणि सादरीकरण यावेळी आयोगाच्या शिष्टमंडळापुढे करण्यात आले.
जिल्ह्यातील विविध नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांचा जिल्हा परिषदेच्या योजनांचा देखील आढावा यावेळी घेण्यात आला. आयोगाने दिलेल्या निधीचा विनियोग कसा करण्यात आला आहे याची माहिती ही देण्यात आली. या बैठकीत आयोगाकडून जिल्ह्यासाठी ठोस निधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र निवडणुका झाल्या नसल्याने आणि लोकप्रतिनियुक्त शासन नसल्याने याबाबत निर्णय घेता येणार नाही असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाचा हिरमोड झाला.
प्रशासनाचा हिरमोड झाला असला तरी आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या सरबराईत कोणतीही कमतरता प्रशासनाने ठेवली नाही. सीमेवर युद्धसदृश्य स्थिती आहे. सर्व यंत्रणा अलर्ट आहेत. शासनाकडून विविध सूचना करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या रजा ही रद्द करण्यात आलेल्या आहेत. मात्र आयोगाच्या शिष्टमंडळाला त्याच्याशी फारसे काही सोयरे सुतकच नव्हते असे चित्र दिसले.
या शिष्टमंडळाच्या अधिकाऱ्यांची पंचतारांकित व्यवस्था करण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर सायंकाळी त्यांनी रामकुंडावर भेट देऊन पूजा केली. गोदा आरतीला हजेरी लावली. त्यानंतर देशभर वाईनरी साठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या वाइनरीचाही पाहून चार घेतला. त्यामुळे निधी तर काही पदरात पडला नाही मात्र सरबराई करण्यातच सगळ्यांची दमछाक झाली.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.