Ahilyanagar News : भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भावनिक पत्ता बाहेर काढला. ते पुन्हा राहुरी-नगर तालुका विधानसभा मतदारसंघातून नशिब आजमावणार आहेत.
'ही शेवटची निवडणूक असल्याचं सांगून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव वाढत्या वयात देखील राजकीय मैदानात उतरणार आहे', असे शिवाजी कर्डिले यांनी म्हटलं.
माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, "राजकारणामध्ये अपयश येत असते. आता माझी ही शेवटची निवडणूक आहे. तुम्ही मला गेली 25 वर्षे भरपूर दिले. वयाचा विचार केला पाहिजे. ही निवडणूक (Election) कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि मागणीनुसार लढणार आहे. गावातील गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून एकमेकांमधील मतभेद विसरून काम करा". माझ्याकडे कोणी आले, तरी त्यांचे काम केले जाते. गेल्या पाच वर्षांमध्ये मी आमदार नसलो, तरी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे मला आमदार असल्यासारखे वाटले. विकास कामे करण्याची चिंता तुम्ही करू नका, ती जबाबदारी माझी आहे, असेही शिवाजी कर्डिले यांनी म्हटले.
माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी देखील शिवाजी कर्डिले यांची ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगून त्यांनी गेली 25 वर्षे त्याग, संघर्ष केल्याकडे लक्ष वेधले. त्यांच्या त्यागाची आणि संघर्षाची परतफेड करण्याची वेळ आल्याचे भावनिक आवाहन केले. तसंच मला कधीच पदाचा मोह नव्हता. मी राजकारणातून युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करायचे स्वप्न पाहिलेले आहे. मतदारसंघात कर्डिले यांनी विकास कामातून बदल घडवून आणला. गेल्या 25 वर्षांत शेती, डीपी, शाळा खोल्या, वाड्यावस्त्यांपर्यंत रस्त्यांची कामे केली. त्यांना मदत करण्याची वेळ आली आहे, असेही सुजय विखे यांनी म्हंटले.
नगर तालुक्यातील कापूरवाडी, पिंपळगाव उज्जैनी, पोखर्डी ते छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता मजबुतीकरण कामाचा प्रारंभ माजी खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी कर्डिले यांच्यासह बाजार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोठे, उपाध्यक्ष रभाजी सूळ, हरिभाऊ कर्डिले, संतोष म्हस्के, विलास शिंदे, कैलास पठारे, शिवाजी दुशिंगे, गोविंद वाघ, इस्माईल शेख उपस्थित होते.
शिवाजी कर्डिले यांची सभा पावसात झालेली आहे. त्यामुळे आता ते नक्कीच निवडून येणार आहेत. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावरही आहे. त्यांनी देखील प्रत्येक निवडणुकीत मतदारसंघ बदलून निवडून येण्याचे काम केले, ही बाब सोपी नाही, अशी कोटीही माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.