Nashik BJP News: सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाने पक्षातच दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे स्थायी समितीचे माजी सभापती आणि भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात उमेदवारी केलेल्या गणेश गीते यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. त्याबाबत पदाधिकाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत.
शिवसेनेचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश मंगळवारी झाला. याच वेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांचा देखील प्रवेश होणार होता. मात्र तो लांबणीवर पडला. येत्या मंगळवारी हा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाचा अनुभव लक्षात घेऊन पंचवटी परिसरातील कार्यकर्ते गणेश गीते यांच्या घरबाबती बद्दल अतिशय संतप्त आहेत. विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी अतिशय आक्रमक आणि पातळी सोडून प्रचार केला होता. निवडणुकीत भाजप आणि गीते समर्थकांमध्ये अतिशय तीव्र भावना होत्या. त्यामुळे गीते यांना प्रवेश देऊ नये यावर पदाधिकारी ठाम आहेत.
गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांना श्री महाजन यांनी दोन वेळा स्थायी समिती सभापती पदाची उमेदवारी दिली होती. याच कालावधीत बांधकाम व्यवसायिकांच्या जमिनी महापालिकेला वर्ग करताना ८०० कोटी रुपये मोबदला देण्यात आला. त्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेण्यात आले होते.
भाजपच्या माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी याबाबत वरिष्ठ नेत्यांसह मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रारी केल्या होत्या. प्रश्नावर सातत्याने महापालिके विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. हा रोष प्रामुख्याने गणेश गीते यांच्या विरोधात होता. त्याबाबत यापूर्वी भाजप नेत्यांकडे तक्रार केली होती.
गणेश गीते यांच्या प्रवेशाला स्थानिक आमदार राहुल ढिकले यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. आमदार ढिकले यांनी याबाबत पक्षाची शिस्त म्हणून माध्यमांशी बोलणे टाळले आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर कथन केले आहे. त्यामुळे गीते यांच्या प्रवेशाचा चेंडू आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे.
गणेश गीते गेले काही दिवस सातत्याने मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. मंगळवारी देखील ते भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित असल्याचे बोलले जाते. श्री बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश होत असल्याने त्यांचा प्रवेश टाळला असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र श्री. गीते यांच्या प्रवेशाला असलेला विरोध जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची अनुकूलता लक्षात घेता पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नेला आहे. त्यामुळे गीते यांच्या प्रवेशात मोठे अडथळे अद्यापही दूर झालेले नाहीत.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.