Ahmednagar News: सोमवारी जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींचे निकाल लागल्यानंतर निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आपापल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील नेत्यांकडे धावू लागली आहेत. सत्कार आणि आनंदोत्सव सुरू झालेला आहे. यात निवडून आलेल्या गावच्या करभाऱ्यांना आता ग्रामविकासाची ओढ असून, अतिरिक्त निधीसाठी आतापासूनच अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
याच पद्धतीने वडगाव गुप्ता येथील नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांनी घेतली खासदार सुजय विखे यांची भेट घेत आनंद साजरा केला. नगर तालुक्याचे भाजप नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असून, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्या विश्वासातील आहेत. त्यामुळे वडगाव गुप्ता येथील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य भेटीला आल्यानंतर त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले भाजपप्रणित समृद्धी ग्रामविकास पॅनेलचा दणदणीत विजय झाल्याबद्दल या विजयाचा जल्लोष साजरा केला गेला. दरम्यान, खासदार विखे यांनी नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा अतिशय उत्साहात सत्कार केला व त्यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देऊन गावाचा विकास साध्य करण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन केले.
या वेळी सरपंच सोनूबाई विजय शेवाळे, सदस्य बाळासाहेब गंगाधर डोंगरे, आशाबाई दत्तात्रय शेवाळे, बाळू धोंडीराम शिंदे, विजय मुरलीधर शेवाळे, ज्ञानदा शिवाजी घाडगे, डोंगरे उमेश अशोक, सुवर्णा दत्तात्रय आंबेडकर, योगेश मच्छिंद्र निकम, सुनीता बाबासाहेब गव्हाणे, मीराबाई रावसाहेब डोंगरे, हुसेन गुलाब सय्यद, जिजाबाई प्रल्हाद डोंगरे, मीराबाई राजेंद्र शेवाळे आदी विजयी उमेदवार उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले की, "वडगाव गुप्ता या गावासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. जी विकासाची वाटचाल सध्या सुरू आहे, ती अशीच निरंतर चालू राहील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच सर्व विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना खासदार सुजय विखेंनी स्पष्ट केले की, "जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थकी लावून जनतेच्या विविध अडचणी समजून घेण्याचे काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे व जनतेचे सेवक म्हणून प्रामाणिक काम आपल्या माध्यमातून घडावे".
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.