

Nashik News : भारतीय हवामान विभागाने आज (दि. 7 जुलै) रोजी नाशिक जिल्ह्याला हाय अलर्ट जारी केला होता. तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यामुळे लोकांनी सतर्क रहावे व घराबाहेर पडू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.
एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट नाशिकमध्ये तयार होतो आहे. त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा जो मधला भाग आहे. या भागात मोठी ढगफुटी होऊ शकते, जवळपास ३०० एमएम पाऊस नाशिकमध्ये पडू शकतो तसे निर्देश प्राप्त झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली होती. त्यामुळे कालपासून यंत्रणा अलर्टमोडवर आली होती. नाशिकमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पर्यटन स्थळे, मंदिरे बंद ठेवण्यात आली.
परंतु पालघरमध्ये सुमारे ४५० मिमी पाऊस पाडणारा आणि त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा (Vortex) उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले (अहिल्यानगर) परिसराकडे सरकल्याने नाशिक व त्र्यंबकेश्वर ढगफुटीचे संकट टळले.
याच दरम्यान, अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या कथित दान चोरी प्रकरणाच्या विरोधात नाशिकच्या पंचवटी येथील प्रसिद्ध काळाराम मंदिराबाहेर काँग्रेसतर्फे 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनात भगवान रामाचे भजन करत सरकारचा निषेध करण्यात आला.
आंदोलनात 'चौकीदार चोर है, देश लुटला आता रामाचे दान ही लुटले' अशा आशयाचे बॅनर्स घेऊन आंदोलकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.
आमचे आंदोलन चिरडले जावे व लोकांनी आंदोलनाला येऊ नये, आम्हालाही थांबवता यावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढगफुटीची अफवा पसरवली असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. कुठलाही धोका नसताना त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी होणार असा फुगवटा त्यांनी तयार केला. नाशिकमध्ये ढगफुटी होणार अशी खोटी अफवा फडणवीसांनी पसरवली असा आरोप सपकाळ यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांचा कारभार सुलतानी असून त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणे-घेणे नाही, ते फोडाफोडीत व्यस्त आहे अशी टीका त्यांनी केली.
डोक्याची कीव येते
दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. सपकाळ यांच्या डोक्याची कीव करावीशी वाटते. आपण काय बोलतोय काय नाही. राज्यातील जनता किती अडचणीत आहे. परिस्थिती काय आहे. मला वाटतं त्यांनी भान ठेवलं पाहीजे. ही काही गंमत चाललेली नाही. अशा लोकांमुळेच कॉंग्रेस रसातळाला चालली असल्याची टीका आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सपकाळ यांच्यावर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.