नाशिक : छत्रपती शाहू महाराजांनी (Chhatrapati Shahu Maharaj) बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले. त्यांचे हे काम पुढे अविरत सुरू ठेवून बहुजन समाजाला एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. मी वंशज असलो, तरी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालविला आहे. ते शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत असे प्रतिपादन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhajiraje) यांनी केले.
संभाजीराजे छत्रपती यांनी श्री. भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी आम्ही एकमेकांना ताकद देऊ, असे श्री. भुजबळ यांनी आवर्जून सांगितले. संभाजीराजे यांनी छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा देशात अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची निर्मिती करून आरक्षण दिले याचे स्मरण करून दिले.
माजी आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, करण गायकर, योगेश निसाळ, विलास पांगरकर, समाधान जेजुरकर आदी उपस्थित होते.
श्री. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की नाशिकला झालेल्या मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनाच्या माध्यमातून श्री. भुजबळ यांची भेट झाली होती. त्या वेळी घरी येणार, असे मी त्यांना सांगितले होते. मात्र, अनेक दिवसांपासून भेट झाली नाही. नाशिकला कार्यक्रमानिमित्त आलो असता, त्यांची भेट घेतली. छत्रपती शाहू महाराज आणि नाशिकचा ऋणानुबंध आहे. नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेला त्यांनी मोठी मदत केली होती. तसेच पिंपळगाव बसवंत येथील सत्यशोधक चळवळीत काम करणारे गणपतराव मोरे यांना त्यांच्या कामाबद्दल अधिक बळ दिले.
संयुक्त प्रयत्न करणार
छत्रपती शाहू महाराजांच्या ६ मेस स्मृती शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दल आमची चर्चा झाली. यानिमित्त छत्रपती शाहू महाराजांचे विचार जगात पोचविण्यासाठी ही संधी असून, त्यादृष्टीने आमच्याकडून संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येतील. या भेटीत बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी चर्चा झाली. श्री. भुजबळ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे छत्रपती शाहू महाराजांचे विचार तळागाळातील नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. श्री. भुजबळ छत्रपती शाहू महाराजांचे विचार पहिल्यापासूनच समाजात रुजवत आहेत. शिवाय मराठा आणि ओबीसी कुठलाही वाद नाही. बहुजन समाजासाठी आपला लढा आहे. फार थोडे लोक असा वाद करतात. त्याला आपला विरोध आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्रित आल्यावर आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यामुळे बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही श्री. संभाजीराजे यांनी सांगितले.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.