Ahmednagar News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थ्यांचे अर्ज नाकारल्याचे संदेश आल्यानंतर टीका सुरू झाली. यावर सत्ताधाऱ्यांकडून लाभार्थ्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्ज नाकारल्याचे विरोधकांकडून जास्त भांडवल होवू नये म्हणून, सत्ताधारी आकडेवारी देखील बाहेर पडू न देण्याची काळजी घेत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात योजनेतील लाभार्थ्यांचे अर्ज नाकारल्यावर तसाच काहीचा प्रकार झाला. त्यावर प्रशासनाने लाभार्थ्यांना अर्ज अपडेट करण्याची संधी दिली. आता भाजपचे माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे योजनेसाठी मैदानात आले आहेत. त्यांनी यावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आमदार राम शिंदेंनी शुक्रवारी कर्जत-जामखेडमध्ये प्रशासनाची बैठक घेत आढावा घेतला.
"महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या सरकारवर बहिणींचा भरवसा वाढू लागला आहे. त्यामुळे विरोधकांचे पोटशूळ उठू लागले आहे. पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, याच्या सूचना प्रशासनाला गेल्या आहेत. विरोधकांनी योजनेबाबत चुकीचा गैरसमज पसरवत आहे. ते थांबवावे. नाहीतर, गाठ माझ्याशी आहे", असा इशारा भाजपचे (BJP) माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी दिला आहे. ही योजना कायमस्वरूपी असणार असून, ती प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचेही राम शिंदे यांनी सांगितले.
राम शिंदे म्हणाले, "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीच्या राज्य सरकाने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. यास महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता, विरोधकांना राजकीय पोटशूळ उठणे साहजिक आहे. येथील लोकप्रतिनिधी सदरची योजना फसवी आहे, म्हणत विरोध करीत होते". मात्र महिलांचा वाढता प्रतिसाद पाहत आपल्या यंत्रणेकडून स्टॉल उभारत अर्ज भरून घेण्यास सुरवात केली आहे. यावर त्यांचा अभ्यास समजून येतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता राम शिंदे यांनी लगावला.
कर्जत-जामखेड मतदारसंघात एकूण 65 हजार 786 अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये कर्जत 38 हजार 147 तर जामखेडच्या 27 हजार 639 लाभार्थी महिलांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 63 हजार 313 अर्ज आजमितीस पात्र ठरले असून 2 हजार 169 अर्ज तात्पुरते आणि अंशतः आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अभावी अपात्र झाले आहेत. मात्र आजच्या बैठकीत यावर दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली असून अपात्र लाभार्थी बहिणीसाठी सर्व यंत्रणा त्यांच्या घरी जात पुन्हा झालेल्या चुका आणि कागदपत्रांची त्रुटी भरून काढून त्यांना त्यांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे राम शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यावर विरोधकांनी फसवी योजना म्हणत याची खिल्ली उडवली. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सदरची योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अंमलबजावणी केली. महिलांनी देखील यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रक्षाबंधन सणाच्या अगोदर या योजनेचा लाभ महिलांच्या खात्यावर जमा होणार असल्याने याचा धसका विरोधकांनी घेतला आहे. याचा फटका आगामी विधानसभेला आपल्याला बसणार याचे नैराश्य काहींना घेतल्याची टीका राम शिंदेंनी पत्रकार परिषदेत केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.