जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank) महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलला बहुमत मिळाले आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक ११ जागा मिळाल्याने अध्यक्षपद त्यांच्याकडे जाणार आहे. मात्र, राष्ट्रवादीमध्ये अध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे आज (ता. २) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या उपस्थिती बैठक झाली. या वेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतना एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी ऐवजी भारतीय जनता पक्षाचा उल्लेख केला. त्यावेळी चांगलाच हशा पिकला. तर शिवसेनेचे नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना चिमटा काढला. खडसे म्हणाले, शिवसेनेचा किंवा राष्ट्रवादी (येथे खडसे यांनी भाजपचा उल्लेख केला) अध्यक्ष तो तो पक्ष मिळवून ठरवेल. तर तीन वर्ष राष्ट्रवादीचा (येथेही बोलताना खडसे यांनी राष्ट्रवादी ऐवजी भाजपचा उल्लेख केला) आणि दोन वर्ष शिवसेनाचा अध्यक्ष असण्यावर या बैठकीत एकमत झाल्याचे सांगितले. त्यानंतर खडसे यांनी सारवा सारव करत वेळ मारुन नेली.
खडसे यांनी दोन वेळा भाजपचा उल्लेख केल्यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले, अजूनही भाजप डोक्यातून जात नाही. यामुळे खडसे यांच्या मनात अजूनही भाजप असल्याचे दिसून आले. एकनाथ खडसे ४० वर्ष भाजपमध्ये होते. भाजपला राज्यात सत्ता मिळवून देण्यामध्ये त्यांना मोठा वाटा आहे. मात्र, त्यांच्यावर विविध आरोप झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यांच्या नावावर एकमत होण्याचीही शक्यता आहे. मात्र माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांची नावे चर्चेत आहेत. संचालक पदाची हॅटट्रीक करणारे संचालक संजय पवार हे सुध्दा दावेदार आहेत. जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे या पदासाठी पुन्हा इच्छुक आहेत. या शिवाय अमळनेर येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही इच्छा दर्शविली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी आपणही या पदासाठी इच्छुक असल्यचे सांगितल्याची माहिती मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.