

Sangamner wedding news : लग्न साधेपणानं करावं, असा सल्ला आपल्या कीर्तनातून देणारे इंदुरीकर महाराज यांनी आपल्या मुलीचा साखरपुडा आणि आता विवाह सोहळा शाही थाटात केला.
शाही साखरपुड्यावरून इंदुरीकर महाराज यांना चांगलेच ट्रोल व्हावे लागले होते. आता शाही विवाह सोहळ्यावर देखील ट्रोल होत आहे. त्यांना इंदुरीकर महाराज यांनी विवाह सोहळ्यातील आभार मनोगतातून चांगलेच सुनावले आहे.
निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा संगमनेर (Sangamner) इथं शाही विवाह सोहळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वारकरी संप्रदायातील राज्यातील मंडळी उपस्थित होती.
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सभापती प्रा. शिंदे, पालकमंत्री विखे, मंत्री भुजबळ यांनी इंदुरीकर यांची भेट वधू-वरांना आशीर्वाद दिले. विवाह सोहळ्याचे कौतुक केले. इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून लोक जागरणाचे काम करत, एक सशक्त समाज निर्माण केला. त्याच पद्धतीने वधू वरांच्या जीवनात आनंद यावा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, इंदुरीकर महाराज अगदी सरळ सोप्या भाषेत आणि विनोदी शैलीत कीर्तन करतात. इंदुरीकर महाराज म्हणजे गर्दीचा पाऊस, वारकरी संप्रदायासाठी जे जे करायचे ते काम त्यांनी केलं, असे म्हटलं.
कीर्तनातून साधे पणाने लग्न करण्याचा सल्ला देणारे इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा भव्य-दिव्य झाला. यावरून इंदुरीकर महाराज चांगलेच ट्रोल झाले. मुलीला देखील वैयक्तिक टार्गेट करण्यात आले. यानंतर व्यथित झालेले इंदुरीकर यांनी कीर्तन सेवेतून निवृत्ती घेतो, असे म्हटलं.
यातून पुन्हा सावरून, इंदुरीकर महाराज कीर्तन सेवेत येताच, काय बोंबलायचं ते बोंबला, साखरपुड्यापेक्षा विवाह सोहळा दिमाखदार करणार असल्याचा टोला ट्रोल करणाऱ्यांना लगावला. संगमनेरच्या गुंजाळवाडी इथं शाही थाटात मुलीचा काल विवाह झाला.
मुलीचा विवाह शाही थाटात झाल्यावर इंदुरीकर महाराज यांनी आभार मनोगत व्यक्त केले. यात त्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना काहीसे सुनावत, स्पष्टीकरण दिले. आता विवाहाची चर्चा वर्षभर होईल. मात्र ट्रोल करण्याचा कुणालाच अधिकार नाही, असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे.
इंदुरीकर महाराज म्हटले, "जशी साखरपुड्याची चर्चा महिनाभर चालली, तशी विवाहाची चर्चा वर्षभर होईल. ज्याची परिस्थिती चांगली, त्यांनी विवाहसोहळा करावा. आज मुलगा आणि मुलगी मोठी झाल्याचं दिसत आहे. मी कीर्तनासाठी फिरत असल्याने त्यांची भेट होत नव्हती. माझी आणि मुलाची देखील तीन वर्ष झाले भेट नाही. मी विद्यालय चालवतो, एक रुपया घेत नाही, 13 शिक्षक आहेत."
मुलीचा हा सोहळा बघितल्यानंतर प्रश्न विचारला जाईल, एवढा पैसा कुठून आला? माझ्या भक्तमंडळाने 90 टक्के खर्च केला. देणाऱ्यांनी दिलं आहे, त्यामुळे ट्रोल करण्याचा कोणाला अधिकार नाही. नास्तिक लोक त्यांचा मुळ स्वभाव सोडत नाहीत. जेव्हढं प्रेम टिकवलं तसेच मुलाप्रमाणे शेवटपर्यंत टिकवावे, अशा भावना इंदुरीकरांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.