Gavit Vs Zirwal News: आदिवासी जिल्ह्यांमध्ये नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. या प्रश्नावरून नाशिकमध्ये आदिवासी उमेदवारांनी आंदोलन करीत सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. गेल्या तेरा दिवसांपासून येथे आंदोलन सुरू आहे.
राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्रातील पात्रता धारकांना नियुक्ती मिळावी. यासाठी येथे उपोषण सुरू आहे. हे आंदोलन आता चांगलेच पेटले आहे. राज्यभरातील आदिवासी विद्यार्थी आणि युवक या आंदोलनात उतरले आहेत. काल यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी यांना घेराव घालत हे आंदोलन तीव्र करण्यात आले.
या आंदोलनाला विविध लोकप्रतिनिधींनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांना गुंडे यांच्या दालनात बैठक झाली. मात्र ही बैठक या प्रश्नावरील चर्चेऐवजी सरकारच्या बाजूने सहानुभूती दाखवणाऱ्या आमदार नरहरी झिरवाळ यांच्या खरडपट्टीने गाजली.
यावेळी माजी आमदार जे पी गावित यांनी झिरवाळ यांची चांगलीच काढली. त्यामुळे उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ही आवाक झाले. राज्यातील अन्य ठिकाणी भरती झाली. फक्त आदिवासी उमेदवारांवरच अन्याय का? हे सरकार आदिवासी विरोधी आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी झालेल्या बैठकीत आमदार झिरवाळ यांनी आपण दोन दिवसात बैठक बैठक घेऊ. हवे तर उद्या मंत्रीमंडळाची बैठक आहे. त्याचवेळी बैठकीसाठी आग्रह करू. त्यासाठी तुम्ही विविध कागदपत्र उपलब्ध करा. सरकारचे विविध नियम ते सांगी लागले. मुख्यमंत्री प्रश्न सोडवतील, असे ते सांगू लागले.
यावेळी आमदार गावित चांगलेच संतप्त झाले. त्यांनी आमदार झिरवाळ यांना अडवले. तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात की आदिवासींचेही प्रतिनिधी आहात?. याचा विचार करा. तुम्ही आदिवासी आहात हे विसरलात का?. सरकारने आमचे प्रश्न अडवून ठेवले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे हे सर्व बैठका गुंडाळतात. कोणताही प्रश्न सोडवत नाहीत. ठोस कार्यवाही होईल असे काहीच होत नाही. त्यामुळे आमच्या सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घ्या आणि त्यात हा प्रश्न सोडवण्यासाठी स्पष्ट निर्देश द्या.
राज्यभरातील आदिवासी उमेदवार आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याची तुम्हाला जाणीव का होत नाही. यासंदर्भात निर्णय झाल्याशिवाय आता आम्ही माघार घेणार नाही. असा सज्जड इशाराच त्यांनी दिला. त्यावर आमदार झिरवाळ हे देखील ओशाळले.
यावेळी खासदार भास्कर भगरे, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, आमदार हिरामण खोसकर हे देखील उपस्थित होते. यावेळी श्रीमती गुंडे यांनी आदिवासी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर भरतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात तांत्रिक अडचणी असल्याचे स्पष्ट केले.
नाशिकमध्ये आंदोलन करणाऱ्या उमेदवार आणि विद्यार्थी यांचे आंदोलन काल जास्तच तीव्र करण्यात आले. आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयापुढे त्यांनी धरणे धरले. उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कालच्या जिल्हाधिकारी कार्यालय घेराव घालण्याचा प्रयत्न केला.ऐन निवडणुकीच्या तोंडावर तीव्र बनल्याने आदिवासी लोकप्रतिनिधींनीही त्याचा धसका घेतला आहे.
-----
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.