

Goat release scheme for leopards : बिबटे अन् मानव यांच्यातील संघर्ष वाढला आहे. याचे पडसाद विधिमंडळात देखील उमटले. बिबट्यांपासून संरक्षणासाठी आमदार शरद सोनवणे बिबट्याचा पोशाख घालून विधिमंडळ परिसरात आरले. शरद सोनवणे यांच्या या कृतीमुळे सरकारचे लक्ष वेधले.
आता बिबट्यांना जंगलात रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी जंगलात शेळ्या-बकऱ्या सोडण्याची योजना सरकारच्या विचाराधीन असल्याचे म्हटलं आहे. यावर काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांनी अशी योजना म्हणजे, सोपा भ्रष्टाचार असा टोला लगावला आहे.
वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी, "हिंस्र प्राण्यांना जे भक्ष्य हवं असतं ते आता जंगलात उपलब्ध नाहीत. प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांना शेळ्या किंवा बकऱ्या गळ्यात टॅग घालून सोडण्याचा आमचा विचार आहे. प्रत्येक गावात जसा नंदी असतो, तशाच या शेळ्या-बकऱ्या असतील. बिबट्याचा धोका माणसांना होऊ नये यासाठी वनखात्यानं काही ठिकाणी शेळ्या सोडल्या आहेत."
'बिबट्या हा वन्यजीव प्राणी होता, पण तो आता ऊसातला जीव झालाय. जंगलापेक्षा ऊसाच्या फडात त्याचा जास्त वावर वाढला आहे. बिबट्या शेड्युल एकमध्ये असलेला हा प्राणी, पण आता तो शेड्युल दोनमध्ये समावेश करण्यासाठी, आम्ही प्रस्ताव वनखात्याला पाठवला आहे,' अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
'बिबटे जंगलात नसतील, तर त्याची वन्यजीव म्हणून गणना करू नये. सध्या काही प्रमाणात बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी आम्हाला केंद्रीय वनखात्याकडून मिळाली. बिबट्यांनी गावात हल्ले करू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत,' असे गणेश नाईक यांनी म्हटले आहे.
राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर आणि हल्ल्यांवर राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना सुरू आहेत. महायुती सरकार बिबट्यांनी खाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येऊ नये, यासाठी जंगलातच शेळ्या-बकऱ्या सोडण्याचा विचार करत आहेत. अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं नसलं, तरी पुण्यातील काही भागात बिबट्यांसाठी शेळ्या-बकऱ्या सोडल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
भाजप महायुती सरकारच्या विचाराधीन असलेल्या योजनेवर, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार होईल. शेळ्या जंगलात सोडल्या आणि त्या बिबट्यांनी खाल्ल्या हे सोपे कारण भ्रष्टाचाराला मिळेल, असे थोरात यांनी म्हटले.
'सह्याद्रीच्या पायथ्याशी बिबट्यांचा वावर खूप वाढला आहे. माणसांवर हल्ले होत आहेत. मुलांना बाहेर खेळणे अवघड झाले आहे. प्राण्यांना अभय देण्यासाठी अभयारण्य आहे व कायदा आहे. तसा आता माणसांना अभय मिळण्याकरीता कायदा गरजेचा आहे. पहिले माणसांना अभय द्या आणि मग प्राण्यांना द्या, असे म्हणण्याची वेळ या सरकारच्या काळात आली आहे,' असाही टोला थोरात यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.