Ahmednagar Political News : नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा निवडणुकीचे सोमवारी (29 एप्रिल) अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले. नगर दक्षिणमध्ये 'एमआयएम'नं अर्ज भरून लक्ष वेधून घेतले होते.
परंतु, ऐनवेळी निवडणुकीत माघार घेतली. तसेच, नगर आणि शिर्डी मतदारसंघात वंचितनं मैदानात शड्डू ठोकून लढतीत रंग भरला आहे. नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency) महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये खरी लढत रंगणार असल्याचे दिसते.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) 'एमआयएम'ने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एन्ट्री घेत लक्ष वेधून घेतले. 'एमआयएम'ने अर्ज भरल्यानंतर भाजपने बी-टीम नगर दक्षिणमध्ये उतरवल्याची चर्चा होती. यावर भाजपने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
परंतु, सोमवारी अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवशी 'एमआयएम'चे नगर जिल्हाध्यक्ष परवेज उमर शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. या निवडणुकीत 'एमआयएम' पाठोपाठ लक्ष वेधले होते, ते नीलेश साहेबराव लंके (रा. कामोठे, जि. रायगड) यांच्या उमेदवारीने.
नीलेश साहेबराव लंके यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने भाजपचे उमेदवारावर जोरदार टीका केली होती. मात्र, भाजपकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. नीलेश साहेबराव लंके यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगर दक्षिणमध्ये 36 पैकी 11 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात 25 उमेदवार राहिले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात 22 उमेदवारांपैकी दोन जणांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. या दोन्ही मतदारसंघांत प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये सरळ लढतीची शक्यता आहे.
दोन्ही मतदारसंघात वंचितने उमेदवार दिले आहेत. नगर दक्षिणमध्ये वंचित किती प्रभावी ठरते, हा येणारा काळच सांगेल. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचितने उत्कर्षा रुपवते महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे.
नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवार 16 पेक्षा अधिक झाल्याने दोन बॅलेट युनिट मशीन प्रत्येक मतदान केंद्रात बसवल्या जातील. दोन्ही मतदारसंघांत एकूण 36 लाख 59 हजार 201 मतदार आहेत.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार
खासदार सुजय राधाकृष्ण विखे (भारतीय जनता पक्ष), माजी आमदार नीलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), उमाशंकर श्यामबाबू यादव (बहुजन समाज पक्ष), आरती किशोरकुमार हालदार (प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष), कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), डॉ. कैलाश निवृत्ती जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी), रवींद्र लिलाचंद कोठारी (राष्ट्रीय जनमंच, सेक्युलर), दत्तात्रय अप्पा वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पक्ष), दिलीप कोंडीबा खेडकर (वंचित बहुजन आघाडी), भागवत धोंडीबा गायकवाड (समता पक्ष), मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टू रिकॉल पक्ष), रावसाहेब शंकर काळे (बहुजन मुक्ती पक्ष), भाऊसाहेब बापूराव वाबळे (भारतीय जवान किसान पक्ष), शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पक्ष), अमोल बिलास पाचुंदकर, गावडे मच्छिंद्र राधाकिसन, गोरख दशरथ आळेकर, गंगाधर हरीभाऊ कोळेकर, नवशाद मुन्सीलाल शेख, प्रविण सुभाष दळवी, बिलाल गफूर शेख, महेंद्र दादासाहेब शिंदे, अॅड. मोहंमद जमीर शेख, शेकटकर अनिल गणपत, सूर्यभान दत्तात्रय लांबे (सर्व अपक्ष) यांनी नगर दक्षिणमधून अर्ज भरले आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार
माजी खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), खासदार सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना), भारत संभाजी भोसले (समता पक्ष), नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पक्ष), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पक्ष), उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी), राजेंद्र रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पक्ष), गोरक्ष तान्हाजी बागूल, अॅड सिद्धार्थ दीपक बोधक, अशोक रामचंद्र आल्हाट, सतीश भिवा पवार, संजय पोपट भालेराव, गंगाधर राजाराम कदम, भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे, प्रशांत वसंत निकम, खरात नचिकेत रघुनाथ, रविंद्र काल्या स्वामी, चंद्रकांत संभाजी दोंदे, अभिजित अशोकराव पोटे, खाजेकर विजयकुमार गोविंदराव (सर्व अपक्ष) यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला आहे.
( Edited by : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.